रोहित, तू फलंदाजी कर; कॅप्टन्सी विसर : माजी क्रिकेटरचा खोचक सल्ला | पुढारी

रोहित, तू फलंदाजी कर; कॅप्टन्सी विसर : माजी क्रिकेटरचा खोचक सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल (IPL 2022)मध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्ज (PBKS) सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाला विजय मिळवायचा असेल, तर रोहित शर्माची फलंदाजीतील चांगली कामगिरी खूप महत्त्वाची आहे.

चालू हंगामात मुंबईच्या संघाने पहिले चार सामने गमावले आहेत. एमआय (MI) संघ अजूनही विजयाच्या शोधात आहे. त्याचबरोबर रोहित शर्माची बॅटही शांत राहिली आहे. रोहितने चार सामन्यांत 20 च्या साध्या सरासरीने 80 धावा केल्या आहेत ज्यात 41 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सला अतिरिक्त धावा कराव्या लागतील : वीरेंद्र सेहवाग

क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला की, मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जप्रमाणे अतिरिक्त धावा स्कोअर बोर्डवर ठेवाव्या लागतील. सीएसकेने आरसीबीविरुद्ध 216 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. सेहवाग म्हणाला, चेन्नईप्रमाणेच मुंबईलाही नाणेफेक हरल्यास प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत अतिरिक्त धावा वसूल कराव्या लागतील. सध्याचे मुंबईचे रेकॉर्ड पाहिले असता त्यांचा संघ 160-170 धावांपर्यंत मजल मारू शकला आहे. जर स्पर्धेत पुनरागमन करायचे असल्यास त्यांना 200 धावांपर्यंत मजल मारणे आवश्यक आहे. गोलंदाजीमध्येही मुंबईची सुमार कामगिरी झाली आहे. एकटा बुमराह सर्वकाही करू शकत नाही, असे मत त्याने मांडले आहे.

वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माच्या फलंदाजीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रोहितने कर्णधारपदाच्या जबाबदारीचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ देऊ नये, असे सेहवागने म्हटले. फलंदाजीसाठी मैदानात उतरताना रोहितला आपण कर्णधार आहोत हे विसरावे लागेल, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली आहे.

Back to top button