लवंगी मिरची : सर्वत्र जल्लोष..! | पुढारी

लवंगी मिरची : सर्वत्र जल्लोष..!

मला एक सांग मित्रा, आता हा कालचा बांगलादेश आणि भारत यांच्यामधील क्रिकेट मॅच फार अटीतटीची झाली. भारताने सहजरित्या ही मॅच जिंकली. पुण्यात झालेल्या या मॅचला भरपूर गर्दी होती आणि विराट कोहलीचे जे शतक झाले, त्याचा जल्लोष चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि घराघरांत साजरा केला. आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे की, एखाद्या गोष्टीचा राष्ट्रीय पातळीवर जल्लोष झाला तर त्याच्याने तुझ्या-माझ्या समस्यांमध्ये काही फरक पडतो का?

अजिबात नाही. कोहलीची सेंचुरी झाली म्हणून काही तू किराणा खरेदी करायला गेल्यानंतर तेल, तूप, डाळ, साखर यांचे पैसे तो दुकानदार तुला माफ करणार नाहीये हे नक्की. आपल्या रोजच्या समस्यांच्याबरोबर आपल्यालाच झुंजावे लागते. हा जो जल्लोष कोणत्याही गोष्टीचा होतो ना, म्हणजे भारत जिंकल्याचा, पाकिस्तान हरल्याचा किंवा कुठल्याही प्रकारचा; हा तात्कालिक उन्माद असतो. त्याने आपल्या कुठल्याही समस्या संपत नाहीत, सुटत नाहीत हे आपल्याला समजायला हवे. देशभर सध्या जे काय चालू आहे म्हणजे एकाच वेळी क्रिकेटचा उत्सव सुरू आहे, त्याचबरोबर देवीच्या नऊ रात्रींचा उत्सव सुरू आहे. याही उत्सवामध्ये डीजे, गाणी, गरबा, दांडिया इत्यादी खेळ खेळले जात आहेत. कधी कधी मला यावरून असे वाटते की, आपला भारत देश हा संपूर्ण विकसित देश आहे. म्हणजे बघ, फारसे कुणी काम करताना दिसत नाही. मॅचच्या दिवशी प्रत्येकाचे अर्धे लक्ष मॅचवर असते. संध्याकाळी गरबा खेळताना महिला मंडळी, तरुण स्त्री-पुरुष अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात. मग आपण म्हणतो की, देश प्रगतिपथावर आहे, तर मग नेमके कोणते लोक देशाला प्रगतिपथावर नेत असतील असे तुला वाटते?

अरे साधे, सोपे आहे. या कुठल्याही जल्लोषाच्या भानगडीत न पडता अथकपणे काम करणारे लोक नाहीत, असे तुला वाटते का? श्रम करणारे मजूर, नोकरदार, खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, अहोरात्र संशोधन करणारे शास्त्रज्ञ हे लोक देश पुढे नेत असतात.
याचा अर्थ जल्लोष करणारे वेगळे आहेत आणि देश पुढे नेणारे वेगळे आहेत, असे तुझे म्हणणे दिसते.

संबंधित बातम्या

बरोबर आहे. हातातील कामधाम सोडून अर्धा दिवस आणि अर्धी रात्र स्टेडियममध्ये घालवणारे लोक हेपण देश पुढे नेत असतात. घरी बसून टीव्हीवर जाहिराती पाहणारे आणि मॅच पाहणारे लोकपण हा देश पुढे नेत असतात. भारत हा उत्सवप्रेमी लोकांचा देश आहे. उत्सव आला की, जाहिराती येत असतात आणि व्यवसायाची उलाढाल होत असते. म्हणजे देशाला पुढे नेण्याचेच काम सर्वत्र होत आहे, हे आधी तू समजून घे.

बरेचदा मॅच पाहताना मी मॅचपेक्षा दोन ओव्हर्समध्ये असणार्‍या जाहिरातीच फार आवर्जून पाहत असतो. अतिशय सुंदर क्वालिटीच्या आणि मनमोहक जाहिराती असतात. आपल्याकडे पैसे असतील तर लगेच जाऊन ती वस्तू घ्यावी, असे वाटते. तू म्हणतोस त्याप्रमाणे, देश प्रगत झाला आहे अशी शंका घेण्यास वाव आहे कारण जेव्हढ्या जाहिराती आपण पाहतो, त्यापैकी 80 टक्के जाहिराती या सोन्याच्या दागिन्यांच्या, हिर्‍यांच्या आभूषणांच्या किंवा तत्सम प्रकारच्या वस्तूंच्या असतात; ज्यांची किंमत अक्षरश: लाखो रुपयांमध्ये असते. आपल्या देशातील वर्तमानपत्रावर नजर टाकली, तर शहरी भागात वर्तमानपत्रांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या आणि मालमत्ता खरेदीच्या जाहिराती असतात. उदाहरणार्थ पुणे, कोल्हापूर, मुंबई पाहशील तर तुला प्रत्येक पेपरमध्ये फ्लॅटच्या जाहिराती दिसतील.

Back to top button