Stray Dogs : आता कुत्र्यांचीच अभयारण्यं करूया! | पुढारी

Stray Dogs : आता कुत्र्यांचीच अभयारण्यं करूया!

श्रीराम ग. पचिंद्रे

भटक्या कुत्र्यांनी सर्वत्रच उच्छाद मांडलेला आहे. आता एक तर शहरातील- गावातील सर्व कुत्र्यांना पकडून विविध भागांतील अरण्यांत सोडून द्यावं, म्हणजे बिबट्या-तरसांना त्यांचं खाद्य उपलब्ध होईल. ही हिंसा आहे असं कुणाला वाटत असेल, तर कुत्र्यांचीच अभयारण्यं निर्माण करून सगळी कुत्री तिथं सोडावीत म्हणजे श्वानप्रेमी लोक तिथं जाऊन कुत्र्यांना अन्न देऊ शकतील…

शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी यांसारख्या उपयुक्त जनावरांवरही कुत्री हल्ले करतात. ही कुत्री रात्री-अपरात्री रस्त्यानं जाणार्‍या लोकांवर हल्ले करतात, त्यांचे चावे घेतात, कपडे फाडतात, मागे धावतात. माणसांच्या टोळ्यांप्रमाणेच कुत्र्यांच्याही टोळ्या असतात. अशा दोन टोळ्यांतील कुत्र्यांच्या मारामार्‍या माणसासाठीही घातक ठरतात. रस्त्यावरून अचानक आडवं जाण्याचीही कुत्र्यांना मोठी खोड असते. त्यामुळं दुचाकी वाहनधारकांचे अनेक अपघात होतात. अशा अपघातात डोक्यावर आपटल्यानं अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. त्याच अपघातात कुत्र्यांनाही गंभीर इजा होते आणि जखमी स्थितीत भटकत राहतात. त्यांच्यावर कुणीही इलाज, औषधोपचार करत नाही. ही जखमी कुत्री वेदनांनी कळवळत माणसांवर हल्ले करतात.

देशात सध्या 7 कोटी 99 लाख भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. एके काळी ज्या त्या शहरांची महापालिका, नगरपालिका कुत्र्यांना विष देऊन मारत असे; परंतु हा प्रकार अमानुष म्हणून मनेका गांधी यांनी कुत्री, माकडं अशा प्रचंड वाढणार्‍या, उपद्रवी ठरणार्‍या प्राण्यांनाही विष घालून किंवा अन्य मार्गांनी ठार मारण्यावर कायद्यानं बंदी आणली. प्रत्येक शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव भयानक वाढलेला आहे. त्यांची संख्या गणिती श्रेणीनं वाढत असते. कुत्र्याचं पिल्लू वयात आल्यावर त्याला आपली आई आणि बहीण ओळखत नाही. त्यामुळे कुत्र्याची प्रत्येक मादी कोणत्याही नराच्या पिल्लांना जन्म देते.

एकावेळी पाच ते सात पिल्लं कुत्रीला होत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचं ‘उत्पादन’ होत असतं. त्यामुळं गल्लोगल्ली कुत्र्यांची संख्या विपुल प्रमाणावर वाढत असते. या कुत्र्यांना कुणीही कधीही दंशविषप्रतिबंधक सुया टोचत नाहीत. त्यामुळं त्यांचा दंश हा माणसाला जीवघेणा ठरू शकतो. आता दुसरा भाग असा की, जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर माणसानं अतिक्रमण केल्यामुळं ते प्राणी नागरी वस्तीत प्रवेश करायला लागले आहेत. जंगलातील मांसभक्षी प्राण्यांचं नैसर्गिक खाद्य नष्ट होत चालल्यानं हे प्राणी सैरभैर झाले आहेत. चोरट्या शिकारींमुळं, जे मांसभक्षी प्राण्यांचा आहार असतात, असे तृणभक्षी प्राणी संपत चालले आहेत. त्यामुळं वाघ, बिबट्या, तरस यांसारखे प्राणी नागरी वसाहतीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडतात.

ही गावठी कुत्र्यांची नवी पिलावळ जन्माला आल्यावर लोकांनी घरोघरी ही कुत्र्याची पिल्लं पाळायला न्यावीत, त्यांचं अन्नपाणी, औषधं, लसी टोचणं हे सगळं वेळच्या वेळी करत राहावं. असं झाल्यास प्रत्येक कुत्र्याला पालकत्व मिळेल आणि ती भटकत राहून माणसांना त्रास देणार नाहीत. तसेच आणखी एक उपाय असा की, ही सगळी भटकी कुत्री पकडायची आणि जंगलात नेऊन सोडायची, ज्यायोगे वाघ, बिबट्या, तरस यांसारख्या प्राण्यांना त्यांचं नैसर्गिक खाद्य मिळेल. त्यामुळं हे वन्यप्राणी मानवी अधिवासात येणार नाहीत आणि कुत्र्यांमुळे माणसाला होणारा त्रासही आपोआपच टळेल. यात क्रौर्य आहे, असे काहीजण म्हणतील; पण तसे काही नाही. निसर्गाचं चक्र त्यामुळं अबाधित राहणार आहे. छोटे प्राणी खाऊन कुत्री जगतील आणि कुत्र्यांना खाऊन मोठे प्राणी जगतील. वन्यजीवन आणि माणूस यांचं संतुलन साधेल! हेही मान्य नसेल, तर नुसत्या कुत्र्यांचीच अभयारण्यं देशाच्या विविध भागांत करूया. तिथं त्या-त्या भागातली सगळी कुत्री सोडून द्यावीत. त्यांच्या खाद्याची सगळी व्यवस्था तिकडेच करावी, म्हणजे कुत्री म्हणजे नागरी वसाहतीतील कुत्र्यांच्या उच्छाद बंद होईल.

Back to top button