Raj Thackeray : भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसे- भाजप युतीचे संकेत? | पुढारी

Raj Thackeray : भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसे- भाजप युतीचे संकेत?

मुंबई: पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप जवळ येत असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच भाजपचा एक नेता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीसाठी शिवतीर्थावर गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे मनसे आणि भाजपची लवकरच युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीवर कृपाशंकर सिंह यांनी खुलासा केला आहे. आपण नातीच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे यांना द्यायला गेलो होतो असे त्यांनी म्हटले आहे. दोघांच्या भेटीदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजब‍ळदेखील आज बुधवारी (दि.१३) राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या हिंदूत्वाच्या मुद्यावर अधिक जोर देताना दिसत आहे. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप- मनसे युती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ९ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

गुडीपाडव्याच्या सभेत भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वातावरणात भोंगा लावून सोडलेल्या राज ठाकरे यांनी काल ठाण्यात सभा घेतली होती. त्यांनी या सभेत संबोधित करताना सुरुवातीलाच शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत भाषणाची दिशा स्पष्ट केली.

ते म्हणाले की, पोलिसांचा दुपारी फोन आला होता, माझ्या ताफ्याला कोणीतरी येणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं. मात्र शरद पवार यांच्या घरी जाणार हे माहीत नव्हतं. गुडीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेलचे तारे तोडले, त्यानंतर उत्तर देणं गरजेचं आहे. मात्र मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायच नव्हतं. कारण काही पत्रकार काही पक्षाला बांधील आहेत ते पण शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहतो.

हे ही वाचा :

Back to top button