तडका : मजा आहे बुवा तुमची | पुढारी

तडका : मजा आहे बुवा तुमची

मतदार बंधू आणि भगिनींनो, सध्या तुमची चलती आहे. एरव्ही तुम्हाला पाच वर्षे कोणी विचारत नाही; पण निवडणुका आल्या की, तुम्ही ‘मतदार राजा’ होता. ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ हे खास तुम्हाला जागे करण्यासाठीच आहे. इलेक्शन खासदारकीची आहे; पण गेल्या पाच वर्षांत तुम्हाला न भेटलेला नगरसेवकसुद्धा या काळात घरी येऊन ‘काय काका, कसे आहात? काय काकू, कशा आहात?’ असे विचारणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, निवडणूक खासदारकीची आहे आणि नगरसेवक का आपल्या घरी चकरा मारतो आहे? चला तर, आधी त्याचे रहस्य समजून घेऊयात.

म्हणजे बघा, खासदारकीला आपल्या पक्षाच्या उमेदवाराला वॉर्डातून लीड मिळाली नाही तर पुढच्या नगरपरिषदेच्या इलेक्शनला तुला पक्षाचे तिकीट मिळणार नाही, असा सरळ सरळ दम वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकाला भरलेला असतो. नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवक हे दोघेही त्यामुळेच कामाला लागतात. त्यामुळेच म्हटले की, मजा आहे तुमची. कधी पाहायला न मिळणारे लोक तुम्हाला भेटायला येणार आहेत. मागच्या नगरपरिषदेच्या इलेक्शनला त्यांनीच तुम्हाला वॉर्डात गुळगुळीत रस्ते, 24 तास स्वच्छ पाणी, भूमिगत गटारे आणि तुमची काहीही समस्या असेल तर ती सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यातली किती आश्वासने पूर्ण झाली, ते पाहा आणि मग बघा, किती मजा आहे तुमची. सगळे प्रश्न जिथल्या तिथे आहेत. एक वेळ देशाच्या सीमांचा बंदोबस्त करता येईल; परंतु गावांच्या वाढणार्‍या सीमांना कोणीही काही करू शकत नाही. परवानगी असो, नसो, बांधकाम अवैध असो की वैध असो, बांधकामे वाढत चालली आहेत आणि शहरे पण चारी अंगांनी वाढत आहेत. अर्थात, अशी वाढ झाली म्हणजे नागरी समस्या आल्याच. त्यांचा सामना तुम्हालाच करावा लागतो. यानिमित्ताने नगरसेवक जर सापडले तर जरूर आपले प्रश्न सोडवून घ्या.

बाकी प्रचार सभांचा धडाका मात्र तुमच्या गावात जोरात सुरू आहे. मोठ्या-मोठ्या पक्षांचे टीव्हीवर पाहायला मिळणारे नेते तुम्हाला तुमच्या गावात पाहायला मिळत आहेत हे तुमचे भाग्यच नाही का? म्हणूनच म्हटले की, मजा आहे बुवा तुमची. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या रणरणत्या उन्हात सभेला जाईल तरी कोण? अहो, कोण जाईल म्हणजे काय? सभेला लाखोची गर्दी होते आणि तीही भर मी म्हणणार्‍या उन्हात होते. हे येणारे लोक काय वेडे आहेत की काय? अजिबात नाहीत. जेवणखाण, बिसलेरीचे थंडगार पाणी, नेण्या-आणण्याची सोय एवढे करून वर हजार रुपये माणशी देत असाल तरच येतो, या अटीवर ही गर्दी आलेली असते. अशी माणसे पुरविणारे कंत्राटदारसुद्धा आहेत. या काळात माणसे पुरविणारे कंत्राटदार करोडोने कमावत आहेत. शेवटी काय आहे ना, की नेता कोणीही येवो, गर्दी होणे महत्त्वाचे आहे. मग सकाळी जर एका पक्षाची सभा असेल तर हीच माणसे असतात आणि दुपारची दुसर्‍या पक्षाची सभा असेल तर त्या सभेला हीच माणसे असतात. मग मला सांगा, जर काही न करता नुसते तासभर काहीतरी ऐकण्याचे हजारभर रुपये मिळत असतील तर मग मजा नाही का? म्हणूनच म्हटले की, मजा आहे बुवा तुमची.

संबंधित बातम्या
Back to top button