पाकिस्तानला हिसका | पुढारी

पाकिस्तानला हिसका

जवळपास दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धास सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात ‘हमास’ने इस्रायलला लक्ष्य केल्यानंतर गाझापट्टीत धुमश्चक्री उडाली. आता नवीन वर्षाची सुरुवातच इराण विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चकमकींच्या रूपाने झाली आहे. इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील ‘जैश-अल-अदल’च्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले. या दहशतवादी संघटनेने इराणमध्ये आमच्या विरोधात कारवाया सुरू केल्या होत्या आणि त्यात आमचे काही जवान मारले गेले. म्हणूनच आम्ही प्रत्याघात केला, असा खुलासा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी केला आहे. हा हल्ला झाला तेव्हा ते स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेस उपस्थित होते. या हल्ल्याचा आणि गाझामधील युद्धाचा काहीही संबंध नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे; मात्र पाकिस्ताननेही लगेचच दहशतवाद्यांवरील कारवाईच्या नावाखाली इराणच्या हद्दीत सिस्तान आणि बलुचिस्तान भागात क्षेपणास्त्रांचा मारा केला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या इराणमधील दोन संघटनांच्या तळांवर हल्ले केले.

बलुचिस्तान या पर्वतीय भागाचा विस्तार पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांत असून, दोन्हीकडे दहशतवाद्यांचा धिंगाणा सुरूच असतो. पाकिस्तानने लगोलग इराणमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावून घेतले. वास्तविक आमची कुरापत काढू नका अन्यथा गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असे इराणने यापूर्वी बजावले असतानाही पाकिस्तान सरकारने ‘जैश-अल-अदल’ला वेसण घातलेली नव्हती. आमच्या सार्वभौमत्वावर कोणी घाला केल्यास ते सहन करणार नाही, असे पाकिस्तानने म्हटले असले, तरी अशी भूमिका घेण्याचा पाकला नैतिक अधिकार नाही. दशकानुदशके भारताच्याच असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवताना आपण भारताच्या सार्वभौमत्वास ललकारत आहोत, असे निर्लज्ज पाकला कधीही वाटले नाही. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, हे जगाला माहिती आहे. त्यामुळे यापूर्वी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून थेट यमसदनास पाठवून दिले. एवढेच नव्हे, तर भारताने पाकिस्तानात शिरून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

पाकिस्तान आणि इराणमध्ये सुमारे 900 किलोमीटरची सीमारेषा आहे. इराण हे शियाबहुल राष्ट्र आहे, तर पाकिस्तानात 85 टक्के सुन्नी आहेत. इराणममधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतांत राहणार्‍या, तेथील अल्पसंख्याक असलेल्या सुन्नी समुदायाबाबत इराण पक्षपात करत असल्याची तक्रार आहे. अशा प्रकारची भावना रुजल्यामुळेच त्यामधून जैश-अल-अदल ही संघटना निर्माण झाली. इराणमधील सिस्तान व बलुचिस्तान प्रांतांलगतच पाकिस्तानातील बलुचिस्तान आहे. वेगवेगळ्या देशांत; परंतु एकमेकांच्या शेजारी असलेल्या या दोन बलुचिस्तानांमध्येच सतत हाणामार्‍या सुरू असतात. पाक वंशाचे काही दहशतवादी इराणमध्ये राहून आमच्याच विरोधात कारवाया करतात, आम्ही त्यांची माहितीही इराणला दिली आहे; परंतु इराण सरकार त्यांच्या विरोधात कृती करण्यास तयार नाही, ही पाकिस्तानची तक्रार आहे. उलट गेल्या दहा-अकरा वर्षांपासून जैश-अल-अदलने इराणमध्ये घुसून अनेक सैनिक मारले आहेत.

