LokSabha Elections 2024 | संविधान बदलणे हा केवळ विरोधकांचा अपप्रचार : रामदास आठवले | पुढारी

LokSabha Elections 2024 | संविधान बदलणे हा केवळ विरोधकांचा अपप्रचार : रामदास आठवले

दौंड : पुढारी वृत्तसेवा : संविधान बदलणे हा केवळ विरोधकांचा अपप्रचार आहे. कोणतेही सरकार आले तरी भारताचे संविधान बदलवू शकत नाही. जो कोणी भारताचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न करेल, त्याला आम्ही या देशात राहू देणार नाही, असे मत रामदास आठवले यांनी दौंड येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत केले. विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत, ते केवळ भीती दाखवत आहेत. अल्पसंख्याकांना ते घाबरतात, पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, सरकारने जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे शेजारील देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. ही लढाई आम्ही जिंकणार असल्याचे आठवले यांनी विश्वासपूर्वक सांगितले.

दौंड शहरातील रेल्वे झोपडपट्टी हद्दीतील गोरगरिबांच्या झोपड्या काढू नयेत. त्याबाबत राज्य व केंद्र सरकारने एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. मुळात रेल्वेची पटरी या झोपडपट्टीमुळेच सुरक्षित आहे, असे आठवले म्हणाले. आपणा सर्वांना नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे. मोदी हे ओबीसी असून ते बौद्ध धर्माला मानणारे आहेत. मोदी संविधान बदलतील हा प्रचार खोटा आहे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की, या देशात फक्त दोनच पक्ष राहतील. रिपब्लिकन पार्टी व काँग्रेस. सध्या मोदी हे दलित आदिवासी लोकांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन आठवले यांनी केले.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही म्हणता बारामतीचा विकास झाला, त्या धर्तीवर जाऊन विकास करा. त्यानुसारच मी दौंडचा विकास करायला तयार आहे. जर विकास केला नाही तर मी नावाचा अजित पवार नाही, असे पवार म्हणाले.
दौंड तालुक्यात विद्या प्रतिष्ठानसारखेच मोठे शैक्षणिक संकुल उभे करायचे आहे. 300 युनिटपर्यंत गोरगरिबांना मोफत वीज देण्याचा विचार सरकार करत आहे. जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलणार नाही, हा केवळ विरोधकांचा अपप्रचार असल्याचे देखील पवार म्हणाले.

या वेळी आमदार राहुल कुल, माजी नगरसेवक नंदू पवार, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे,
आरपीआय आठवले गटाचे सतीश थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, जयश्री जाधव, सुनिता वंटे, आशा मोहिते, शोभा वाल्मिकी, इंदुमती जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button