अंतराळ कचर्‍यावर ‘इस्रो’चा उतारा | पुढारी

अंतराळ कचर्‍यावर ‘इस्रो’चा उतारा

महेश कोळी, संगणक अभियंता

जगभरातील अवकाश संशोधक अंतराळात फिरणार्‍या कचर्‍याच्या समस्येविषयी चिंताक्रांत झाले आहेत. सॅटेलाईटस् आणि रॉकेटस्च्या निरुपयोगी भागांच्या कचर्‍याच्या समस्येवर अलीकडेच भारतीय वैज्ञानिकांनी मोठी उपलब्धी मिळवली आहे. ‘इस्रो’ने पीएसएलव्ही सी-56 च्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून सिंगापूरचे 7 उपग्रह अंतराळात उच्च कक्षेत स्थापित केले. हे करत असताना या रॉकेटचे निरुपयोगी भाग 300 किलोमीटर खालील कक्षेमध्ये आणण्याच्या प्रयत्नांनाही ‘इस्रो’ला यश लाभले आहे. यामुळे अंतराळातील कचरा कमी करण्याच्या प्रयत्नांना एक नवी दिशा मिळाली आहे.

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणार्‍या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटस्चे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात कचरा निर्माण करण्यास हातभार लावताहेत. याद़ृष्टीने भारतीय अवकाश संशोधकांनीही दमदार यश मिळवले आहे. अंतराळातील कचरा स्वच्छ करण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञही काम करत आहेत. अवकाशातील या संकटाने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच वेळेत पावले उचलणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीवरच्या वाढत्या कचर्‍यामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाला हानी निर्माण होत असताना अंतराळातील कचरा ही डोकेदुखी ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगातील बहुतांश देशांकडून अवकाशात उपग्रह सोडले जात आहेत; पण एखाद्या उपग्रहाने कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या उपग्रहाचे पुढे काय होते, याबाबत अनेकांना माहिती नसते.

प्रत्यक्षात एक तर हे उपग्रह अंतराळात भरकटत राहतात किंवा समुद्रात येऊन पडतात. अशा उपग्रहांची विल्हेवाट लावण्यासाठी जगभरातील अनेक नामांकित अंतराळ संस्था अहोरात्र प्रयत्न करत असून यात भारतही मागे नाही. काही दिवसांपूर्वीच अंतराळातील वाढता कचरा कमी करण्याच्या द़ृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी यशस्वी प्रयत्न केले. ‘इस्रो’ने उपग्रह प्रक्षेपण यानाला (पीएसएलव्ही-सी 56) प्रक्षेपित करून सिंगापूरच्या सात उपग्रहांना अवकाशातील वरच्या कक्षेत स्थापन केले. हे उपग्रह स्थापित झाल्यानंतर त्याबरोबरच्या रॉकेटच्या निरुपयोगी भागांना 300 किलोमीटरपर्यंत खालच्या कक्षेत आणण्यात ‘इस्रो’ला यश आले. यामुळे स्पेस जंक कमी करण्याच्या द़ृष्टीने मोठी मदत होणार आहे. तसेच अंतराळातील कचर्‍याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उपग्रहांच्या कार्यातील अडथळेही दूर होणार असल्याने त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास हातभार लागणार आहे.

पीएसएलव्ही चार भागांत विभागलेले रॉकेट असून त्यात पहिले तीन भाग लक्ष्य साधल्यानंतर समुद्रात पडतात आणि शेवटचा भाग पीएस-4 हा उपग्रहास अंतराळाच्या कक्षेत स्थापित केल्यानंतर स्वत: कचर्‍यात परावर्तित होतो आणि तो अवकाशात वरच्या भागात प्रदक्षिणा करत राहतो. या कामात ‘इस्रो’ने वेगळेच यश मिळवले. यानुसार रॉकेटचा हा भाग खालच्या कक्षेत जातो आणि याप्रमाणे तो वरच्या भागातील उपग्रहांच्या मार्गात येत नाही. अंतराळातील कचरा नैसर्गिक रूपाने कमी करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. या यशासह भारताने अंतराळातील कचरा कमी करण्याची जबाबदारी बिनचूकपणे पाडली.

पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह हे कचरा वाढविण्यास आणि नव्याने प्रक्षेपित होणार्‍या उपग्रहाच्या कामात अडथळा आणत आहेत. परिणामी, त्यांची टक्कर होण्याचीच भीती अधिक आहे. शिवाय अवकाशातील कचरा हा सुमारे 34 हजार तुकड्यांत असून त्याचा आकार हा दहा सेंटिमीटरपेक्षा अधिक आहे. एवढेच नाही, तर लाखो तुकडे हवेत तरंगत आहेत आणि ते एखाद्या वस्तूला धडकले, तर मोठी हानीदेखील होऊ शकते.

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्‍यावर स्पेस रॉकेटचा कचरा आढळून आला. तो भारतीय रॉकेटचा निरुपयोगी सुट्टा भाग असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच अवकाशातील उपग्रहांचा कचरा हा कालांतराने जगासाठी संकट निर्माण करू शकतो. ते कोणत्याही क्षणी पृथ्वीवर कोसळू शकतात. 2016 मध्ये सहा टन वजनाचा यूआरए उपग्रह पृथ्वीवर पडला. 1989 मध्ये शंभर टन वजनाचा स्कायलॅब उपग्रह हिंद महासागरात पडला. 2001 मध्ये रशियाचे अंतराळस्थानक मीर दक्षिण प्रशांत महासागरात पडले. अर्थात, अंतराळातील अभियानाचा इतिहास पाहिला, तर आतापर्यंत जेवढे तुकडे आदळले, त्यातून कोणतीही जीवितहानी झालेली नाही; पण भविष्यात जीवित आणि वित्तहानीची शक्यता नाकारता येत नाही. याद़ृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कालावधी पूर्ण केलेल्या उपग्रहांना परत आणण्याचे अभियान सुरू केले आहे. या क्रमवारीत शास्त्रज्ञांनी उपग्रह मेघा-ट्रापिक्स-1 चे (एमटी) अवघड अभियान पूर्ण करत त्यास पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणत प्रशांत महासागरात पाडले.

या यशाबाबत ‘इस्रो’ने म्हटले की, या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि त्याचे हिंद प्रशांत महासगारावर विघटन केले. याशिवाय भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) निर्मिती आणि यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीत एका निकामी उपग्रहाला नष्ट केले. अंतराळात मोठ्या संख्येने रॉकेट, उपग्रहांची उपकरणे, सुटे भाग कचर्‍याच्या रूपात फिरत आहेत. त्याची संख्या सुमारे 9 लाख आहे. सरासरी 25 ते 28 हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने निष्क्रिय उपग्रह, उपकरणे, तुकडे पृथ्वीच्या कक्षेत (एलईओ) फेर्‍या मारत आहेत. अर्थात, वातावरणात प्रवेश केल्यानंतर हे तुकडे पूर्णपणे जळून जाणे अपेक्षित आहे. त्यांना केवळ क्षेपणास्त्राद्वारेच नष्ट करता येणे शक्य आहे. मानवनिर्मित कचरा साफ करण्यासाठी जपानची ‘जाक्सा’ आणि अमेरिकेच्या ‘नासा’सारख्या कंपन्या काम करत आहेत. अनेक देशांच्या खासगी कंपन्या या क्षेत्राकडे भविष्यातील व्यवसाय म्हणून पाहत आहेत. भारताने या द़ृष्टीने आघाडी घेत एमटी-1 नष्ट करून इतिहास घडविला.

Back to top button