लवंगी मिरची : शत्रूंचा नायनाट होवो! | पुढारी

लवंगी मिरची : शत्रूंचा नायनाट होवो!

भारताच्या शत्रूविरुद्ध काम करणार्‍या अनेक शक्ती उदयाला आल्या आहेत. मी काय म्हणतो मित्रा, कोण असतील या अज्ञात शक्ती? आपल्या देशासाठी त्या का कार्य करत असतील?

हे बघ, शक्ती दोन प्रकारच्या आहेत. शक्तीचा एक प्रकार म्हणजे अज्ञात शक्ती आणि दुसरी म्हणजे महाशक्ती. आधी आपण महाशक्ती म्हणजे काय ते पाहू! एखाद्या पक्षातून असंख्य आमदार फुटून बाहेर निघतात आणि दुसर्‍या पक्षामध्ये न जाता आम्हीच खरा पक्ष असं प्रतिपादन करतात या सर्व आशा पूर्ण पक्षच पाळविणार्‍या शक्तींना महाशक्ती असे म्हणतात. म्हणजे बघ, महाराष्ट्रातील बरेच आमदार अचानक सुरतमार्गे गुहाटीला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी जाहीर केलं की, आम्हाला महाशक्तीचे पाठबळ आहे, तर ती असते महाशक्ती!

अच्छा! म्हणजे हीपण शक्ती अद़ृश्य अशीच असते? दिसत कुणालाच नाही; पण कार्य करत असते. देशांतर्गत राजकारणात कार्य घडवून आणत असते ती म्हणजे महाशक्ती असते. ही महाशक्ती सहसा आपल्या देशांतर्गत राजकारणामध्ये मोठी कुरापत करत असते. उलथापालथ करत असते; पण आजकाल जे अज्ञात शक्ती नावाचे प्रकरण आले आहे ती शक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असते आणि मुख्य म्हणजे हीपण कोणाला दिसत नाही. म्हणजे बघ, भारताविरुद्ध कारवाई करणारा खलिस्तानी दहशतवादी कॅनडामध्ये मारला गेला.

संबंधित बातम्या

त्याला कोणी मारले हे भारताला आणि कॅनडाला दोघांनाही माहिती नाही. त्याला अज्ञात शक्तीने मारले होते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या देशासाठी काम करणार्‍या काही अज्ञात शक्ती पाकिस्तानमध्ये कार्यरत झाल्या आहेत. भारताविरुद्ध कारवाई करणार्‍या आणि पाकिस्तानमध्ये रहिवास असणार्‍या अनेक मोठ्या दहशतवाद्यांना याच अज्ञात शक्तीने मारून टाकले आहे. आपल्या विरुद्ध कारवाया करणार्‍यांना त्या ओळखतात कसे आणि मारतात कसे, हे कुणालाच माहीत नाही. जिथे हे घडते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतो आणि मग आपण म्हणतो की त्यांनाही अज्ञात शक्तीने मारले.

भारताविरुद्ध कारवाया करणार्‍या मूळ कॅनेडियन नागरिकाला कोणीतरी मारले तेव्हा कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्यावर आरोप ठेवला आणि आपण अज्ञात शक्तीकडे बोट दाखवून मोकळे झालो. यात आपला काही सहभाग नाही, हे आपण स्पष्ट केले आणि उलट कॅनडावर दबाव आणून त्यांना माघार घ्यायला लावली. शेवटी महाशक्ती काय किंवा अज्ञात शक्ती काय, जोपर्यंत आपल्या देशासाठी कार्य करत आहेत, तोपर्यंत आपल्यासाठी ते चांगलेच आहे.

पण, मला असे वाटते की, या शक्ती कोण आहेत, हे समजायला पाहिजे. नाही तर विनाकारण इतर देश भारताला बदनाम करत बसतील. बहुदा या अज्ञातशक्ती म्हणजे एखाद्या भूमिगत सैनिकांसारख्या असाव्यात. प्रत्यक्ष कार्य करणार्‍या पेक्षाही या भूमिगतांनी निजामाला अधिक जेरीस आणले होते. अशाच अज्ञात शक्ती भारताच्या विरुद्ध कटकारस्थान करणार्‍या लोकांना वेचून मारत आहेत.

मला असे वाटते की, आपण या अज्ञात शक्तींचे अभिनंदन केले पाहिजे. अशाच अज्ञात शक्ती जगभर सक्रिय होऊन त्यांनी भारताच्या शत्रूंचा नायनाट करावा, यासाठी आपण त्यांना शुभेच्छासुद्धा देऊयात. कुठलाही स्वार्थ नसताना फार मोठी जोखीम पत्करत देशासाठी कार्य करणार्‍या या अज्ञात शक्तींना माझे वंदन!

Back to top button