भैरोबानाल्यातून वाहतेय कत्तलखान्याचे पाणी! दुर्गंधीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त | पुढारी

भैरोबानाल्यातून वाहतेय कत्तलखान्याचे पाणी! दुर्गंधीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

सुरेश मोरे

वानवडी : उन्हाळ्यातदेखील भैरोबानाला खळाळून वाहत आहे, पण याचा फायदा ना पशू-पक्ष्यांना होतोय ना माणसांना! कारण ड्रेनेज व कत्तलखान्यातील पाणी या नाल्यात सोडले जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. नाल्यातील दुर्गंधीच्या समस्येतून आम्हाला मुक्त करा; अन्यथा सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

भैरोबानाल्याचा उगम येवलेवाडी येथील डोंगररांगांतून झाला आहे. जवळपास 18 ते 20 किलोमीटर वाहून हा नाला मुळामुठा नदीला मिळतो. मात्र, हा नाला धोकादायक म्हणून ओळखला जातो. गेल्या काळात या नाल्याला आलेल्या पुरात एकाच वेळी पाच लोकांचे बळी गेले आहेत, तर इतर बळींचा आकडा वेगळाच आहे. या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने त्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे पावसाळ्यात या नाल्याला पूर येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

तीव्र  उन्हामुळे सध्या परिसरातील इतर ओढे-नाले, विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले असताना भैरोबानाला सध्या खळाळून वाहत आहे. मात्र, त्यात ड्रेनेज आणि कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी सोडले जात आहे. यामुळे या नाल्यातील पाणी काळेकुट्ट झाले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास दुर्गंधीयुक्त व रक्तमिश्रित पाणी या ओढ्यात सोडले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील कत्तलखान्यातील पाण्याचा सर्वात जास्त त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. नॅन्शी गार्डन, नेताजीनगर, कुमार गुलमोहर, गंगा सेटेलाइट, गुलमोहर हाबिटा या सोसायट्यांमधील रहिवासी दुर्गंधीच्या समस्येने सध्या त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले असून, या समस्येतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्रतिसाद नाही

नाल्यात सोडण्यात येणार्‍या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेच्या कत्तलखान्यात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. नागरिकांकडून नाल्याच्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येबाबत तक्रार होत असलेला प्रकार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कत्तलखान्याशी निगडित आहे. महापालिकेच्या वतीने वेळोवेळी परिसरातील साफसफाई केली जात असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

उन्हाच्या उकाड्यामुळे घराची दारे, खिडक्या उघड्या ठेवून हवा घ्यावी, तर दुर्गंधीसह डासांनी घर भरून जात आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

-शिवाजी शिंदे, स्थानिक रहिवासी

दुर्गंधीयुक्त पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे भैरोबानाल्याच्या परिसरात राहणार्‍या रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने या समस्या सोडविणे गरजेचे असून, नाल्याच्या परिसरात झालेली अतिक्रमणे काढून त्याचा प्रवाह मोकळा करून देणे गरजेचे आहे.

-अनुष्य काळभोर, रहिवासी

हेही वाचा

Back to top button