लवंगी मिरची : बुद्धिबळातही पुढेच..! | पुढारी

लवंगी मिरची : बुद्धिबळातही पुढेच..!

एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का मित्रा, की आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगामध्ये आघाडीवर आहे. अंतराळ संशोधन घे, मिसाईल तंत्रज्ञान घे, आर्थिक महासत्ता घे किंवा कोणत्याही खेळाचा विचार कर भारत सर्वत्र आघाडीवर आहे. म्हणजे बघ, क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये आपण अव्वल क्रमांकावर असून उपांत्य आणि अंतिम फेरीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहोत. त्यात बुद्धिबळात नुकतीच घडलेली घटना तुला माहीत झाली का? मी सांगतो. कार्तिकेयन या नावाच्या आपल्या तरुण बुद्धिबळपटूने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद विजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले आणि बुद्धिबळाच्या पटावर आपल्या देशाचा वजीर नेऊन बसवला. एवढ्या विलक्षण झपाट्याने या देशाची प्रगती आजवर कधीच झाली नव्हती.

बरोबर आहे तू म्हणत आहेस ते! बुद्धिबळामध्ये नुकतेच कार्लसनला आणि त्यांच्या अजिंक्यपदाला धक्के देण्याचे काम दोन भारतीय खेळाडूंनी केले आहे. त्यात कार्तिकेयन याने इतिहास रचला असून थेट मॅग्नसला पराभूत करण्याची फार मोठी कामगिरी केली आहे. भारताचा पहिल्यापासून बुद्धिबळ खेळामध्ये दबदबा आहे. कितीतरी वर्षे भारताचा विश्वनाथन आनंद जगात अजिंक्य होता. आज नवनवीन खेळाडू येत आहेत आणि बुद्धिबळात आपला शिक्का जमवत आहेत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. तसे भारतीयांना बुद्धिमत्तेचे वरदान अगदी परंपरागत असे मिळालेले आहे. कधीकाळी या देशातून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. तो अर्थातच बुद्धीच्या जोरावरच निघत असावा, हे नक्की!

सर्वसामान्य भारतीयाची बुद्धिमत्ता जगात खूप वरच्या क्रमांकावर आहे; परंतु आजवर बहुधा तिचा उपयोग होत नसावा. या बुद्धीचा उपयोग करण्यासाठी अत्यंत सुपीक असा कालखंड तरुण पिढीला मिळालेला आहे आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये आपला देश आघाडीवर राहून दमदार वाटचाल करत आहे, हे पाहून फार आनंद होतो.

संबंधित बातम्या

मी काय म्हणतो, आपल्या भारतीय राजकारण्यांच्या बुद्धिमत्तेचा कोणी अभ्यास केला आहे काय? मला खात्री आहे की, असा काही अभ्यास झाला, तर जगातील इतर देशांमधील राजकारणी लोक राजकारण शिकण्यासाठी भारतामध्ये येतील, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. गावपातळीवरच्या सरपंचापासून ते देशपातळीवरच्या खासदारापर्यंत अतिशय सुपीक बुद्धीचे राजकारणी आपल्या देशामध्ये आहेत आणि ते कधी काय करतील, याचा त्यांना स्वतःलाही नेम नसतो.

खरं तर, या राजकीय लोकांचे कौतुकच करायला पाहिजे. बुद्धिबळाला भारी पडेल अशी बुद्धी ते वापरत असतात. आपल्या मतदारांना देवदर्शन घडवून आणून आधी मतदान पक्के करून घेणे हा एक उद्देश आहे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांना देवदर्शन घडवले याचे पुण्य मिळवणे हा दुहेरी उद्देश आहे. हे दोन्ही उद्देश ते साध्य करत असतात. अशा बुद्धिमत्तेचे राजकीय नेते, कार्यकर्ते ज्या देशामध्ये असतील तो देश बुद्धिबळामध्ये मागे राहून कसे चालेल? उद्या अमेरिकेमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये असे पर्यटन करून देणारे उमेदवार उभे राहिले, तर नक्की समजून घे की, त्यांनी भारतात येऊन राजकीय प्रशिक्षण घेतलेले आहे. लाखो रुपये खर्च करून व्यवसायात करावी तशी राजकारणात गुंतवणूक केली जाते आणि मग साहजिकच एकदा निवडून आल्यानंतर ती दामदुपटीने वसूल केली जाते, हेच तर भारतीय राजकारणाचे बुद्धिबळ आहे.

Back to top button