तडका : निसर्ग प्रेरणा…! | पुढारी

तडका : निसर्ग प्रेरणा...!

नवीन पिढीतील प्रिय दादा आणि ताई, तुम्ही तरुण आहात म्हणून खूप काळजी वाटते. टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारांमुळे जगण्याची आसक्ती कमी होत जाते. शिवाय तुमचे ते रात्र-रात्र अगदी पहाटे पाच वाजेपर्यंतचे मोबाईल पाहणे हे सर्व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. थोडे आजूबाजूला निसर्गात पाहा, जो आपल्याला आहे त्या परिस्थितीत जगण्याची प्रेरणा देत असतो.

साधे गुलमोहराचे उदाहरण घे ताई. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऊन तापायला लागते, सूर्यनारायण आग ओकायला लागतात, उन्हाचे बॉयलर उष्णता फेकायला लागतात, त्याच वेळेला गुलमोहराचे पाहिले फूल प्रकट होते. जसजसे ऊन वाढत जाते, तसतसा गुलमोहराला बहर यायला सुरुवात होते. मे महिन्यामध्ये तापमान जेव्हा सर्वात अधिक असते, त्यावेळी गुलमोहर पूर्ण बहरलेला असतो आणि फुलांच्या सावलीचा शीतल गारवा येणार्‍या-जाणार्‍या लोकांना देत असतो.

विपरीत परिस्थितीमध्ये फुलण्याची क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे, असे निसर्ग आपल्याला सांगत असतो आणि आपण डिप्रेशनच्या गोष्टी घेऊन बसतो. अशीच परिस्थिती बहावा या झाडाचीही असते. प्रखर उन्हाळ्याला न जुमानता बहरणारे दोन वृक्ष म्हणजे बहावा आणि गुलमोहर. त्याचप्रमाणे चाफा, पळस आणि अशा असंख्य वनस्पती यांनी बहरण्यासाठी उन्हाळा या ऋतूची का निवड केली असेल, हे समजून घे दादा. सर्वकाही अनुकूल असेल तर कोणीही कर्तृत्व दाखवू शकेल; पण काहीच अनुकूल नसताना म्हणजे पाण्याची कमतरता, थेट डोक्यावर पडणारे तीव्र ऊन यांना जुमानता बहरणारे हे वृक्ष प्रेरक व्याख्याने देणार्‍या वक्त्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे तुझ्याही लक्षात येईल; पण तुला आजूबाजूला पाहायचेच नाही, मग निसर्गातील मोटिव्हेशन तुला कळणार तरी कसे?

संबंधित बातम्या

संकटाशी झुंज देत बहरण्याची ही प्रवृत्ती बघितलीस तर तुला कधीच डिप्रेशन येणार नाही ताई. त्यासाठी मोबाईल स्क्रीनवरची नजर हटवून थोडे निसर्गाकडे पाहण्याची पण सवय लावून घे. खूप ऊन वाढले म्हणून सूर्याकडे बघत बसू नकोस. प्रखर तापमानाला तोंड देत बहरणार्‍या नाजूक फुलांच्या गुलमोहराकडे बघ, तुझे टेन्शन आणि डिप्रेशन पार पळून जाईल. असेच आणखी एक उदाहरण. प्रशस्त हायवेवरून दुतर्फा वाहने धावत असतात. दोन्ही बाजूंच्या चौपदरी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर असतात. त्या डिव्हायडरमध्ये काळी माती टाकून झाडे लावण्याचा नियम असतो म्हणून कंत्राटदाराने निर्विकारपणे कन्हेरीसारखी रोपे लावलेली असतात.

येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनाच्या वेगामुळे वारे वाहते आणि ही रोपे दिवस-रात्र अक्षरश: वेडीवाकडी झुलत असतात; पण तू पाहिलेस दादा, तरीही ती मूळ धरतात आणि मोठी होतात, पण मोडत नाहीत कधीच. आणि हो भाऊ, त्यांना फुले पण येतात. बहर आला की, बहरून जातात ती. चोवीस तास थापडा खाऊन न डगमगता जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा निसर्ग देत असतो ताई. सर्वात पॉवरफुल मोटिव्हेशन निसर्गातच असते आणि आपण इकडे पैसे भरून मोटिव्हेशनल स्पीकर्सची भाषणे ऐकतो. ऐकण्यात आणि शिकण्यात फरक असतो भावा. काळजी घे. माणूस निराश झाला की, तो सैरभैर होतो. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते; पण निसर्गच मोठा आधार असतो आणि तोच आपणाला जगण्यासाठी प्रेरित करत असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

Back to top button