तडका : ‘कांटे की टक्कर’

तडका : ‘कांटे की टक्कर’

अटीतटीचा सामना रंगत चाललेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्तमानपत्रांची शीर्षके काढली तर काही ठरावीक शब्द सातत्याने वापरले जातात असे लक्षात येईल. उदाहरणार्थ हिंदीमधील 'कांटे की टक्कर'ला काही पर्याय दिसत नाही. मुंबईत नुकत्याच झालेल्या सभांचा धुराळा पाहता अंतिम टप्प्यात असलेली निवडणूक म्हणजे 'कांटे की टक्कर' झाली आहे. आता तुम्हाला असे वाटेल की, 'कांटे की टक्कर' म्हणजे नेमके काय? काटा म्हणजे तराजू.

काही मिलिग्रॅम इकडे तिकडे टाकले की, तराजू इकडे तिकडे झुकत राहतो आणि जर चुरशीची लढत असेल तर तराजूचे एक पारडे एकीकडे, तर कधी दुसरीकडे झुकत असते. त्यामुळे निश्चित काही सांगता येत नसले की, या लढतीला 'कांटे की टक्कर' असे म्हणत असावेत. अशा पद्धतीने 'काटे की टक्कर' महाराष्ट्रातील आणि देशातील उरलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. ज्या नेत्यांच्या मतदारसंघातील निवडणुका झाल्या आहेत, तेही देशाच्या इतर भागांत जोरदार प्रचार करत आहेत. सर्व पक्षांनी दिलेली आश्वासने पाहता आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी ती पूर्ण करण्याचे मनावर घेतले तर येत्या पाच वर्षांत देश सुजलाम सुफलाम झालेला दिसेल, यात आता तुम्हाला आम्हाला म्हणजे मतदारांना काहीही शंका उरलेली नाही.

मुंबईत झालेल्या शनिवारच्या प्रचार सभांनी एक गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती म्हणजे कोणत्याही पक्षाने आपली कोणतीही अस्त्रे आणि शस्त्रे काढायचे शिल्लक ठेवलेले नाही. ठेवणीतील आणि राखून ठेवलेली शस्त्रे आता बाहेर निघत आहेत आणि नवनव्याने दुसर्‍यांवर आरोप करत आपण किती चांगले आहोत, असे सांगितले जात आहे. निवडणुकीचे आणि मतदानाचे तंत्रज्ञान न समजलेले काही जुनाट पक्ष आपल्या वडिलांचा टेंभा मिरवत मते मागत आहेत. कोणी स्वतःचा गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा आणि येत्या 25 वर्षांत आपण देशाला कुठे नेणार आहोत, याचे नियोजन सांगत आहेत. बर्‍याचशा पक्षांकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे भरकटलेला प्रचार पण दिसून येत आहे. कितीही विकासाच्या गोष्टी केल्या किंवा कोणीही कितीही देश सुधारून दाखवला, तरी आजही बर्‍याच राजकीय नेत्यांना जातिपातीशिवाय राजकारण करता येत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

तसे पाहता आपल्या निवडणुकांचा आणि पाकिस्तानचा काही संबंध नाही; परंतु पाकिस्तानचा उल्लेख झाल्याशिवाय भारतातील निवडणुका होऊ शकत नाहीत, हे कटू असले तरी सत्य आहे. पाकिस्तान हे राष्ट्र आपल्या समस्यांशी झुंजत आहे. चारशे रुपये किलोने आटा विकला जात असताना पाकिस्तान आपले काही वाकडे करू शकेल, अशी अजिबात परिस्थिती नाही. गेल्या दहा वर्षांमधील सरकारने पाकिस्तानची नांगी पूर्णपणे ठेचून टाकली आहे आणि तो देश मृतप्राय अवस्थेला येऊन पोहोचला आहे. भारतामध्ये असलेल्या काही नागरिकांना पाकिस्तानचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे एखाद्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा कोणी घेऊन फिरले तर ती मोठीच बातमी होत असते. भारतात कोणते सरकार आले म्हणजे पाकिस्तान खूश होईल, यावरही भर दिला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news