आयपीएल 2022 : लिलावात यावेळी असणार अनुभवी खेळाडूंवर नजरा | पुढारी

आयपीएल 2022 : लिलावात यावेळी असणार अनुभवी खेळाडूंवर नजरा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात होणार असून युवा खेळाडूंसोबत अनुभवी खेळाडूंकडे देखील फ्रेंचायजीच्या नजरा असतील. या यादीत डेव्हिड वॉर्नर, फाफ ड्यू प्लेसिस आणि शिखर धवन सारख्या दिग्गज फलंदाजांचा देखील समावेश आहे.

डेव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स हैदराबाद संघाने रीलिज केले. गेल्या दोन हंगामात वॉर्नरला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. गेल्या हंगामात खराब फॉर्ममुळे त्याला संघातून देखील वगळण्यात आले. पण, त्यानंतर वॉर्नरने चांगला खेळ केला. 35 वर्षीय वॉर्नरवर यावेळी आयपीएल 2022 च्या लिलावात चांगली बोली लागू शकते. त्याने 150 आयपीएल सामन्यांत 5449 धावा केल्या आहेत आणि 2016 साली आपल्या नेतृत्वाखाली त्याने हैदराबादला जेतेपददेखील मिळवून दिले आहे.

शिखर धवन : शिखरची गेल्या तीन हंगामांतील कामगिरी पाहता त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने रीलिज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिखरने 2019 मध्ये 521, 2020 मध्ये 618 आणि 2021 मध्ये 587 धावा केल्या. या कामगिरीनंतर देखील त्याची निवड टी-20 विश्वचषक संघात झालेली नाही. पण, आयपीएल लिलावात शिखरला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याने एक कर्णधार म्हणूनदेखील स्वत:ला सिद्ध केले आहे.

फाफ ड्यू प्लेसिस : 37 वर्षीय या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिटेन केले नाही. आयपीएलच्या 2021 हंगामात या खेळाडूने 16 सामन्यांत 633 धावा केल्या आहेत. 2020 च्या हंगामात देखील त्याने चमक दाखवली होती. त्याच्या या कामगिरीचा फायदा लिलावात मिळू शकतो. चेन्नईचा प्रयत्न देखील या खेळाडूला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्याचा असणार आहे.

सुरेश रैना : चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूला रिटेन केले नाही. गेल्या हंगामात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पण, आयपीएलमधील त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. 35 वर्षीय रैनाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत आणि त्याने 5528 धावा केल्या आहेत. त्याला याचा फायदा लिलावात मिळू शकतो. दोन नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबाद त्याला संघात घेऊ शकतात. फलंदाजीसोबत रैना गोलंदाजीदेखील करतो. त्याने आयपीएलमध्ये 25 विकेटस् देखील मिळवले आहेत.

ड्वेन ब्रावो : 38 वर्षीय ड्वेन ब्रावोवर देखील आयपीएल लिलावात चांगली बोली लागू शकते. त्याची आजवरची आयपीएलमधील कामगिरी कमालीची आहे. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची कसब त्याच्याकडे आहे. ब्रावोने टी-20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेटस् मिळवले आहेत. आयपीएलमध्ये त्याने 151 सामन्यांत 167 विकेटस् आपल्या नावे केल्या आहेत. फलंदाजीत देखील त्याने आयपीएलमध्ये 1537 धावा केल्या आहेत.

Back to top button