तडका : कारभाराचा आधुनिक पॅटर्न | पुढारी

तडका : कारभाराचा आधुनिक पॅटर्न

प्रचंड गाजावाजा आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा नारा देणार्‍या दिल्ली राज्याच्या सरकारमधील मंत्र्यांची तिहार जेलमध्ये जाण्यासाठी रांग लागलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः साधारण 15 दिवसांपासून तिहार जेलमध्ये मुक्कामी असून, तिथूनच राज्याचा कारभार चालवत आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी राबविलेल्या राबडी पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्री महोदय अरविंद केजरीवाल हे सुनीता केजरीवाल हा नवीन पॅटर्न घेऊन आले आहेत. राबडीदेवी पॅटर्न हा अशिक्षित होता, तर सुनीतादेवी पॅटर्न हा सुशिक्षित आणि मॉडर्न आहे. काम करण्याची पद्धत तीच आहे. एखादा राजकीय नेता जेलमध्ये गेल्यानंतर जर त्याला पद सोडण्याची वेळ आली, तर हजारो कार्यकर्त्यांपैकी एकही विश्वासार्ह नसतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे जेलमध्ये गेल्यानंतर सूत्रे पत्नीच्या हातात देऊन तिला त्या पदावर बसवायचे आणि कारभार चालवायचा हे जसे लालूप्रसाद यांनी करून दाखवले, तसेच आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी करून दाखवले आहे.

तिहार जेल हे भारतातील प्रसिद्ध जेल असून, मोठमोठे गुन्हेगार तिथे वर्षानुवर्षे आयुष्यातील महत्त्वाचा काळ कंठत आहेत. केजरीवाल यांचे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणल्याचा दावा करणारे मनीष सिसोदिया नावाचे सहकारी गेली 6 महिने तिहार जेलमध्ये आहेत. त्याचबरोबर अन्य नेत्यांचीही ये-जा सुरू आहे. आपण आणि आपले सरकार वेगळे आहे, असे दाखवत केजरीवाल प्रकाशझोतात आले होते, ते अटक झाल्यानंतर थेट तिहार जेलमध्ये जाऊन बसले आहेत.

वास्तविक पाहता, दिल्लीकरांनी विश्वासाने त्यांच्या हातात राज्य सोपवले होते. तसेच पंजाबच्या मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सत्ता दिली. पंजाब आणि दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर केजरीवालांच्या आप पक्षाच्या जाहिराती देशभर झळकायला सुरुवात झाली, तेव्हाच खरे तर शंका आली होती की, इतका पैसे येतो कुठून? आता ज्ञात झाले आहे की, हा सगळा पैसा दारूच्या उद्योगातून म्हणजेच दारूचे परवाने वाटण्याच्या उद्योगातून कमावलेला आहे. केंद्रीय यंत्रणा देशातील सत्ताधारी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात, असा आरोप करणे सोपे आहे; परंतु त्याचबरोबर केजरीवाल आणि सहकार्‍यांना महिनोन् महिने जामीन मिळालेला नाही, हे तितकेच कठोर असे वास्तव आहे. एखादा घोटाळा बाहेर पडल्याबरोबर पेव फुटल्यासारखे अनेक घोटाळे बाहेर पडतात, हा सर्वांचा अनुभव आहे. आपच्या असंख्य राज्यसभा खासदारांनी आधीच वेगळा इरादा जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या

कुणाच्या घोषणा काही असोत, पण ‘फिर एक बार तिहार’ अशी आपची घोषणा दिसते आहे. जेल किंवा कारागृहे ही गंभीर गुन्हेगारांसाठी असतात, ती जर राजकीय लोकांनी भरायला सुरुवात झाली तर गुन्हेगारांनी जावे तरी कुठे, असा प्रश्न उभा राहू शकतो. एखादा मुख्यमंत्री किंवा पूर्ण मंत्रिमंडळ जर जेलमध्ये जाऊन काम करत असेल आणि तिथूनच काम करण्याचा हट्ट करत असेल तर ते राज्य चालणार तरी कसे, हा एक प्रश्नच आहे. पाणी फ्री, वीज फ्री अशा अनेक गोष्टी फ्री देणार्‍या घोषणा करून केजरीवाल सत्तेत आले; पण आता त्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना तिहार जेलमध्ये सर्व काही फ्री मिळत आहे, हा काळाने उगवलेला सूडच म्हणावा लागेल.

Back to top button