तडका : इ है बंबई नगरिया | पुढारी

तडका : इ है बंबई नगरिया

संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागलेले आहे. मुंबई केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पूर्ण भारतातील लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे. अन्य राज्यांमधून मुंबईच्या दिशेने दररोज हजारोंचे लोंढे येत असतात आणि मुंबईची मराठी शहर ही ओळख बदलली जाऊन ती एक कॉस्मोपोलेटियन शहर अशी झालेली आहे, हे मान्यच करावे लागेल. मुंबईची एक वेगळी ओळख देशातच नव्हे, तर जगात आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मुंबई शहराची दोन मुख्य वैशिष्ट्ये सांगितली जातात. एक म्हणजे हे शहर कधी झोपत नाही आणि दुसरे म्हणजे इथे कोणी उपाशी मरत नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी काम मिळतेच. सुरुवातीला काम करायला आलेला माणूस हळूहळू इथे रमायला लागतो आणि मुंबईचा भाग होऊन बसतो.

मुंबई सध्या निवडणुकांच्या निमित्ताने चर्चेत आहे. मुंबईवर राज्य कुणाचे, हा प्रश्न गेल्या दहा वर्षांत ऐरणीवर आला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले, तर मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे देशाच्या 548 खासदारांपैकी सुमारे सहा खासदार मुंबई देत असते. या सहा जागांवर उमेदवार निवडून यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष अटीतटीची लढाई करत आहेत. ही लढाई यासाठीही महत्त्वाची आहे की, पुढे विधानसभा आणि नंतर महानगरपालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून, या मनपाचे बजेट कितीतरी राज्यांपेक्षा मोठे आहे. रोड शो हा प्रकार मुंबईसाठी जास्त वापरला जात आहे, याचे कारण म्हणजे फार मोठी सभा भरवण्याइतकी ग्राऊंड नाहीत आणि जिथे ग्राऊंड आहे, तिथे गर्दी जमवून आणणे तितकेच अवघड आहे.

परप्रांतीयांसाठी, विशेषतः उत्तर भारतामधून आलेल्या भैया लोकांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आजित्यनाथ यांच्या नियमित सभा मुंबईमध्ये होत असतात. ‘हमारे योगी भाई आ गये’ म्हणत परप्रांतीय नागरिक त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करतात. कधीकाळी मराठी माणसांच्या मतांवर अवलंबून असलेले काही पक्ष संपूर्ण मुंबईचा कारभार बघत होते; पण असंख्य कारणांमुळे या पक्षांच्या हातातून मुंबई हळूहळू निसटत चालली आहे, असे दिसते आहे. पुण्याचा मतदार बुद्धिमान आहे, असे म्हटले जात असेल, तर मुंबईचे मतदार स्मार्ट आहेत, असे म्हणावे लागेल.आपला विकास कोण करू शकतो, हे ओळखून ते बरोबर मतदान करतात.

सहा जागा एकाच पक्षाला देऊन यापूर्वी त्यांनी इतिहास घडवलेला आहे. देशाच्या विविध भागातून आलेले लोक इथे असले तरी त्यांचे विचार परस्परांशी किती मिळते जुळते आहेत, हे एक आश्चर्यच आहे. शहरावर प्रेम असणारे मुंबईकर या निवडणुकीमध्ये नेमके काय सुरू आहे, हे बारकाईने पाहत आहेत. ते निश्चित निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे मतदान करतील असे दिसते. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मुंबईकर किती हिरिरीने भाग घेतात आणि कोणाच्या पारड्यात मत टाकतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. आता महायुती आणि इंंडिया आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सदैव धावपळीत असणार्‍या मुंबईकरांचे मतदान महत्त्वाचे आहे.

Back to top button