विक्रमवीर विराट | पुढारी

विक्रमवीर विराट

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचा जल्लोष सुरू होता, त्यावेळी नवख्या असलेल्या विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली होती. याबाबत विराटला प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला होता, सचिन तेंडुलकरसाठी आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा होता. गेली पंचवीस वर्षे देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे हा एकटा माणूस खांद्यावर वागवत आहे. त्याच्यासाठी आम्हाला जिंकणे गरजेचे होते. विराट कोहली हा केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून किती प्रगल्भ आहे, याचे दर्शन त्याच्या त्यावेळच्या या प्रतिक्रियेतून घडले होते.

सचिनला आदर्श मानणारा विराट सचिनपेक्षा आक्रमक आहे. परंतु त्याने कधी सचिनशी स्पर्धा केली नाही किंवा तसे दाखवण्याचा आततायीपणाही केला नाही, हे त्याचे अंगभूत मोठेपण. 49 शतके झळकवायला सचिनला 451 डाव खेळावे लागले. त्याच विक्रमाला विराटने 277 डावांमध्ये गवसणी घातली. त्यावरून दोघांच्या चाहत्यांमध्ये समाजमाध्यमांमध्ये संघर्ष सुरू असताना हे दोन महान खेळाडू मात्र परस्परांच्या कौतुकामध्ये मश्गूल होते. कोणत्याही खेळामधील विक्रम मोडण्यासाठीच असतात. सर डॉन ब-ॅडमन आणि गॅरी सोबर्सचे विक्रम अनेक वर्षे अबाधित होते. ते मोडून सुनील गावसकरने भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली.

गावसकरांचे विक्रम सचिन तेंडुलकरने मोडले आणि आता सचिनचे विक्रम मोडण्याचा सपाटा विराटने लावला आहे. फलंदाजाचे मूल्यमापन त्याने केलेल्या धावा, त्यातले सातत्य, धावांची सरासरी यावरून होत असते. आकडेवारी बोलत असते. परंतु त्याहीपलीकडे संबंधित खेळाडूने त्या धावा कोणत्या परिस्थितीत काढल्या, कोणत्या गोलंदाजांच्या विरुद्ध काढल्या यावरही त्यांचे मोल ठरत असते. आजवर अनेक भारतीय फलंदाजांची, गोलंदाजांची नावे घेतली जात असली तरी भारताला सर्वाधिक सामने जिंकून देणारा खेळाडू म्हणून अनिल कुंबळेची बरोबरी कुणी करू शकलेले नाही. तुलना होत राहते आणि दोन महान खेळाडूंची तुलना अपरिहार्य असते. त्यामुळे सचिन आणि विराटची तुलना स्वाभाविक आहे.

सचिन हा घरातल्या सर्वांच्या लाडक्या मुलासारखा आहे. सर्वांना आवडणारा. सगळ्यांशी गोड बोलणारा. त्याउलट विराट वडीलधार्‍यांचा आदर राखणारा असला तरी आपल्या भावनांना आवर न घालता बिनधास्तपणे व्यक्त होणारा. न आवडलेल्या गोष्टींबद्दल नापसंती व्यक्त करणारा. मात्र आपल्यावरील जबाबदारी अधिक नेटाने पार पाडणारा. जणू नव्या पिढीचा प्रतिनिधी. कठीण परिस्थितीत सचिन आणि विराटने नेहमीच संघाचा विचार केला. महान खेळाडूंच्या आयुष्यात काही घटनांमध्येही साम्य आढळते. 1999 चा विश्वचषक सुरू असताना सचिनच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा अंत्यसंस्कार करून सचिन लगेच परत आला आणि मनावर दुःखाचा डोंगर असताना केनियाविरुद्ध नाबाद शतक झळकावले. विराटच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा तर रणजी करंडकाचा सामना सुरू होता. आदल्या दिवशी विराट फलंदाजी करून नाबाद राहिला. दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने संघव्यवस्थापनाला त्याची कल्पना दिली आणि आपली उर्वरित खेळी पूर्ण करताना 90 धावा केल्या. आपली खेळी खेळून तो वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला, तेव्हा विराट अवघा सतरा वर्षांचा होता.

