रफाहवर काेणत्‍याही क्षणी हल्‍ला, शहर रिकामे करण्‍याचे इस्त्रायलचे पॅलेस्‍टिनींना आवाहन | पुढारी

रफाहवर काेणत्‍याही क्षणी हल्‍ला, शहर रिकामे करण्‍याचे इस्त्रायलचे पॅलेस्‍टिनींना आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्‍ट्रीय दबावाला न जुमानता इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझा पट्टीतील इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्‍या रफाह शहरामध्ये लष्‍कर कारवाईसाठी सज्‍ज झाले आहे. सैन्‍याने पॅलेस्‍टिनी नागरिकांना शहर सोडण्‍याचे आवाहन केल्‍याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इस्रायल’ने दिले आहे. दरम्‍यान, ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने सर्वसमावेशक युद्धविरामाचा प्रस्‍तावाचे संकेत दिले असतानाच इस्रायल सैन्‍य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवार ५ मे रोजी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यामुळे आता हमास आणि इस्‍त्रायल संघर्ष अधिक तीव्र होण्‍याची शक्‍यता आहे.

इस्रायलची नजर आता राफाहवर

इस्रायल कधीही रफाहवर हल्ला करू शकतो, अशी शक्‍यता मागील काही दिवसांपासूनच होती. गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त केल्यानंतर इस्रायलची नजर आता राफाहवर आहे. शहर ताब्यात घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. इस्रायली लष्कराने रफाहमधून पॅलेस्टिनी नागरिकांना शहरा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यापूर्वीची ही तयारी असल्याचे मानले जात आहे. या लोकांना हटवल्यानंतर इस्रायल हल्ला करू शकतो, असे मानले जात आहे. हमासच्या दहशतवाद्‍यांनी रफाहमध्ये तळ ठोकल्याचा इस्रायल पुनरुच्चार करत आहे.

आम्ही हमासवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करू

आम्ही हमासवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करू, असे इस्रायली लष्कराने सोमवारी सकाळी सांगितले. सध्या आम्ही तिथे राहणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना हटवण्यात येत आहे. इस्रायली सैन्याने पूर्व रफाहच्या लोकांना उत्तरेकडे जाण्यास सांगितले आहे. उत्तरेकडील भाग खान युनिस शहराजवळ आहे, जिथे सध्या मानवतावादी मदत दिली जात आहे. इजिप्तमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चेचा प्रस्ताव होता. मात्र आजतागायत या दिशेने कोणताच पुढाकार घेण्यात आलेला नाही. रविवारी हमासनेही इस्रायलवर

हमासचा खात्मा होईपर्यंत हल्ले सुरूच राहतील

आतापर्यंत इस्रायलने माघार घेण्याची चिन्हे दाखवलेली नाहीत. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी आवाहन करूनही इस्रायलचे म्हणणे आहे की. हमासचा खात्मा होईपर्यंत हल्ले सुरूच राहतील. दरम्यान, इस्रायलच्या कान न्यूज या प्रमुख वाहिनीने म्हटले आहे की, लष्कराने रफाहमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पीएम बेंजामिन नेतन्याहू देखील राफावरील हल्ल्यावर स्‍वत: नजर ठेवून आहेत.

विस्‍थापितांसाठी ३० हजार तंबूची खरेदी

इस्‍त्रायलने सुमारे 30 हजार तंबू खरेदी केले आहेत. रफाहवरील हल्ल्यानंतर विस्थापित झालेल्या लोकांना या तंबूंमध्ये ठेवण्यात येणार आहे. येथेच त्यांना मानवतावादी मदतही दिली जाणार आहे. हे असे होईल जेणेकरून इस्रायलवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप होऊ नये. राफाह शहरात सुमारे १४ लाख लोकसंख्या आहे. मात्र, येथे राहणाऱ्या लोकांना कसे बाहेर काढले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युरोपीय देशांनीही इस्रायलला राफावर हल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button