Leopard attack : पानशेत खोर्‍यात चार जनावरांचा फडशा; बिबट्यांच्या दहशतीने शेतीची कामे ठप्प | पुढारी

Leopard attack : पानशेत खोर्‍यात चार जनावरांचा फडशा; बिबट्यांच्या दहशतीने शेतीची कामे ठप्प

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण भागातील शेतकर्‍यांत बिबट्यांची दहशत पसरली आहे. गेल्या 24 तासांत बिबट्याने टेकपोळे (ता. राजगड) येथील बाळू तुकाराम बामगुडे यांच्या दोन गाई व कुर्तवडी (ता. राजगड) येथील शिवाजी पासलकर यांची एक गाय व बैल अशा चार जनावरांचा फडशा पाडला. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेती मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. पानशेतसह सिंहगड, राजगड, तोरणाच्या जंगलात बिबट्यांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना वनक्षेत्रात जाण्यास वनविभागाने प्रतिबंध केला आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत धरण खोर्‍यासह शेजारच्या घिसर, सिंगापूर, तोरणा, राजगडच्या जंगलात पाच ते सहा बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिनाभरात गाय, बैल वासरे अशा दहा जनावरांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे.

टेकपोळे येथील शेतकरी बाळू तुकाराम बामगुडे यांच्या दोन गायीपैकी एक गाय जंगलात मृतावस्थेत सापडली. कुर्तवडीतील शिवाजी पासलकर यांची एक गाय व बैल यांचा बिबट्याने फडशा पाडला. त्यातील गायीचा मृतदेह सापडला. वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक स्वप्निल उंबरकर यांनी या घटनेचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी टेकपोळेचे माजी सरपंच दिनकर बामगुडे यांनी केली आहे. रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील मोहरी, एकलगाव, कुसारपेठ, केळद, हारपूड, केळद भोर्डीसह पानशेत, वरसगाव धरण परिसरात बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे पर्यटकांसह शेतकर्‍यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राजगड तालुका विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button