नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे दत्त मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक येथून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. कृष्णा नदीत स्नान करून शेकडो भाविक रांगेतून श्रींचे दर्शन घेत आहेत.
ऊन्हाची तीव्रता अधिक असून देखील कोल्हापूर, ज्योतिबा, पन्हाळा येथे आलेले भाविक नरसोबाच्या वाडीत श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. सध्या गर्दीमुळे यात्री निवास, धर्मशाळा, लॉजिंग, उपहारगृहे ही निवासाची ठिकाणे सध्या फुल्ल झाली आहेत. गुरुवार, शनिवार, रविवार मंदिराचा घाट गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दत्त देवस्थान समितीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच भाविकांसाठी कापडी मंडप देखील उभारण्यात आले आहेत. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे कृष्णा नदीत पाय धुवून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागत आहे. भाविकांचे पाय भाजू नयेत यासाठी घाट पायऱ्यांवर ज्यादा मॅट टाकणे आवश्यक आहे.
वृद्ध लोकांना पायऱ्या चढणे, उतरणे व दर्शन घेणे अवघड असल्यामुळे त्यांच्यासाठी खास पायऱ्या करण्याचे काम देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी चिटणीस संजय उर्फ सोनू पुजारी व सर्व विश्वस्तांनी नव्याने हाती घेतले आहे. कृष्णा, पंचगंगा नद्यांमध्ये सध्या प्रमाणापेक्षा पाणी कमी आहे तरी देखील संगम व घाट पाहण्यासाठी ही भाविक जात आहेत. मे महिन्याच्या सुट्टीमुळे मंदिरात पूजेसाठी तसेच मेवा मिठाई खरेदी करण्यासाठी भाविक मंडळींची लगबग दिसत आहे.
हेही वाचा :