लवंगी मिरची : उंच उंच उडे विमान | पुढारी

लवंगी मिरची : उंच उंच उडे विमान

मित्रा, खरं सांगू का… मला तर प्रवास करायला फार भीती वाटते. आपण नियमाप्रमाणे आपली गाडी चालवली तरी समोरचा चालवणारा किंवा पाठीमागून येणारा वाहनचालक कोणत्या परिस्थितीत असेल हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपली काहीही चूक नसतानासुद्धा आपल्या वाहनाला अपघात होऊ शकतो आणि आपण जायबंदी होऊ शकतो. मला त्यापेक्षा विमान प्रवास सगळ्यात सुरक्षित वाटतो. एक तर सहसा अपघात होत नाही आणि विमान हवेत असताना अपघात झाला तर कोणीही वाचत नाही. तुलना केली तर विमानाचे अपघात अत्यंत कमी होतात. त्यामुळे विमान प्रवास सगळ्यात सुरक्षित आहे, असे मला वाटते.

बरोबर आहे तू म्हणतोस ते. पण नुकतीच वैमानिक आणि विमानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची तपासणी केली असता काही धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले आहेत. ते वाचलेस तर तू म्हणशील की, विमान प्रवास सध्या सगळ्यात धोकादायक झालेला आहे. म्हणजे, नेमके काय म्हणायचे आहे तुला? तसा मी एक-दोन वेळा विमान प्रवास केला आहे. मला ते चकचकीत गणवेशातले पायलट, त्या हातामध्ये चाकांच्या बॅगा घेऊन लगबगीत विमानतळावर इकडून तिकडे फिरणार्‍या हवाई सुंदर्‍या, सेवा देणारे विमानातील कर्मचारी हे सगळे बघायला आणि अनुभवायला फार छान वाटले होते. असतो तास – दोन तासांचाच प्रवास. परंतु अवर्णनीय सुख त्यामध्ये आहे.

आपण विमानात बसल्यानंतर पायलट लोक अगम्य भाषेत जी काय घोषणा करतात, ती ऐकताना समजत नसली तरी कानाला गोड वाटते.
अजिबात भ्रमात राहू नकोस. एखाद्या माणसाने थोडीबहुत घेतली तर आपण त्याचे विमान उंचीवर उडायला लागले आहे असे म्हणतो. इथे गेल्या सहा महिन्यांमध्ये पायलट लोकांची तपासणी केली असता एकूण 33 पायलट नशेच्या अंमलाखाली होते आणि सुमारे 97 कर्मचार्‍यांनी काही ना काही सेवन केले होते, असे दिसून आले आहे. म्हणजे आधीच उंचीवर असलेल्या विमानाचा पायलट मद्यसेवन करून स्वतःच अधिक उंचीवर गेला असेल तर तो विमान किती उंचीवर नेईल याची काही खात्री नाही.

संबंधित बातम्या

याचा अर्थ सुरक्षित असलेला विमान प्रवास अशा धोकादायक वैमानिकांमुळे कठीण होत चालला आहे की काय? आपल्या ट्रॅव्हल्स, एसटी किंवा कारमध्ये ते वाहन चालवणारा चालक दिसतो तरी. इथे तर वैमानिक कोण आहे हे कळतही नाही. हवाई सुंदरी सुरुवातीला त्याचे नाव सांगते आणि नंतर तो विमान निघत आहे वगैरे सांगतो. तेवढाच त्याचा आणि आपला संबंध असतो. समजा, प्रवाशांना प्रत्यक्ष तो दिसला असता तर कमीत कमी हे तरी कळले असते की त्याने काही नशापाणी केलेले आहे किंवा नाही? बरं, जे कर्मचारी आपल्याला दिसतात म्हणजे खानपान आणि इत्यादी सेवा देत असतात, त्यांनीही काही मद्यसेवन केले असेल तर उडत्या विमानात त्यांना अडखळायला वेळ लागणार नाही.

आधीच विमानात जागा कमी असते. त्यात मधल्या पॅसेजमधून ट्रॉलीमध्ये चहा, कॉफी आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन कर्मचारी फिरत असतात. त्यातील काहींचे विमान आधीच उंचीवर गेलेले असेल तर निश्चितच ते टोमॅटो सॉस किंवा तत्सम पदार्थ प्रवाशांच्या अंगावर सांडणार नाहीत याची काही खात्री नाही. होय, पण याच्यावर काही उपाय करत असतील ना? होय तर. आता प्रत्येक वैमानिकाची आणि कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. असे काही कर्मचारी किंवा वैमानिक लोक आढळले तर त्यांच्या विमान चालवण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. त्यांना म्हणावं जे काय करायचे ते करा; पण विमानप्रवास सुरक्षित करा.

Back to top button