लवंगी मिरची : कुठे चांदणी, कुठे चौक! | पुढारी

लवंगी मिरची : कुठे चांदणी, कुठे चौक!

कोण आहे रे तिकडे ?
आता तिकडे कुणीच नाही महाराज! गेल्या वर्षभरापासून सेवकवर्ग सोडून गेला आहे. राणीसाहेब पण ब्यागा बांधायच्या तयारीत आहेत. मी हजर आहे महाराज, आपला प्रधानजी!

प्रधानजी, मध्यंतरी आमचा ताफा पुणे येथील चांदणी चौकाच्या रहदारीमध्ये अडकला होता. त्यावेळी आम्ही तत्काळ चांदणी चौकाच्या परिसराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. ते काम पूर्ण झाले किंवा कसे, याचा अहवाल तत्काळ सादर करा. चांदणी चौकातील हालहवाल कसे आहेत प्रधानजी?

होय महाराज! चांदणी चौकातील सर्व काम पूर्ण झाले असून रहदारी सुरळीत झाली आहे. या कामात उशीर होण्याचे कारण म्हणजे जुना पूल इतका मजबूत होता की, सुरुंगाचे असंख्य स्फोट करून तो पाडण्यामध्ये पंधरा दिवस गेले; पण महाराज, आता अतिशय सुंदर असे काम झाले आहे. सर्व रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर आपल्या मराठी संस्कृतीची झलक म्हणून विविध प्रकारची पेंटिंग काढली आहेत.
वा प्रधानजी, आम्हास खूप संतोष जाहला. परदेशाच्या तोडीस तोड काम झाले, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.

संबंधित बातम्या

महाराज, जनतेला कुठून कुठे जावे, हे कळत नाही. त्यामुळे मुळशीकडे जाणारी जनता बावधन कडे उगवत आहे आणि पाषाणकडे जाणारे लोक कोथरूडच्या दिशेने वळत आहेत. एकदा एका मार्गावर पाऊल टाकले की, परत फिरता येत नाही. त्यामुळे चाणाक्ष पुणेकरांनी चांदणी चौक पार करण्याचे प्रशिक्षण वर्ग काढले आहेत.

प्रधानजी याचा अर्थ पाट्या बरोबर लावलेल्या नाहीत असा होतो. तत्काळ स्पष्ट दिशा दर्शवणार्‍या पाट्या लावा आणि रयतेची सुटका करा.
जी महाराज; पण प्रश्न पाट्या लावण्याचा नाहीये. इतके रस्ते आणि इतके उड्डाणपूल झाले आहेत की, कुठून कुठेही पाठवले, तरी त्याच त्याच पाट्या पुन्हा पुन्हा सर्वत्र दिसत आहेत. उदाहरणार्थ, वारजेकडून आल्यानंतर भुगाव, मुळशी दिशेने जाताना एकाच दिशेने किमान तीन रस्ते आहेत. त्या रस्त्यातील नेमका कोणता राजमार्ग आपण निवडावा, यामध्ये जनतेचा गोंधळ होत आहे. सकाळच्या वेळी ट्रॅव्हल्सने उतरणारे नागरिक तसेच चांदणी चौकात सिटी बसने उतरणारे स्त्री, पुरुष, मुले जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत. हायवे असल्यामुळे येथे कुठेही स्पीड ब्रेकर नाहीत किंवा सिग्नल नाहीत. त्यामुळे गाड्या भरधाव वेगाने धावत असतात.

आता एक करा, पायी चालणार्‍या लोकांसाठी रस्त्याच्या खालून दोन-तीन अंडरपास काढा. आणखी एक-दोन उड्डाणपूल पहिल्या उड्डाणपुलांच्या वरून काढा. त्यावर सरकते जिने काढा, म्हणजे पायी चालणार्‍यांना पण न्याय देता येईल. पायी चालणार्‍यांना पण चांदणी चौक परिसरात फिरता येईल. प्रधानजी, या परिसरात सर्वात जास्त गर्दी कुठे होत आहे?

होय महाराज! तिथे लष्करी दल, नाविक दल आणि वायुदल यांची प्रतीके म्हणून हेलिकॉप्टर वगैरे लावलेला एक चौक केला आहे, तिथे प्रचंड गर्दी होत आहे; पण महाराज ती गर्दी सेल्फी काढण्यासाठी होत आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल काळजी करू नये. बराय, येतो महाराज! आता इकडे कुणीच नाही महाराज. मीही गावाकडे चाललो आहे महाराज. पुन्हा पुन्हा कोण आहे रे तिकडे म्हणून उगाच ओरडत बसू नका!

Back to top button