पाकिस्तान वरती बुशराबीबीचे मायाजाल! | पुढारी

पाकिस्तान वरती बुशराबीबीचे मायाजाल!

- प्रसाद प्रभू

पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तिसर्‍या सुविद्य पत्नी बुशराबीबी काळी जादू, वशीकरण, जंतर-मंतर अशा कथित तंत्रसिद्धींमध्ये पारंगत आहे, असे म्हटले जाते. याशिवाय तिने दोन जीन पाळले आहेत आणि हे जीन तिची अशक्य असलेली कामे करून देतात, असाही बोलबाला आहे. ती पाकिस्तान मध्ये ‘पिंकी पिरनी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

पाकिस्तान हा आता भिकेकंगाल देश झाला आहे, हे सार्‍या जगाला माहीत झाले आहे. पंतप्रधान इम्रान खान नुकतेच सौदी अरेबियाला जाऊन आले आणि पाकिस्तानसाठी तीन अब्ज डॉलर्सची मदत घेऊन आले. त्यावेळी पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना भिकारी म्हटले. टीव्हीवरील चर्चेत एका पत्रकाराने इम्रान यांनी आता स्वतःच्या शहाणपणाने, बुद्धीने देशाचा कारभार करावा आणि काळी जादू करणार्‍या बुशराबीबीच्या मायाजालातून बाहेर पडावे, असा सल्ला दिला. आता या बुशराबीबी कोण?

पाकिस्तानबाहेर बुशराबीबी कोण, हे अजून कुणाला पुरेसे माहीत नाही. बुशराबीबी ही इम्रान खान यांची तिसरी पत्नी. काळी जादू, वशीकरण, जंतर-मंतर अशा तथाकथित तंत्रसिद्धींमध्ये ती पारंगत आहे, असे म्हटले जाते. याशिवाय तिने दोन जीन पाळले आहेत आणि हे जीन तिची अशक्य असलेली कामे शक्य करून देतात, असाही बोलाबाला आहे. मीडियावाले म्हणतात की, बुशराबीबीच पाकिस्तानचे सरकार चालवते. तंत्रसिद्धीच्या तथाकथित ज्ञानामुळे ती पाकिस्तानमध्ये ‘पिंकी पिरनी’ म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत होते, त्यावेळी त्यांच्या जीवनात बुशराबीबी ही तिसरी पत्नी म्हणून आली आणि पुढील सहा महिन्यांतच इम्रान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. ही सारी करामत बुशराबीबीच्या काळ्या जादूने केली, अशी चर्चा आहे.

इम्रान गेली 30 वर्षे सुफी पंथाचे अनुयायी आहेत. लाहोरपासून जवळ पाकपट्टन येथील तेराव्या शतकातील गूढ अवलिया बाबा फरीद गंज शक्कर यांचे ते भक्त आहेत. बुशराबीबी या पाकपट्टनच्याच. त्यादेखील सुफी पंंथाच्या अनुयायी आहेत. बुशराबीबीचे पहिले पती खावर मनेका हे जकात अधिकारी आहेत. मनेका यांच्याशी बुशराबीबीने तीस वर्षे संसार केला आणि त्यांना पाच मुले झाली. इम्रान खान हे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे (पीटीआय) अध्यक्ष आहेत. पक्षातील सहकार्‍याने त्यांची खावर मनेका यांच्याशी ओळख करून दिली. पाकपट्टन येथे इम्रान खान जात तेव्हा ते मनेका यांच्या घरी जात. तेथे त्यांना बुशराबीबी 2015 मध्ये पहिल्यांदा भेटल्या आणि मग त्यांचे सूर जुळले. बुशराबीबीने इम्रान यांना एक शुभशकुनी अंगठी दिली होती. त्यांनी पतीला तलाक देऊन इम्रान खान यांच्याशी 2018 मध्ये निकाह केला. खावर मनेका म्हणतात, बुशरा यांचा इम्रान खान यांच्याशी विवाह होणे हा एक दैवी संकेत होता. बुशरा यांच्या स्वप्नात देवदूत आले आणि त्यांनी इम्रानशी विवाह करण्याचा आदेश दिला. इम्रान पंतप्रधान बनतील, असेही देवदूताने सांगितले होते.

