गुजरातमधून 2 हजार टन पांढरा कांदा निर्यात होणार : महाराष्ट्रातील शेतकरी नाराज | पुढारी

गुजरातमधून 2 हजार टन पांढरा कांदा निर्यात होणार : महाराष्ट्रातील शेतकरी नाराज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने दोन हजार टनाइतक्या पांढर्‍या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली असून, गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊनच ही निर्यात करण्याचे बंधन घातले आहे. पांढर्‍या कांद्याला प्रामुख्याने ग्रीस, दुबई व आखाती देशांतून मागणी असते. गुजरातमधील पांढरा कांदा, गलोर रोझ कृष्णपुरम कांदा निर्यातीला परवानगी असताना महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातबंदी असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आकाराने लहान असलेल्या गुलटी कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यावी.

मोठ्या आकाराच्या कांद्याला कोटा पद्धत सुरू करून दर महिन्याला 50 हजार टनाइतकी कांदा निर्यात महाराष्ट्रातून सुरू करण्यास केंद्राने परवानगी देण्याचीही मागणी सुरू झाली आहे. गुजरातमधील पांढर्‍या कांद्याची निर्यात प्रामुख्याने मुंद्रा बंदर, पिपावाव बंदर, न्हावा शेवा व जेएनपीटी पोर्टमधून करण्यात यावी, असेही केंद्रीय व्यापार मंत्रालयाने काढलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा गुजरातमधील पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना होणार असून, देशात कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी कायम असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये सध्या गरवी कांद्याची आवक होत असून, 10 किलोचा घाऊक दर 140 ते 160 रुपयांपर्यंत आहे. किरकोळ बाजारात उत्तम प्रतिच्या कांद्याचा किलोचा दर 20 ते 25 रुपये आहे. निर्यात सुरू झाल्यास सध्याचे दर वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. कारण भारतीय कांद्याचे दर प्रतिकिलोला दुबईमध्ये 100 रुपये आणि श्रीलंकेत 600 रुपये आहेत. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरत आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करण्याची आता गरज आहे. कारण केवळ पांढरा कांदा निर्यात करण्याऐवजी सरसकट कांदा निर्यातीला परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. ते शक्य नसल्यास कांद्यावर निर्यातशुल्क लावूनही निर्यात सुरू करणे गरजेचे आहे. कारण जागतिक बाजारात भारतीय कांद्याला स्पर्धक असलेल्या इराण, तुर्कस्थान, पाकिस्तानमधील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अधिक दर मिळाले आहेत. तर भारतीय कांद्याचे दर घटून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊन परकीय चलनाही देशाला मुकावे लागत आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी आमची मागणी आहे.

– प्रवीण रायसोनी, कांदा निर्यातदार, पुणे.

हेही वाचा

Back to top button