‘ऑस्कर’कडून जगभरातील ३०१ चित्रपटांची यादी जाहीर, ‘हे’ चित्रपट शर्यतीत | पुढारी

'ऑस्कर'कडून जगभरातील ३०१ चित्रपटांची यादी जाहीर, 'हे' चित्रपट शर्यतीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘ऑस्कर’ने जगभरातील ३०१ चित्रपटांची यादी जाहीर केली असून, भारतातील ‘कांतारा’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘मी वसंतराव’, ‘तुझ्यासाठी काहीही’ या चित्रपटांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. नामांकनाची अंतिम यादी २५ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘द छेल्लो शो’ हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. ‘ऑस्कर’च्या नामांकनासाठी अनेक चित्रपटांमध्ये तीव्र चुरस असणार आहे. ‘द काश्मीर फाईल्स’, ‘कांतारा’, ‘मी वसंतराव’, ‘तुझ्यासाठी काहीही’, ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘रॉकेट्री’ आणि ‘विक्रांत रोना’ हे चित्रपट त्यासाठी चर्चेत आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘ऑस्कर’च्या यादीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’चा समावेश‍ झाल्यानंतर अग्निहोत्री यांनी एक ट्विट शेअर केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, ‘द काश्मीर फाईल्स’ला ऑस्कर २०२३ च्या पहिल्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

९५ वा अकादमी पुरस्कार सोहळा येत्या १२ मार्च रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. जिमी किमेल यंदा सूत्रसंचालन करणार आहेत. यंदा कोणते चित्रपट बाजी मारणार, याकडे मनोरंजनसृष्टीसह रसिकांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ या चित्रपटांना ‘ऑस्कर’साठी नामांकन मिळाले आहे.

Back to top button