‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा श्रीदेवीने घेतला होता धसका | पुढारी

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा श्रीदेवीने घेतला होता धसका

जवळपास पाचशेहून अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारलेल्या श्रीदेवीच्या सौंदर्याची आणि अभिनयाची मोहिनी रसिकांच्या मनावर आजही कायम आहे. २०१८ साली २४ फेब्रुवारीला त्यांनी अकाली एक्झिट घेतली. हा किस्सा आहे १९९३ मध्ये आलेल्या ‘गुमराह’ चित्रपटाचा. त्यात श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू श्रीदेवीच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.
रीमाने जवळपास २५ चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली होती. यापैकी ती सातवेळा सलमान खानच्या आईच्या भूमिकेत दिसली. रीमा ही आईच्या भूमिकेत इतकी तल्लीन झाली होती की, तिचा अभिनय पाहून श्रीदेवी घाबरून गेली होती.
रीमाचा अभिनय दमदार असल्यामुळे श्रीदेवीचा अभिनय तिच्यासमोर फिका पडत होता. मग काय, श्रीदेवीने लगेचच चित्रपटाच्या निर्मात्यांना रीमाच्या सिन्सना कात्री लावायचे फर्मानच सोडले. निर्मात्याला तसे करण्याखेरीज गत्यंतर नव्हते. मात्र, एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अभिनयाला श्रीदेवीसारखी कसलेली तारका घाबरली हे मान्य केलेच पाहिजे.

Back to top button