शाहबाज यांची वल्गना | पुढारी

शाहबाज यांची वल्गना

पाकिस्तानातील लोकशाहीचा आणखी एक अंक पार पडला असून, पीएमएल-नवाज पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांनी कायदे मंडळात बहुमत सिद्ध करून दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ई-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे नेते ओमर अयूब यांचा शाहबाज यांनी 201 विरुद्ध 92 मतांनी पराभव केला आहे. 8 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीनंतर प्रत्यक्ष सरकार अस्तित्वात येण्यास तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ लागावा, यावरूनच पाकमधील लोकशाहीची काय अवस्था झाली आहे, हे दिसून येते. वास्तविक निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात पीटीआयने देशभर मोर्चे काढले होते; परंतु लाहोरमध्ये पंजाब प्रांताच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी पीटीआय समर्थकांची धरपकड करण्याचे आदेश दिले होते.

पाकिस्तानातही घराणेशाही असून, शरीफ आणि भुत्तो घराणे ही त्याची दोन प्रमुख उदाहरणे आहेत. लष्कराच्या मदतीनेच शाहबाज यांचे सरकार आले असून, यापूर्वी इम्रान यांना लष्करानेच पंतप्रधानपदी बसवले आणि नंतर मतभेद निर्माण होताच त्यांना त्या पदावरून हुसकावलेही. वास्तविक या निवडणुकीत पीटीआयने पाठिंबा दिलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आले. दुसर्‍या क्रमांकावर पीएमएल-नवाज आणि तिसर्‍या क्रमांकावर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) राहिले. एकमेकांचे शत्रू असलेले पीएमएल-नवाज आणि पीपीपी हे पक्ष सत्तेसाठी नाइलाजाने एकत्र आले आहेत.

पीपीपीने पंतप्रधानपदाचे उमेदवार शाहबाज यांना मतदान करण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात आसिफ अली झरदारी यांना राष्ट्राध्यक्षपद देऊ केले. शरीफ यांचे कुटुंब हे काश्मीरमधील अनंतनागचे असून, व्यवसायासाठी ते अमृतसरमध्ये स्थलांतरित झाले आणि तेथून ते लाहोरला आले. शाहबाज यांचे आजोळ काश्मीरच्या पुलवामा येथील आहे. पाकिस्तानात इत्तेफाक समूह हा पोलाद, साखर, कापडासारख्या अगणित क्षेत्रांत कार्यरत असून, हा समूह शाहबाज यांचाच आहे. आर्थिकद़ृष्ट्या दिवाळखोर असलेल्या पाकिस्तानातील बहुतेक नेते हे बडे जमीनदार, सरंजामदार अथवा उद्योगपती आहेत, हे विशेष! वडील बंधू नवाज यांच्या मदतीनेच शाहबाज यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या अगोदर औद्योगिक संघटनांमध्ये त्यांनी काम केले आणि 1988 मध्ये सर्वप्रथम ते पंजाब विधानसभेत निवडून आले होते.

नवाज हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले, त्याचवेळी म्हणजे 1990 मध्ये शाहबाज कायदे मंडळात निवडून आले. लष्कराशी तणातणी झाल्यामुळे नवाज यांना 1993 मध्ये पंतप्रधानपदाचा त्याग करावा लागला. त्याचवर्षी शाहबाज पंजाब विधानसभेत परतले. शाहबाज हे पुढे पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दोन वर्षांतच पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केला. नवाज हे पंतप्रधान असतानाच मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली. त्यावेळी भारताने पकिस्तानला चोप दिला; परंतु नवाज यांना अटकेत टाकून मुशर्रफ यांनी सत्ता हाती घेतली. मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण केले आणि दहशतवादी कृत्ये केली, असे बोगस आरोप नवाज यांच्यावर ठेवले होते. त्यावेळी शाहबाज यांनाही अटक केली होती. त्यानंतर यथावकाश पाक लष्कराने शरीफ बंधूंना माफी देऊन त्यांना सौदी अरेबियाला धाडले.

मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असताना, आग्रा येथे भारत-पाकिस्तान शिखर परिषद झाली. त्यावेळी वाजपेयी यांच्यासारखा सहिष्णुतावादी नेता भारताच्या पंतप्रधानपदी होता; परंतु मुशर्रफ यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे आग्रा परिषद असफल ठरली. पुढे 2007 मध्ये शरीफ बंधू पाकिस्तानात परतले आणि त्यानंतरच्याच वर्षात झालेल्या निवडणुकांत पीएमएल-नवाजने उत्तम कामगिरी बजावली. शाहबाज पंजाबचे पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2013 मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत जबरदस्त यश मिळाल्यानंतर नवाज हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले, तर शाहबाज यांनी पुन्हा पंजाब प्रांताचा सत्ताशकट सांभाळला. 2018 मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत पीएमएल-नवाजने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शाहबाज यांनाच प्रोजेक्ट केले होते; परंतु त्यावेळी पीटीआयचा विजय होऊन इम्रान पंतप्रधान बनले आणि शाहबाज यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली.

चार वर्षांपूर्वी शाहबाज यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाली आणि ते सात महिने जेलमध्ये राहिले. मुख्यमंत्री असताना एन्काऊंटर्स घडवून आणल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवला होता. इम्रान यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून शाहबाज यांनी अविश्वास ठराव आणला होता आणि अशा प्रकारे इम्रान सरकारला हटवून ते गेल्या वेळी प्रथम पंतप्रधान बनले होते. इम्रान यांनी अमेरिका आपल्या सरकारच्या विरोधात असल्याचा आरोप केला होता. म्हणजेच अमेरिका व लष्कर यांचे शाहबाज हे प्यादे आहेत, असेच त्यांना म्हणायचे होते. लष्कराला आवडेल असे बोलणे आणि तशी धोरणे राबवणे, ही शाहबाज यांची खासियत आहे. त्यामुळे कायदे मंडळात केलेल्या पहिल्याच भाषणात शाहबाज यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करून, काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी ठराव आणण्याची वल्गना केली.

वास्तविक जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तेथील एक इंचही जमीन घेणे कोणाच्या बापालाही शक्य नाही, हे शाहबाज यांना पक्के ठाऊक आहे; परंतु भारताच्या विरोधात गरळ ओकली की, पाकिस्तानात वाहवा होते आणि विशेषतः लष्कर खूश होते, हे इतरांप्रमाणे शाहबाज यांनाही माहीत असावे. मात्र, त्यांनी प्रथम सरकार किती दिवस टिकते, याची चिंता करावी आणि पाकव्याप्त काश्मीर या भागावर भारताचाच हक्क आहे, हे लक्षात ठेवावे. आज ना उद्या पाकव्याप्त काश्मीर भारताच्याच ताब्यात येणार आहे. भारताकडे वाकडी नजर वळवली, तर पाकिस्तानचे तीन तेरा वाजतील, हे शाहबाज आणि त्यांचे मोठे बंधू नवाज तसेच मित्रपक्ष पीपीपीचे नेते बिलावल भुत्तो यांनी पक्के ध्यानात ठेवावे.

Back to top button