लवंगी मिरची : आपले पूर्वज..! | पुढारी

लवंगी मिरची : आपले पूर्वज..!

सध्या संपूर्ण देशभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. माकड हा जंगल आणि नागरी वस्ती येथे मुक्तसंचार करणारा प्राणी आहे. आज माकड असते काय आणि असते कसे, याविषयीची ही माहिती.

उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माकडापासून आदिमानव आणि पुढे सुधारणा (?) होत आजचा आधुनिक मानव, हे टप्पे महत्त्वाचे समजले जातात. मानवाचे आजचे वर्तन पाहिले तर मानवापासून पुन्हा परत माकडाकडे, अशी वाटचाल तर सुरू नाही ना! याची शंका येते. या उफराट्या वाटचालीला उफरांती म्हणता येईल. आजूबाजूच्या परिस्थितीला न जुमानता आपला हस्तक्षेप चालू ठेवणे म्हणजे हस्तक्षेप करण्यात मानवाने माकडावर मात केली आहे. माकड हा प्राणी उपद्व्यापी असल्याचे त्याच्या चेहर्‍यावरूनच लक्षात येते. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा टर्रेबाजपणा दिसून येतो. कोणतेही माकड हे धनाढ्य उडाणटप्पू पोरासारखेच दिसते. आज टगेगिरी केली तरी उद्या सत्तेवर आपणच बसणार आहोत, असला काहीसा उर्मटपणाचा भाव आणि त्याला शोभणारी देहबोली माकड नेहमी प्रदर्शित करीत असते. दिवसभर काहीही विशेष असा उद्योग न करता केवळ टिवल्या-बावल्या करून टाईमपास करीत आयुष्य काढणारे माकड महानच म्हणावे लागेल.

जमिनीवर तसेच झाडांवर मुक्तसंचार करण्याच्या त्याच्या हातखंड्यामुळे उपद्व्यापासाठी माकडाची निवड केली जाते. सीतेची रावणापासून मुक्तता करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राकडे या माकडांचीच सेना होती, हा काही योगायोग नव्हे. प्रभूंची समस्या सोडवून माकडांनी आपला वंश पुनीत करून घेतला; तेव्हापासून त्याला मारणे, नावे ठेवणेसुद्धा अवघड झाले आहे. बहुतांश तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी माकडांचा धुमाकूळ असतो. भाविकांच्या हातातून प्रसाद ओढून घेण्यापासून ते त्यांचे धोतर खेचण्यापर्यंत सारे उपद्व्याप माकडे करीतच असतात.

संबंधित बातम्या

अभिनय करण्यात माकडे फार तरबेज असतात. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण घेतल्यासारखा अभिनय करतात. वाकुल्या दाखविणे, दात विचकून घाबरवून टाकणे, रंगमंचावरील चापल्य, आवाजातील चढउतार इत्यादी अभिनय गुणांवर ते कसबी नटालासुद्धा मागे सारतील. बाकी अशा बाबी सोडल्या तर माकड हा कुटुंबाला जपणारा प्राणी आहे, हे लक्षात येईल. माकडाच्या असामाजिक कृती मानवासाठी त्रासदायक असतात; पण त्यांची स्वत:ची सामाजिक रचना मजबूत असते. टोळीमधील सदस्यांचा ज्येष्ठतेप्रमाणे मान ठेवला जातो. शत्रूवर हल्ला करताना जवान माकडांची फौज आघाडीवर असते. माकड माकडीणीला घाबरते की नाही, याविषयी कोणी संशोधन केल्याचे ऐकीवात नाही; परंंतु मानवाशी याबाबत साधर्म्य असावे, असे वाटते.

माकडांचे आयुष्यमान साधारणत: चाळीस वर्षे असते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतरचे वजन पंचवीस ते तीस किलो असते. मादीचा गर्भधारणेचा कालावधी अंदाजे साडेपाच महिन्यांचा असून, एकावेळी एकाच पिलाला जन्म दिला जातो. मानवाशी साधर्म्य असल्यामुळे माणसांच्या रोगांवरील संशोधनासाठी माकडांचा वापर केला जातो. मित्राची बायको पळवून नेणार्‍याला घर जाळून टाकून शिक्षा करणारी माकडे चांगली मित्र असावीत. माकड आपले पूर्वज आहेत, याची आठवण करून देणारी माणसे सर्व क्षेत्रात आघाडीवर असतात. अशा माणसांवर संशोधन करणे हा उपेक्षित प्रांत शास्त्रज्ञांनी काबीज करायला हरकत नाही. रिल्स, स्टोरीज आणि सोशल मीडियावर विविध प्रकारचे अंगविक्षेप करून टाकली जाणारी गाणी पाहून माकडेपण चकित होत असतील, हे नक्की. माकड अनेक युक्त्या करण्यात तरबेज असले तरी सध्याच्या जगातील माणूसही यामध्ये मागे नाही, हे विशेष!

Back to top button