सात वर्षांपूर्वी इराणमधील मीरजावेहवर ‘जैश’ने हल्ला केला होता आणि त्याची जबाबदारीही स्वीकारली होती. 2018 मध्ये इराणी सुरक्षादलाच्या 12 जवानांचे अपहरण करण्यात आले होते. त्याचीही जबाबदारी ‘जैश’नेच स्वीकारली होती. इराणमधील रस्क शहरावर हल्ला करून 11 सैनिकांची हत्या करण्यात आली होती. इराणविरुद्द पाकिस्तान या संघर्षामुळे प्रादेशिक तणाव वाढू शकतो, हे निश्चित; परंतु हा संघर्ष केवळ पाकिस्तान आणि इराणमधील नाही. इराणने इराकमधील इस्रायली दूतावासावर क्षेपणास्रे डागली आहेत. इराकच्या कुर्दिस्तान भागात हा हल्ला करण्यात आला.

इस्रायली दूतावासातून इस्रायलची ‘मोसाद’ ही संघटना इराणविरोधी कृत्ये करत होती, असा आरोप आहे; परंतु इराणच्या ‘रेव्होल्युशनरी गार्डस’नी इराक तसेच सीरियामधील इसिस किंवा इस्लामिक स्टेटस्चे अड्डेही उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव विलक्षण वाढला असून, त्याची व्याप्ती इस्रायल, लेबानन, इराण, इराक आणि पाकिस्तानपर्यंत पसरली आहे. इस्रायलवर हल्ला करणार्‍या हमासला इराणचे समर्थन आहे. पाकिस्तान आणि इराकही इस्रायलचे मित्र देश आहेत. पाकिस्तान आणि इराण एकमेकांचे नुकसान करत आहेत म्हणून भारताने आनंदून जाण्याचे कारण नाही. कारण, कोणत्याही तणावाचे आर्थिक परिणाम भीषण असतात. त्यातून इंधनाचा भडका उडू शकतो. मुळात पाकिस्तानची हालत खराब असून, तेथे आता सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही दहशतवादाविरोधात आम्ही आहोत, असा रास्त पवित्रा भारताने घेतलेला आहेच.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे तेहरानमध्ये असतानाच पाकिस्तान विरुद्ध इराण या चकमकी सुरू झाल्या होत्या. आयसिसने इराणच्या केरमन शहरात बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा धारण केला होता. वास्तविक, आजवर इराणने काही कमी दहशतवाद केलेला नाही. इस्रायल आणि सौदी अरेबिया हे इराणचे कट्टर शत्रू असून, हमास, हेझबोला, हुती या दहशतवादी संघटनांना इराणचे समर्थन लाभलेले आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी आपला इस्रायलविरोध दाखवून देण्यासाठी लाल समुद्रातून ये-जा करणार्‍या जहाजांवर तुफानी हल्ले केले आहेत. गाझातून इस्रायलने आपले सैन्य मागे घ्यावे अन्यथा आम्ही हल्ले घडवतच राहू, असा हुतींप्रमाणे चीनचाही पवित्रा आहे.

पाकिस्तान-इराण संघर्षाचा फटका चीनच्या पाकिस्तानातील ग्वादार बंदर प्रकल्पाला बसू शकतो. शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारालाही बसू शकतो. पाकिस्तान आणि इराण हे दोन्हीही दहशतवादी देश; परंतु भारताला तरीही इराणशी संबंध ठेवणे भाग आहे. कारण, तेथून आपण इंधन आयात करतो. इराणमधील चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांचे सहकार्य आहे. इराणमध्ये जाण्यासाठी भारतीय प्रवाशांना व्हिसा काढण्याची गरज नाही, अशी घोषणा गेल्याच महिन्यात इराणने केली आहे. पाकपुरस्कृत दहशतवादाने भारत आजही त्रस्त आहे. याच प्रवृत्तीबद्दल इराणने पाकिस्तानला जाब विचारला आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानने वेळीच रोखले नाही, तर भारतासमोरही त्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

Back to top button