नवतंत्रज्ञान आणि पाणी वाचविण्याचे प्रयोग | पुढारी

नवतंत्रज्ञान आणि पाणी वाचविण्याचे प्रयोग

अरविंद कुमार मिश्र, विज्ञान लेखक

आपण पाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत नाही, त्यामुळे पाणी वाया घालवण्याऐवजी त्याची बचत करून पुन्हा-पुन्हा वापरणे हाच उपाय आहे. आज केवळ आपत्कालीन परिस्थितीची वाट न पाहता पाण्याची बचत आणि त्याचा जपून वापर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. हे प्रयत्न सोपे करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि अभियंते अशा तंत्रज्ञानावर सतत काम करत आहेत, ज्याद्वारे तुम्ही वैयक्तिक पातळीवर पाण्याची बचत करू शकता. एकदा वापरल्या गेलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा घरच्या घरी पुन्हा वापर करता येतो.

आपण पाण्याच्या अनाठायी वापरावर लगाम घालू शकतो. एकुणातच ते वाचवणे आणि वाया घालवण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करणे हाच एकमेव परिणामकारक उपाय आहे. आजघडीला अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून, त्याच्या मदतीने बर्‍यापैकी पाण्याची बचत करू शकतो. एक-दोन दिवस नाही, तर काही तासांसाठी जरी नळाला पाणी आले नाही तर अगदी सैरभैर झाल्यासारखे होते. प्रत्येक जण पाण्याच्या प्रतीक्षेत नळाकडे पाहतात. कधी एकदाचे पाणी येईल आणि काम कधी पूर्ण होईल, याची वाट पाहत असतात. सध्याच्या गंभीर स्थितीत उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक आणि योग्य वापर करायला हवा. अर्थात, पाणी वाचण्यासाठी अनेक प्रयत्न होतात आणि त्याचा पुनर्वापरही होतो; परंतु नळाला भरपूर पाणी येताच ‘ये रे माझ्या मागल्या.’ आज केवळ आणीबाणीच्या काळात नाही, तर रोज पाणी वाचवणे आणि त्याचा अधिकाधिक पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

आपण आतापर्यंत घरातील नळाला एअररेटर्स बसविले नसेल तर त्याचा वापर सुरू करणे ही एक चांगली सुरुवात राहू शकते. बाजारात प्रत्येक आकाराच्या नळाला बसणारे एअररेटर्स उपलब्ध आहेत. एअररेटर्समुळे नळातून बाहेर येणार्‍या पाण्याची हानी 90 टक्क्यांपर्यंत वाचवता येणे शक्य आहे. एक सामान्य व्यक्ती दररोज 150 लिटर पाण्याचा वापर करते. एअररेटर्स हे नळातील पाणी बाहेर पडणार्‍या मार्गाला (वॉटर पॅसेज) आकुंचित करते. त्यामुळे जादा पाणी वाया जाण्यापासून रोखले जाते. इंजिनिअर्सनी असे काही एअररेटर्स तयार केले आहेत की, त्या माध्यमातून मोठ्या धारेची लाखो थेंबांत विभागणी होते. अशावेळी नळाचे पाणी लहान तुषारांच्या रूपातून बाहेर येते. परिणामी, पाणी वाया जात नाही. एखादा नळ दोन मिनिटांत दहा लिटर पाणी फेकत असेल तर एअररेटर बसविल्यानंतर दोन ते तीन लिटरच पाणी बाहेर पडेल.