बुशराबीबी इम्रान यांची आध्यात्मिक गुरू बनली आणि निकाह झाल्यानंतर तिने पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात दबदबा निर्माण केला. बुशराबीबी ही फेसहिलर आणि भाकिते करते. इम्रान यांनी पक्षातील असंतुष्ट महिला सदस्यांना ताळ्यावर आणण्यासाठी बुशराबीबींचा उपयोग करून घेतला; पण बुशराबीबींनी पक्षातच आपला एक वेगळा गट तयार केला. त्यामुळे गोंधळ वाढला असून पक्षाचे अनुयायी पक्षापेक्षा बुशराबीबींवर जास्त निष्ठा ठेवू लागले आहेत. 2015 च्या पोटनिवडणुकीत जहांगीर तरीन हा तुमचा उमेदवार जिंकेल, असे भाकीत बुशराबीबी यांनी केले होते. ते खरे झाल्यावर इम्रान खान यांचा पत्नीवरील विश्वास आणखी वाढला. इम्रान यांचे निकटचे सहकारी, मुत्सद्दी आणि नोकरशहा बुशराबीबींच्या परवानगीशिवाय इम्रान यांना भेटू शकत नाहीत. 2018 मध्ये बुशराबीबी यांनी आमदार उजमा कादर यांची बेशिस्तीच्या कारणास्तव पक्षातून हकालपट्टी केली. तत्पूर्वी, बुशराबीबी लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय, राजकीय कामात हस्तक्षेप करू नये, अशी टीका कादर यांनी केली होती.

तुम्हाला 2023 पर्यंत पंतप्रधानपदावर राहून कारकीर्दीची यशस्वी सांगता करायची असेल, तर ‘छ’ अद्याक्षरापासून नावाची सुरुवात होणार्‍या व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर बसवा, असा सल्ला बुशराबीबीने इम्रान खान यांना दिला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हेसुद्धा बुशराबीबींना मानतात, असे म्हटले जाते. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची घडी बसवण्यासाठी आयएसआयचे तत्कालीन प्रमुख फैज हमीद यांना काबूलमध्ये पाठवण्याचा सल्ला हा बुशराबीबीनेच इम्रान खान यांना दिला होता, अशी चर्चा होती. फैज हमीद हे बुशराबीबीचे अनुयायी आहेत. बुशराबीबीने त्यांना लष्करप्रमुख व्हाल, असे म्हटले आहे.

बुशराबीबी या नेहमी बुरख्यात असतात आणि चेहरा क्वचितच दाखवतात. शीघ्रकोपी स्वभावामुळे बहुतेकजण त्यांच्यापासून लांबच राहतात. एकदा कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास उशीर झाला म्हणून बुशराबीबी यांनी 20 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. अलीकडेच बुशराबीबींच्या आदेशावरून लाहोर कॅपिटल सिटीचे अधिकारी उमर शेख यांना बडतर्फ केल्यावर लोकांमध्ये संताप व्यक्त झाला. पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत परदेश दौर्‍यावर जाण्याचे बुशराबीबी टाळतात. बुशराबीबींचे माथेफिरू धार्मिक विचार त्यांच्या भाषणातून आणि मुलाखतींमधून द़ृश्यमान होतात. त्यांनी पाकिस्तानमधील स्त्रीवादी चळवळ मोडून काढली, असे म्हटले जाते. पाकिस्तानमधील जहाल इस्लामी नेते मौलाना फजल उर रेहमान यांच्याशी बुशराबीबींची तुलना केली जाते.

बुशराबीबी यांचा चेहरा आरशात दिसतच नाही, अशी आवई इम्रान खान यांच्या राजप्रसादामधील नोकरांनी उठवली होती; पण कॅपिटल टीव्हीने याची शहानिशा करून ही भंपकगिरी असल्याचे जाहीर केले.

सध्या पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-लबैक या इस्लामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादवर मोर्चा काढला आहे. राजकीय लाभासाठी इम्रान खान यांनी ही संघटना निर्माण केली होती; पण ती आता त्यांच्या मानगुटीवर बसली आहे. पाकिस्तानमधून फ्रेंच राजदूताची हकालपट्टी करावी, अशी त्यांची मागणी आहे. या संकटावर इम्रान खान आपल्या बुद्धिचातुर्याने मात करतात की, बुशराबीबीचे तथाकथित जीन त्यांना मदत करतात, हे पाहायचे.

Back to top button