चांदीच्या अर्थकारणाला झळाळी | पुढारी

चांदीच्या अर्थकारणाला झळाळी

प्रसाद पाटील

चालू वर्षात गुंतवणूकदारांचे चांदीमधील स्वारस्य लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे ‘सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 5,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या पांढर्‍या धातूच्या किमतीमध्ये जवळपास 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. मालमत्तेच्या वाटपामध्ये बहुतेकदा चांदी सोन्यासोबतच जोडली जाते; पण प्रत्यक्षात अनेक समानता असूनही, या दोन मौल्यवान धातूंचे प्रोफाईल खूप भिन्न आहेत.

सोन्याप्रमाणेच चांदीलाही महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षणाचे साधन मानले जाते. रोख रकमेची आवश्यकता असेल तेव्हा चांदीही सोन्याप्रमाणेच लागलीच विकली जाऊ शकते; परंतु सोने विकण्यासाठी किंवा त्यावर कर्ज घेण्यासाठी अधिक पारदर्शक कॉर्पोरेट यंत्रणा आहे, तशा प्रकारची व्यवस्था चांदीसाठी उपलब्ध नाही. आपला देश हा जगातील सर्वात मोठा चांदीचा ग्राहक आहे. भारतात सोन्याप्रमाणेच चांदीचीही मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. यापैकी बहुतांश चांदी पश्चिम आशियातून आयात केली जाते. या आयातीवर 12 ते 15 टक्के शुल्क आकारले जाते. सोन्याप्रमाणेच चांदीचाही अमेरिकन डॉलरशी विपरीत संबंध आहे; कारण त्याच्या आंतरराष्ट्रीय किमती डॉलरमध्ये निर्धारित केल्या जातात. साहजिकच जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा चांदीच्या किमतीत घसरण दिसून येते.

असे असले तरी चांदीचा औद्योगिक क्रियाकलापांमधील वापर मोठा आहे. निम्म्याहून अधिक चांदीचा वापर औद्योगिक गरजांसाठी केला जातो. येत्या काळात ही मागणी वाढण्याची शक्यता आहे; कारण ती आरोग्य सेवा आणि ग्रीन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. चांदी ही वीज आणि उष्णतेची उच्च वाहक आहे. सोल्डर, वेल्डिंग आणि ब्रेझिंगमध्ये चांदीचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. त्याचप्रमाणे बॅटरी आणि दंतचिकित्सेच्या क्षेत्रामध्ये कच्चा माल म्हणूनदेखील चांदी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. याखेरीज औषधे, सौरऊर्जा, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिटेक्शन चिप्स, सेमी कंडक्टर्स, सेलफोन टच स्क्रीन, जलशुद्धीकरण यंत्रणा इत्यादींमुळे चांदीची मागणी वाढत आहे. केवळ सौरऊर्जा/फोटो व्होल्टेईक उद्योगांद्वारे असलेली मागणी 12 टक्के वार्षिक दराने वाढत आहे. मायक्रो चिपच्या क्षेत्रातही चांदीचा वापर वेगाने वाढत आहे. त्याचप्रमाणे, जलशुद्धीकरण प्रणाली आणि इतर जीवाणूरोधक अ‍ॅप्लिकेशन्सची मागणीदेखील वेगाने वाढत आहे. या सर्व उद्योगांमध्ये येणार्‍या काळात मोठी वाढ होणार आहे.

चलनवाढीचा मुकाबला करण्याच्या क्षमतेमुळे सोने हे आर्थिक चक्राशी जोडलेले आहे; परंतु अनेक प्रकारच्या औद्योगिक उपयोगांमुळे चांदी ही मायक्रो इकॉनॉमीशी अधिक जोडली गेलेली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये चांदीला स्थान देणे गरजेचे असल्याचे मत बहुतांश गुंतवणूकतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. साधारणतः पोर्टफोलिओच्या 5 ते 10 टक्के गुंतवणूक चांदीमध्ये असावी. नजीकच्या काळात चांदीचे भाव घसरू शकतात; पण दीर्घकालीन विचार करता चांदीतील गुंतवणूक ही दमदार परतावा देणारी ठरेल. विशेषतः वर नमूद केलेल्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणांमुळे गुंतवणूकदारांचे चांदीमधील स्वारस्य कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतीयांमध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांना फार महत्त्व आहे. आता सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले असले तरी लग्नासारख्या सोहळ्यात या दागिन्यांची नक्की खरेदी केली जाते; पण आता हे दर इतके वाढले आहेत की, सर्वसामान्यांच्या ते आवाक्याबाहेरील आहे. श्रीमंत लोकच यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. भविष्यातही दर नेहमीच वाढतच राहणार असल्याने सर्वसामान्यांसाठी ते दिवास्वप्नच ठरेल, यात मात्र काहीच शंका नाही.

Back to top button