विराटने एकदिवसीय सामन्यातील 49 वे शतक झळकावून विक्रमादित्य सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आणि आपल्या 35 व्या वाढदिवसाची चाहत्यांना दिमाखदार भेट दिली. त्याच्या धावांची आकडेवारी पाहिली तर खेळीतील सातत्याची कल्पना येऊ शकते. सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधल्यानंतर नेहमीप्रमाणेच समाजमाध्यमांमधून दोघांच्या चाहत्यांकडून तुलनेची ईर्ष्या लागली. क्रिकेट हा धर्म मानल्या जाणार्‍या भारतासारख्या देशामध्ये असा संघर्ष सातत्याने सुरूच असतो. समाजमाध्यमे नव्हती त्या काळात सुनील गावसकर आणि कपिलदेव यांच्या चाहत्यांमध्ये असा संघर्ष चालायचा. कपिलदेवने भारताला विश्वचषक जिंकून दिला म्हणून तो थोर असल्याचे त्याचे चाहते म्हणत; तर सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिल्याचा दावा त्याचे चाहते करीत.

प्रत्येक पिढीमध्ये असा संघर्ष सुरू असतो. काहीवेळा खेळाडूंमध्ये तो असतो किंवा नसतोही. चाहत्यांमध्ये मात्र प्रचंड ईर्ष्या असते. विराटच्या 49 व्या शतकाच्या निमित्ताने त्याच्या विक्रमाच्या चर्चेबरोबरच सचिन आणि विराटच्या चाहत्यांमध्ये समाजमाध्यमांमधून जे युद्ध सुरू झाले, ते त्याचेच निदर्शक. तोही या खेळाच्याच प्रकृतीचा भाग. क्रिकेटच्या या चाहत्यांचे वैशिष्ट्य असे की, हे कायमस्वरूपी कधीच कुणाचे चाहते नसतात. खेळाडू चांगला खेळत असताना ते त्याच्यावर जेवढे प्रेम करतात, तेवढेच त्याच्या अपयशाच्या काळात ते त्याच्यावर टीकाही करीत असतात. मैदानात त्याची हुर्यो उडवेपर्यंत त्यांची मजल जाते.

गावसकरपासून तेंडुलकर, विराट कोहलीपर्यंत सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. एक तर तुम्ही चाहत्यांच्या मनाच्या देव्हार्‍यात असता किंवा निषेधाच्या घोषणांच्या कोलाहलात. खेळाडूची कारकीर्द संपल्यानंतर त्याच्या कामगिरीवरून त्याच्यासंदर्भातील आदरभाव उरतो तोच अंतिम. कारकीर्द सुरू असताना त्याच्या त्या त्या दिवसातल्या कामगिरीवर तो ठरत असतो. त्यामुळे एका सामन्यात शतक झळकावणारा खेळाडू पुढील सामन्यात अपयशी ठरला तर त्याला रोषाला सामोरे जावे लागते. आदल्या डावातील शतकाची पुण्याई त्याच्या कामाला येत नसते. हे विराटनेही अनुभवले आणि सचिननेही.

सचिन जेव्हा यशाच्या शिखरावर होता, तेव्हा त्याला विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने, विराट आणि रोहित शर्मा यांच्यात आपले विक्रम मोडण्याची क्षमता असल्याचे भाकीत केले होते. विराटने ते जिद्दीने, प्रचंड आत्मविश्वासाने सिद्ध केले आणि रोहितनेही सचिनच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. तुलना तर सतत होतच राहणार आहे. त्यापलीकडे जाऊन त्यांनी देशासाठी, ‘टीम इंडिया’साठी दिलेले योगदान फार मोठे. विक्रमांबद्दल बोलायचे तर सचिनला मागे टाकून विराट वेगाने पुढे निघाला आहे. मैदानावरील नव्या, उमलत्या आणि क्रिकेट हाच प्राण मानणार्‍या पिढीचा तो आदर्श बनला आहे.

Back to top button