वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्या पानशेत व वरसगाव धरण खोर्यासह सिंहगड परिसरात अवैध प्लॉटिंगसाठी मोठ्या प्रमाणात डोंगरांची बेकायदा लचकेतोड सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम आता पडणार्या अवकाळी पावसातून दिसू लागले आहेत. तोडलेल्या डोंगराच्या मोठमोठ्या दरडी कोसळू लागल्या असून पावसाच्या पाण्याबरोबर राडारोडा साचत आहे. तसेच तो थेट ओढे-नाले, धरणात वाहून जात आहे.
पानशेत धरण खोर्यातील कुरण खुर्दपासून कादवे, शिरकोली, पोळे, माणगाव, खानू, चांदर, टेकपोळे, गोंडेखल, कशेडी, कोशीमघर, कुरवटी, कांबेगी आदी ठिकाणी तसेच वरसगाव धरण खोर्यात वरसगाव, साईव खुर्दपासून धरणाच्या दोन्ही तीरावरील डोंगर, टेकड्या फोडून अवैध प्लॉटिंग केले जात आहे. या तोडफोडीमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षीदेखील ओसाडे, सोनापूर येथे तोडलेल्या डोंगराचे कडे कोसळल्याने पानशेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती.
सर्वात गंभीर स्थिती मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर, ओसाडे, रुळे, खानापूर, रांजणे-पाबे घाट रस्ता, सिंहगड, राजगड परिसरात आहे. बुधवारी (दि. 14) पानशेत धरण तीरावरील वरघड, आंबेगाव बुद्रुक येथे पानशेत-शिरकोली-पोळे रस्त्यावर डोंगरांच्या मोठ्या दरडी कोसळल्याने वाहतूक कोलमडली होती. अचानक ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे प्लॉटिंगसाठी तोडलेल्या डोंगरकड्यांवरून मुरूम-मातीसह दरड कोसळून मुख्य रस्त्यावर वेगाने वाहत आली. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने जीवितहानी टळली.
वरघड, आंबेगाव खुर्द येथे डोंगराचे भराव वाहून रस्त्यावर आले. त्यास जबाबदार असलेल्यांवर महसूल अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. डोंगर तोडणार्यांना संबंधित तलाठ्यामार्फत नोटिसा बजावल्या आहेत.
निवास ढाणे, तहसीलदार, राजगड (वेल्हे)
वरघड, आंबेगाव खुर्द भागात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडले जात आहेत. जोरदार पावसात पुराच्या पाण्यात डोंगराच्या दरडी वाहून रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे वाहतूक बंद पडून धरण खोर्यातील 25 गावांचा संपर्क तुटणार आहे. तसेच दरडीखाली सापडून जीवितहानी होणार आहे.
अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली
हेही वाचा