काँग्रेस-राजदचे अडले घोडे! | पुढारी

काँग्रेस-राजदचे अडले घोडे!

लोकसभा निवडणुकीसाठी विविध राज्यांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आघाड्यांमधील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. त्याचवेळी विविध पक्षांतील मतभेद समोर येऊ लागले आहेत आणि त्याला बिहारचाही अपवाद नाही. या राज्यात भाजप आणि नितीशकुमार यांचा जदयू आघाडीचे सरकार असून, आघाडीत फारसा पेच नाही; मात्र विरोधी आघाडीचे घोडे अडले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राज्यव्यापी यात्रेस राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत तेजस्वी यांच्या भाषणाने सभेची रंगत वाढवली. तरीही काँग्रेस आणि राजद या दोन घटक पक्षांमध्ये वाद रंगला असल्याचे दिसते.

राजदने मित्रपक्षांशी सल्लामसलत न करता, पहिल्या टप्प्यासाठी लोकसभेच्या उमेदवारांच्या चार जागा जाहीर करून टाकल्या, त्यामुळे काँग्रेस नेते संतापले आहेत. राजदने औरंगाबादमधून अभय कुशवाह यांना तिकीट जाहीर केले. तेथून माजी खासदार निखिलकुमार यांना तिकीट देण्याची काँग्रेसची इच्छा होती. निखिलकुमार दिल्लीचे निवृत्त पोलीस आयुक्त असून, ते नागालँडचे माजी राज्यपालही आहेत. त्यांचे वडील सत्येंद्रनारायण सिन्हा बिहारचे मुख्यमंत्री होते आणि 1971 ते 1984 पर्यंत ते औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तसेच 1999 ते 2004 या काळात याच मतदारसंघातून त्यांच्या पत्नी श्यामा या खासदार म्हणून निवडून आल्या. बेगुसराई येथून काँग्रेसच्या ’एनएसयूआय’चे प्रमुख कन्हैयाकुमार यांना तिकीट देण्याची काँग्रेसची इच्छा होती. गेल्या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवडणूक लढवून कन्हैयाकुमार दुसर्‍या स्थानी आले होते; परंतु आता माजी आमदार अवधेश राय भाकपतर्फे तेथून उभे राहणार आहेत आणि त्यास राजदची सहमती आहे.

भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी नुकतीच राजदचे प्रमुख लालूप्रसाद तसेच तेजस्वी यांची भेट घेतली होती. एकेकाळचे बाहुबली राजनेता पप्पू यादव 2004 ची पोटनिवडणूक आणि 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मधेपुरातून राजदचे खासदार म्हणून विजयी झाले होते. त्यांनी पूर्णिया येथून 1991 मध्ये अपक्ष म्हणून, 1996 मध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून आणि 1999 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यांनी आपला ‘जन अधिकार पक्ष’ काँग्रेसमध्ये विलीन केला असून, त्याबाबत राजदने नाराजी व्यक्त केली आहे. पप्पू यांचे लालू कुटुंबीयांशी कडू-गोड संबंध आहेत. यावेळी त्यांच्यासाठी मधेपुरा किंवा पूर्णिया हे मतदारसंघ सोडणार नसल्याचे राजदने जाहीर करून टाकले आहे. पप्पू यांच्या पत्नी रणजितरंजन या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आहेत.

सीमांचल आणि कोसी विभागात त्यांचा प्रभाव आहे. लालू यांच्या घराणेशाहीविरुद्ध पप्पू यादव टीका करत असल्यामुळेच काही वर्षांपूर्वी त्यांना राजदने पक्षातून हाकलून लावले होते. सध्या राजद उमेदवारांची नावे परस्पर घोषित करून पक्षाचे चिन्हही वाटत सुटला आहे, याबाबत कटिहारचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते तारीक अन्वर यांनी टीका केली आहे. दुसरीकडे बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह यांनी लालूंना प्रदेश कार्यालयास भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. बिहारमध्ये अन्य जागांवरूनही काँग्रेस आणि राजदमध्ये हाणामार्‍या सुरू आहेत. वास्तविक इंडिया आघाडीच्या द़ृष्टिकोनातून महाराष्ट्राप्रमाणे बिहारलाही अधिक महत्त्व आहे. दोन्ही राज्ये मोठी असून, तेथे आघाडीला तुलनेने अधिक यश मिळेल, अशी अपेक्षा आहे; परंतु महाराष्ट्रात आघाडीतील मतभेद वारंवार समोर येत असून, बिहारमध्येही जागावाटपावरूनच संघर्ष वाढल्यास त्याचा इंडिया आघाडीस फटका बसू शकतो. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जदयूने स्वबळावर 38 जागा लढवल्या आणि केवळ दोनच जागा जिंकल्या. जदयूला 16 टक्के मते मिळाली. भाजपप्रणीत एनडीएला 31 जागांवर विजय मिळाला आणि 39 टक्के मते प्राप्त झाली, तर राजद-काँग्रेस आघाडीला 30 टक्के मते मिळून केवळ सात जागांवर विजय मिळवता आला होता.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता शिखरावर होती आणि त्याच्या परिणामी एनडीएने बिहारमधील 40 पैकी 39 जागांवर यश मिळवले. तेव्हा भाजप व जदयूला अनुक्रमे 17 व 16 ठिकाणी जागा जिंकत्या आल्या, तर लोकजनशक्ती पक्षास सहा जागांवर विजय मिळाला. एक जागा काँग्रेसने जिंकली; मात्र लालूंच्या पक्षाच्या पदरात भोपळा आला होता. म्हणजे 2019 मध्ये काँग्रेस, हिंदुस्तानी अवामी मोर्चा, राष्ट्रीय लोक मोर्चा अशा अनेकांची मोट बांधूनही, या महागठबंधनास एकाच ठिकाणी यश मिळाले. आता हिंदुस्तानी अवाम मोर्चा तसेच उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा यांनी पलटी मारून एनडीएत प्रवेश घेतला आहे. एनडीएने जागावाटपही जाहीर करून टाकले आहे.

भाजपने नितीशकुमार यांच्याशी असलेले मतभेद मिटवून, अलीकडेच त्यांना बाजूला खेचून घेतले. तसे केले नसते, तर बिहारमध्ये अल्प यश मिळण्याची भीती भाजपला वाटत होती. कदाचित त्याचा फटका जदयूबरोबरच भाजपलाही बसू शकतो; परंतु तरीही एनडीएने जाहीरपणे वाद करण्याचे टाळलेले आहे. आणखी एक बाब म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले; परंतु तरीही 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 243 पैकी केवळ 125 जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी भाजपने पुन्हा नितीशकुमार यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्री केले; परंतु 2021 मध्ये नितीशकुमार यांनी भाजपला टांग मारत, राजदबरोबर सरकार स्थापन केले होते. मग पुन्हा त्यांनी लालू-तेजस्वी यांना दगा देऊन भाजपला आलिंगन देत सरकार स्थापन केले. अशावेळी नितीशकुमार यांच्या विरोधात वातावरण तापवण्याची संधी इंडिया आघाडीला आहे. या राज्यातील निवडणूक लक्षवेधी होणार हे स्पष्ट आहे. भाजप आघाडीने केलेली जय्यत तयारी आणि केवळ जनमतावर भिस्त असलेली इंडिया आघाडी यापैकी मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, हे पाहावे लागेल.

Back to top button