South Movies : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही? | पुढारी

South Movies : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही?

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) ‘आरआरआर’चे यश पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झालीय. कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’ला देखील हा चित्रपट टक्कर देईल, असं म्हटलं जातय. (South Movies) साऊथचे येणारे एकापेक्षा एक चित्रपट पाहून अनेकांचे ‘तोते उड गए रे’ अशी अवस्था झाली आहे. साऊथच्या चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही? नुकत्याच रिलीज झालेल्या ‘आरआरआर’च्या सुपरसक्सेसवर काही बॉलीवूड स्टार्सनी मौन धारण केल्याचेही चित्र आहे. मग आपल्याकडे बॉलिवूडमध्ये असे चित्रपट का नाही येत? दक्षिणेतील संस्कृती, जीवनमान वेगळं असलं तरी माणसं तिचं आहेत. साऊथचेच चित्रपट विविध भाषांमध्ये डब करून तो सगळीकडे फिरवले जातात. किंबहुना त्याच चित्रपटांचा रिमेक करण्याची वेळ बॉलिवूडला येते. कोट्यवधींची कमाई करणारे, टॉलिवूडला टक्कर देणारे चित्रपट मग बॉलिवूडमध्ये का येऊ शकत नाही?

दक्षिणेतला मोठा प्रेक्षकवर्ग सिनेप्रेमी आहे. मजूर असो वा महिला, वा मध्यमवर्गीय सर्वच पातळीवरील लोक सिनेमा पाहायला उत्सुक असतात. दिवसभराच्या कमाईतील थोडे पैसे बाजूला ठेवून, वेळात वेळ काढून चित्रपट थिएटरला लागला की तो लगेच पाहणं, हे नित्याचंच झालं आहे. चित्रपटीय मनोरंजनावर खर्च करणं, हे तिथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भागचं बनला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

लोकांच्या मनाला भिडणार्‍या कथा

दक्षिणेतील चित्रपटांचा फिव्हर संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय. कन्नड असो, तेलुगु असो वा तमिळ चित्रपट, तिथल्या राज्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. भाषेच्या भिंती तोडून ते सगळीकडे पसरल्याने मुख्य मुख्य राज्यांच्या त्या-त्या भाषांमध्ये डब झालेला चित्रपट पाहण्याची मजाही कुछ और आहे. अन्य भाषिक लोकांना या चित्रपटांचा रिमेक येईपर्यंत वाट पाहत राहणंदेखील बंद झालं आहे. कारण, कोणत्याही मूळ भाषेतील चित्रपट असो, तो हिंदी, इंग्रजीमध्ये डब करायची सोय करून ठेवली गेलेली आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर साऊथच्या चित्रपटांच्या कहाण्या काहीशा मनाला भिडणार्‍या असतात. त्या वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहणार्‍या ठरतात. काळजाला हात घालणार्‍या अशा कथा पाहून प्रेक्षकवर्गही खुर्चीला खिळून राहतो. शेवटपर्यंत चित्रपट पाहात राहावं, तशी कथा तयार करणं, हे चित्रपट लेखकाचं कौशल्यचं म्हणावं लागेल.

‘आई’ हा फॅक्टर कॉमन

बहुतांशी चित्रपट पाहिले तर साऊथच्या चित्रपटांमध्ये ‘आई’ हा कॉमन फॅक्टर असलेलं दिसतं. चित्रपटांमध्ये आई ही असतेच. कधी ती साधीभोळी, प्रेमळ तर कधी कोयता तर कधी हत्यारे हातात घेऊन लढणारी कडक – लढाऊ आई चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये पुष्कळ माणसं असतात. मुख्य भूमिकेतील कलाकारांव्यतिरिक्त काका, मामा, भाचे, आत्या, आजी, बाबा हे  वावरत असतात, ढीगभर माणसांची गर्दी दृश्यास पडते. एकत्र कुटुंबाने वा कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाहता येईल, अशी चित्रपटाची रचना केलेली असते.

नुकताच रिलीज झालेला पुष्पा, आरआरआर हे चित्रपटदेखील याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या चित्रपटाची कथा आणि गाणी अद्यापही प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिऴताहेत. लोकांच्या जीवनाच्या जवळ जाणारी कथा दाखवणं हे साऊथच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. देखण्या अभिनेत्री असल्या तरी तथाकथित  देखणा अभिनेता चित्रपटात असेलच असं नाही. रांगडा, आडदांड नायक असला तरीही प्रेक्षकवर्ग त्यांना स्वीकारतो. चित्रपटातील साधेपणाच हा लोकांना भावतो.

अ‍ॅक्शन चित्रपटांची क्रेझ

साऊथच्या अ‍ॅक्शन चित्रपटांची जादू सगळ्यांवरच झालेली दिसते. तुम्हाला विचार करायला भाग पाडणार्‍या कहाण्या प्रेक्षकांना चित्रपट पाहायला भाग पाडणार्‍या ठरतात. चित्रपटांत ज्या कथेचं चित्रण दाखवतात, त्यात कृत्रिमपणा नसतो. भाषेत, अभिनयात आणि दृष्टीकोनात सौंदर्य लपलेलं असतं आणि ते नैसर्गिक वाटतं. जसं आहे तसं दाखवलं जातं आणि ते आपल्याला सामान्य वाटतं.

खलनायक ठरलेलाच!

प्रत्येक चित्रपटात एखादा दुसरा किंवा अनेक खलनायक असतोच, जो एकट्या हिरोच्या मागे लागलेले असतात. अत्याचार करणार्‍या दृष्ट खलनायकाचा नाश करणारा हिरो लोकांच्या मनात कायमचा घर करून जातो.

कलेला वाव

चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्याच्या प्रतिमेला किंवा चित्रपटाच्या पोस्टरला पूजा, दुग्धाभिषेक, पैसे आणि फुलांचा हार, ढोल ताशे आणि फटाकड्या वाजवणं ही गोष्ट नित्याचीच बनलीय. आपल्या कलाकारांचं चाहत्यांमधून होत असलेलं स्वागत हे तिथल्या कलेप्रती असलेलं प्रेम दर्शवतं. चित्रपटाच्या बोर्डांना हार घातले जातात, मग आपल्याकडे का नाही घातले जात?.

बॉलिवूडमध्येदेखील दक्षिणेतील कलाकारांचं खास करून अभिनेत्रींचं स्वागत केलेलं दिसतं. यात सामंथा, पूजा हेगडे, काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य सुंदरींचा समावेश असल्याचं दिसतं.

साऊथचे हे चित्रपट आपली संस्कृती सोडत नाहीत. कुंकू लावणं, साडी, गजरा घालणं, हिरो लुंगी घालून डान्स करणं या छोट्या-छोट्या गोष्टींतून संस्कृती जपली जाते आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. मग, आपल्याच मातीत आपण दुसर्‍यांच्या प्रेमात का पडतो?.

Back to top button