लवंगी मिरची : असे कुठे असते का? | पुढारी

लवंगी मिरची : असे कुठे असते का?

‘काय हे बीडीओ साहेब, मान्य आहे की तुम्ही एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात पंचायत समितीमध्ये बीडीओ म्हणजेच गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहात. म्हणजे तुमच्या कार्यालयामधील सर्वात मोठे अधिकारी तुम्हीच आहात. अर्थात तुमच्या सहीशिवाय तुमच्या पंचायत समितीमधील एकही काम मार्गी लागू शकत नाही. अशावेळी तुम्ही म्हणे स्वतःच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लावला की ‘शासनाच्या पगारामध्ये तुम्ही समाधानी आहात’, हे तुम्हाला अजिबातच शोभलेले नाही’.

म्हणजे बघा एखादा ग्रामीण भागातील शेतकरी तुमच्या पंचायत समितीत काही काम घेऊन गेला तर जातानाची त्याची मानसिकता कशी असते याचा पण विचार करायचा. अहो शासकीय काम म्हणजे सहजासहजी होणारच नाही याविषयी प्रत्येकाला ठाम विश्वास असतो, पण काहीतरी सरकारी मदत ती ही अधिकृत पद्धतीने घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एखादी योजना असते, त्यामध्ये त्याच्या शेताला पाईपलाईन मिळणार असते. काही खते, बियाणे, कीटकनाशके मिळणार असतात. यासाठी तो तुमच्या कार्यालयात येत असतो. तो जेव्हा येतो तेव्हा पूर्ण तयारीने आलेला असतो. त्याला माहीत असते की आपल्या अर्जावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय अर्ज पुढे सरकू शकत नाही. ही सुद्धा बाब इतकी सहज झाली आहे की काहीतरी विशेष प्रयत्न केल्याशिवाय किंवा चिरीमिरी किंवा वजन ठेवणे किंवा टेबलाखालून देवाण-घेवाण करणे असे काही प्रकार न करता समजा एखाद्या व्यक्तीचे काम झाले तर तो अ‍ॅटॅक येऊनच पडायचा ना? तुम्ही याचा अजिबात विचार केलेला नाही. तुम्ही स्पष्टपणे, ‘या कार्यालयामध्ये कुणालाही काहीही देण्याची गरज नाही’, असे लिहिले आहे आणि याचे कारण काय तर तुम्ही तुमच्या पगारात समाधानी आहात.

म्हणजे बघा, जेव्हा आम्ही सामान्य नागरिक एखादे काम घेऊन सरकारी कार्यालयात जातो तेव्हा किमान दहा-बारा चकरा माराव्या लागतील, नाही नाही ती कागदपत्रे गोळा करून सादर करावी लागतील. प्रत्येक टेबलावर येणारे अडथळे दूर करत करत पुढे जावे लागेल, तेव्हा कुठे प्रस्ताव सर्वात मोठ्या साहेबांच्या पुढे जाऊ शकेल याची मानसिक आणि आर्थिक तयारी करूनच गेलेलो असतो. साहेबांच्या पुढे प्रस्ताव गेल्यानंतर किती मोठा घास द्यावा लागेल याविषयी प्रत्येकाच्या मनात धास्ती असते. म्हणजे होते काय की आम्ही जातानाच मानसिक तयारी करून गेलेलो असतो की देवाण-घेवाण करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

आता अशा वेळेला समजा एखादा नागरिक तुमच्या कार्यालयात आला आणि त्याने तुमच्या केबिनच्या बाहेर लावलेला बोर्ड वाचला तर त्याला धक्काच बसेल. कारण तुम्ही स्पष्ट लिहिले आहे की इथे कुणाला काही देण्याघेण्याची गरज नाही आणि शासनाकडून जो पगार मिळतो त्यात तुम्ही समाधानी आहात. साहेब, तुमचे समाधान तुम्हाला लखलाभ असो. असेच अधिकारी जागोजागी मिळाले तर आमच्याकडून मिळणार्‍या आशीर्वादावरतीच तुमचा संसार आणि आयुष्य सुखाचे होईल याविषयी शंका नाही. सामान्य माणसाने आशीर्वाद दिला तर आयुष्य सुखात जाऊ शकते हे ओळखणारे तुम्ही एक दुर्मीळ अधिकारी आहात याची तुम्हाला तरी कल्पना आहे का? कोणत्याही कार्यालयामध्ये खालील छोट्या टेबलवर जर काही मागणी झाली आणि समजा सामान्य नागरिकांनी दरडावून विचारले की ‘हे पैसे मी का द्यायचे?’ तर त्याचे उत्तर आम्हाला वर द्यावे लागतात, असे सर्रास सांगितले जाते.

Back to top button