सर्वंकष अभियान गरजेचे | पुढारी

सर्वंकष अभियान गरजेचे

डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्त्र अभ्यासक

भारतातील 27 टक्के मुलींचा विवाह हा किशोरवयीन अवस्थेतच होतो, असा धक्कादायक खुलासा कायदा आयोगाने अहवालात केला आहे. बालाविवाहच्या जाळ्यात अडकणार्‍या 6.8 टक्के मुली या 15 ते 19 वयोगटात आई होताना दिसतात, असेही अहवालात नमूद केले आहे. बालविवाहसंबंधित आकडेवारी पाहिल्यास जगभरातील प्रत्येक तिसरा बालविवाह हा भारतात होत आहे.

एकीकडे आपला देश बालविवाहासारख्या गंभीर विषयाचा सामना करत असताना दुसरीकडे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे वय कमी करण्याची मागणी केली जात आहे; पण या गोष्टींचे गांभीर्य न ओळखता अशा प्रकारची परवानगी दिल्यास त्याचे परिणाम किती भयानक असतील, याची कल्पना न केलीच बरी!

पौंगंडावस्थेत भावनांच्या आहारी जाणे आणि लैंगिक संबंध प्रस्थापित होणे या गोष्टी गर्भधारणेचा धोका निर्माण करणारी राहतात आणि ही बाब अल्पवयीन मुलींचे भवितव्य संकटात टाकणार्‍या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या जून 2023 च्या अहवालानुसार अल्पवयीन मातेत (वय 10 ते 19) आणि 20 ते 24 वयोगटातील होणार्‍या आईच्या तुलनेत ‘एक्लेम्पसिया’ होण्याची शक्यता अधिक राहते. या स्थितीत गर्भवतीला उच्च रक्तदाबामुळे झटके येऊ लागतात. जागतिक पातळीवर सुमारे चौदा टक्के गर्भवतींचा मृत्यू हा या त्रासामुळे होतो. त्याचवेळी अल्पवयीन मुलींत रक्तस्त्राव होण्याची जोखीम देखील अधिक राहते. किशोरावस्थेत आई होणे हे मुलीच्या जीवांशी खेळण्यासारखेच आहेच त्याचबरोबर बाळाच्या जीवालादेखील धोका राहतो.

‘द लॅन्सेंट’मध्ये प्रकाशित ‘मॅटरनल मोर्टालिटी इन एडोलसेंट कंपयर्ड विथ वूमन ऑफ अदर एजेस : एव्हिडन्स फ्रॉम 144 कंट्रिज’च्या अहवालानुसार, कमी वयात आई झालेल्या मुलींचे आरोग्य संकटात येतेच त्याचबरोबर नवजात बालकांच्या जीवनावरही टांगती तलवार राहते. अर्थात, बालविवाहामुळे मातृत्व होण्याची शक्यता अधिक असते. कारण, या विवाहामुळे संसारात आलेल्या मुली सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर सक्षम नसतात आणि त्या गर्भधारणेबाबत एखादा निर्णय घेतील, अशीही स्थिती नसते. ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’च्या अभ्यासानुसार विकसनशील देशात दरवर्षी 70 हजार मुली या गर्भधारणेच्या काळात निर्माण झालेल्या गंभीर आरोग्य अडचणींमुळे जीव गमावून बसतात.

बालविवाहाचा आघात केवळ शरीरावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो. अल्पवयीन मातांना अनेक प्रमाणात ताण सहन करावा लागतो आणि त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत जातात. बालविवाह हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावर अल्पवयीन मुलींना अशक्त करण्याचे काम करतो आणि त्यांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करतो. एवढेच नाही, शैक्षणिक हक्कापासूनही मुलींना दूर ठेवले जात आहे.

‘द सोशल अँड एज्युकेशनल कन्सिक्वेंस ऑफ एडोलेसेंट चाईल्ड बेयरिंग 2022’ या जागतिक बँकेच्या अहवालानुसार अल्पवयीन माता या मुलांची देखभाल तसेच कौटुंबिक जबाबदारी या कारणांमुळे शाळेत, महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. त्या आर्थिक आत्मनिर्भरतेपासून वंचित राहतात. अनेक संशोधनातून एक गोष्ट समोर येते अणि ती म्हणजे अशा मुली अशिक्षित राहिल्याने निर्धनतेच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता अधिक राहते. यासंदर्भातील अनेक शोधानंतरचे निष्कर्ष पाहिले, तर बालविवाह हा आधुनिकतेचा, प्रगतिशील विचाराचा दावा करणार्‍या समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणारा आहे. अशावेळी बालविवाहाचे प्रस्थ कशामुळे आहे, यामागची कारणे जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. अर्थात, पालक कधीही आपल्या मुलींना जाणीवपूर्वक संकटात टाकत नाहीत. साधारणपणे गरिबी, अशिक्षित पालक या गोष्टींमुळे पौंगंडावस्थेतच आई होणे हे त्यांच्या मुलीला कितपत धोकादायक आहे, याबाबत अनभिज्ञ असतात. म्हणून जनजागृती करणे गरजेचे आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात आजही बालविवाहाला सुरक्षित जीवनाची शिदोरी मानणार्‍या सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि वास्तवतेची जाणीव करून देणे आवश्यक आहे. असे घडले तर नक्कीच बालविवाह ही कुप्रथा समाजातून हद्दपार होईल अणि अल्पवयीन मुलींचे जीवन सुखकर आणि सुरक्षित राहील.

Back to top button