मॉल संस्कृती आणि ग्राहक | पुढारी

मॉल संस्कृती आणि ग्राहक

सूर्यकांत पाठक

भारतात आकारास आलेल्या मॉलनी ग्राहकांच्या जीवनशैलीत कायापालट केला असून, ही बाब खरी आहे. त्याचवेळी किरकोळ बाजारातील व्यावसायिक एकवटण्यास आणि अधिक संघटित होण्यास मदत मिळाली आहे. मॉलमुळे भारतीय ग्राहकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे.

लोकसंख्येतील वाढ, अपेक्षांमधील बदल आणि तंत्रज्ञानातील विकासाचा वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर आणि विक्रीच्या शैलीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. या संक्रमणात ग्राहकांविषयी व्यक्त होणारा भावनिक ओलावा क्रमशः कमी-कमी झाल्याचे दिसून येत असले, तरी सेवा-सुविधांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, हे मान्य करावे लागेल. पूर्वीच्या काळी गल्लीतल्या किराणा दुकानदाराला सर्व ग्राहकांची नावे तोंडपाठ असायची. एवढेच नव्हे, तर प्रत्येक ग्राहकाचा नोकरीधंदा काय आहे, त्याच्या घरात किती माणसे आहेत, मुले काय शिकतात, हेही त्याला ठाऊक असायचे.

दुकानात गेले की, घरगुती भाषेत ग्राहकाचे स्वागत होत असे. वर्तमानपत्राच्या त्रिकोणी घडीत डाळ, साखर घेऊन पुड्याच्या दोर्‍याने बांधता-बांधता घरातल्या वयोवृद्ध, आजारी व्यक्तींच्या तब्येतीची विचारपूस दुकानदाराकडून आस्थेने केली जायची. मुलांना किती मार्क पडले, हेही तो विचारायचा. नोकरदारांना महिन्यातून एकदाच उत्पन्न मिळते; मात्र दुकानाची पायरी त्याला जवळजवळ रोज चढावी लागते, हे माहीत असल्यामुळे नियमित ग्राहकांची ‘खाती’ दुकानदाराकडे असायची. मालाची यादी घेऊन लहान मुलांना दुकानात पाठवले जायचे. दुकानदार त्याच्याकडच्या पिशव्या काऊंटरवरून आत घेऊन माल बांधून होईपर्यंत लहान मुलांना चॉकलेट-गोळ्या द्यायचा.

रावळगावचं कडक चॉकलेट, पारलेचे मऊ चॉकलेट, लिमलेटच्या गोळ्या आणि पेपरमिंट एवढीच ‘व्हरायटी’ उपलब्ध असायची. तेथून ते मॉल संस्कृतीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपला बराच काळ गेला आहे. एकेकाळी वेगवेगळ्या सामानासाठी वेगवेगळ्या दुकानांवर जावे लागत असे. हळूहळू सुपर बाजार मॉलमध्ये परावर्तित झाला. मॉल संस्कृती ही वास्तविक लोकांची मानसिकता लक्षात घेऊन अस्तित्वात आणली आहे. मॉल हे पूर्णपणे ग्राहकांना आकर्षित करण्याचे केंद्र बनले असून, त्यानुसारच रचना केली आहे. मॉलबाहेरच खाण्यापिण्याचे स्वादिष्ट पदार्थ, चटपटीत, मसालेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना अधिक आकर्षित करणारे असतात. मॉल संस्कृती नावानुसार प्रत्येक लहान गोष्टीला व्यापक रूपातून आणि आकर्षक पद्धतीने सादर करत असते. एवढेच नाही, तर मॉलचे नावही मोठे आणि उठावदार दिसेल या पद्धतीने लावण्यात येते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या नजरेत मॉलचे नाव कोठूनही दिसते आणि ते नजरेत भरते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि त्याकडे सहजासहजी कोणाचे लक्ष जात नाही आणि ती म्हणजे मॉलला जाण्यासाठी वेळेचे बंधन नसणे. कोणत्याही मॉलमध्ये घड्याळ नसते, यामागचा उद्देश ग्राहकांना वेळेच्या बंधनापासून दूर नेणे, जेणेकरून आपण मॉलमध्ये पाऊल टाकू तेव्हा आपल्याला वेळेचे भान राहणार नाही. जोपर्यंत आपला खिसा रिकामा होत नाही, तोपर्यंत शॉपिंग करण्याची मानसिकता तयार करण्याचे काम मॉलच्या वातावरणाकडून केले जाते. मॉल संस्कृतीने भारतीय खरेदीच्या पद्धतीने क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे, असे आपण म्हणू शकतो.

एखाद्या दुकानात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत खरेदी करण्याऐवजी वातानुकूलित मॉलमध्ये खरेदीचा आनंद लुटला जात आहे. मॉलमध्ये खरेदी केल्याने ग्राहकांना चांगले, गुणवत्तापूर्ण, ब्रँडेड उत्पादन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळे समाधान लाभते. शॉपिंग मॉलनी भारतात नवीन संस्कृतीला जन्म दिला आहे. ही संस्कृती पारंपरिक खरेदी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भारतात उत्पन्न वाढल्याने बाजारपेठ क्षेत्रात लोकांना काम करण्याची संधी नव्याने उपलब्ध होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनशैलीत सुधारणा आणि बदल झालेला आहे. मॉलमुळे भारतीय ग्राहकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. किरकोळ बाजार संघटित होण्यास मदत मिळत आहे.

Back to top button