[author title="इलियास ढोकले" image="http://"][/author]
नाते; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मांडून ते पूर्णत्वास नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा पाचाड येथील राजवाडा उजाड अवस्थेत आहे. या संदर्भात रायगड प्राधिकरणाने केंद्रीय पुरातत्व विभागाला ३ वर्षांपूर्वी दिलेला संवर्धनाचा प्रस्ताव दुर्लक्षित ठेवल्याने केंद्रीय पुरातत्व विभागाचा मुजोरी कारभार पुन्हा एकदा शिवभक्तांच्या समोर आला. त्यामुळे शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या या राजवाडाच्या सध्याच्या स्थितीबाबत महाडचे आ. भरत गोगावले व खा. सुनील तटकरे यांनी राज्य व केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न करून या राजवाड्याच्या संवर्धनाकामी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मागील वर्षी ३५० व चालू वर्षी ३५१ वा शिवराज्याभिषेक निमित्त लाखो रुपये खर्च करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाकडून पाचाड येथील केंद्रीय परातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाड्याच्या संवर्धन उत्खनन व देशभक्तीकडे झालेल्या दुर्लक्ष बद्दल संपूर्ण शिवभक्तांमधून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अखिल हिंदुस्तानला प्रातः स्मरणीय वंदनीय असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना त्यांच्या प्रकृती कारणास्तव किल्ले रायगडावरील हवामान बाधत असल्याने त्यांच्या आग्रहाखातर पाचाड येथे राजवाड्याची निर्मिती करण्यात आली होती. राज्याभिषेक पश्चात १३ दिवसांनी राजवाड्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी आपला देह ठेवला होता. मागील अनेक वर्षापासून स्थानिक शिवभक्तांनी किल्ले रायगड प्रमाणेच राष्टमाता जिजाऊ माँसाहेब यांचा पाचाड येथील राजवाडा पुन्हा एकदा पूर्वस्थितीला आणण्यासाठी शासनाने विशेष कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती.
६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून २०२०- २१ मध्ये केंद्रीय विभागाला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा राजवाडा रायगड प्राधिकरणाकडे परिसरातील उत्खनन संवर्धन व देखभालीसाठी देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र ३ वर्षापासून यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाकडून निर्णय देण्यात आलेला नाही. आज राजवाड्याचा सकृत दर्शनी असलेला नामफलक देखील जमिनीवर पडल्याचे पहावयास मिळाले. यावरूनच केंद्रीय पुरातत्व विभाग विरोधात शिवभक्तांमध्ये संताप निर्माण झाला आहे.