एका फ्लशमध्ये सहा ते सात लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे एका कुटुंबाकडून टॉयलेटमध्ये सुमारे दीडशे लिटर पाणी वापरले जाते. हे टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण घरात व्हॅक्युम टॉयलेटचा वापर करू शकता. आजकाल त्याची लोकप्रियता वाढत आहे. यात विशेष सेन्सर बसविले आहेत. ते सेल्फ फ्लशिंग तंत्रज्ञानावर काम करते. ते टॉयलेट आणि सांडपाण्यात येणार्‍या अडथळ्याच्या म्हणजे चोकअप होण्याच्या समस्येपासून दिलासा देण्याचे काम करते. हे उपकरण घरातील स्मार्ट मीटर किंवा त्यासंबंधी पाईपला बसविण्यात येते. त्याला वायफायशी कनेक्ट करता येते. त्याचे अ‍ॅप घरात पाण्याचा किती वापर झाला, एका निश्चित काळात किती पाणी लागते, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. पाण्याचा वापर गरजेपेक्षा अधिक वाढल्यास हे उपकरण नोटिफिकेशन पाठवते.

मोटर आणि नळ बंद होण्याच्या स्थितीतही काही ठिकाणी पाणी गळत असेल तर त्याचा मोबाईलवर अ‍ॅलर्ट येतो. सध्या हे उपकरण चाचणी पातळीवर आहे. या उपकरणाच्या मदतीने नागरिक पाणी वाचविण्यासंदर्भात उपाययोजना करू शकतात. गुजरातचे अमित दोशी यांनी वॉटर फिल्टर तयार केला असून, तो केवळ तीन हजारांत बसवता येतो आणि तेही दोन तासांतच. नरिन नावाचे फिल्टर घरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करते. यात उच्च घनत्व असलेल्या पॉलिथिलीनचा डबल लेअर फिल्टर कोट असतो. पावसाचे पाणी पाईपच्या माध्यमातून ‘कर्व्ह’ आकारात ठेवलेल्या फिल्टरमध्ये सहज पोहोचते. या ठिकाणी पाण्यातील दूषितपणा काढला जातो आणि स्वच्छ पाणी पुढे पाठवले. या पाण्याला वॉटर टँक किंवा कूपनलिकेत साठवले जाते. याप्रमाणे पावसाचे पाणी केवळ भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत नाही, तर दैनंदिन कामातही उपयुक्त ठरू शकते. पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी आपण घरात रेन बॅरलचा वापर करू शकता.

पाईपलाईनमधून पाण्याची गळती ही एक सामान्य समस्या आहे. लीक डिटेक्टर डिव्हाईस हे पाण्याच्या टाकीबरोबरच पाईपलाईनमधील ओलसरपणा लक्षात घेत गळतीचे अलर्ट पाठवतो. लीक डिटेक्टरमध्ये उच्च प्रतीचे कॅमेरे असतात. स्मार्टफोनने वापरता येणार्‍या उपकरणाच्या मदतीने वाया जाणारे पाणी रोखू शकता. या उपकरणाशी मिळते जुळते स्मार्ट वॉटर टायमर काही देशांत वापरात आणले जात आहेत. स्मार्ट होम डिव्हाईस पाणी वापरासंदर्भातील रिअल टाईम माहिती मोबाईलवर शेअर करते. घरात पाण्याचा सर्वाधिक वापर हा स्नान, कपडे धुण्यासाठी आणि स्वयंपाकघरात होतो.

रोजच्या कामात वापरले जाणारे पाणी नाल्यातून वाहून जाते आणि त्याला शास्त्रीय भाषेत ‘ग्रे वॉटर’ (सांडपाणी) असे म्हटले जाते. याप्रमाणे टॉयलेटमध्ये फ्लशच्या रूपातून वापरल्या जाणार्‍या पाण्याला ‘ब्लॅक वॉटर’ असे म्हणतात. ग्रे आणि ब्लॅक पाणी पुन्हा वापरायोग्य करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. वॉशिंग मशिनमधून बाहेर पडणारे ‘ग्रे वॉटर’ पुन्हा वापरण्यासाठी ‘ग्रे वॉटर डायव्हर्टर’ उपयुक्त ठरते. यास वॉशिंग मशिनला बसवून आपण त्यास पाण्याची टाकी किंवा रेन बॅरल आदीशी जोडू शकता.

Back to top button