झाकली वज्रमूठ ‘मविआ‘ची! | पुढारी

झाकली वज्रमूठ ‘मविआ‘ची!

कालपर्यंत महाविकास आघाडीची वज्रमूठ झाकलेली होती. म्हणून ती एकजुटीची वाटत असावी. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न दाखवले आणि ही वज्रमूठ उघडली. महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी दुभंगेल अशी स्थिती त्यातून समोर आली. तसे खरेच घडेल का? पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहेत आणि प्रत्येकाचा पडदा वेगळा आहे.

पडद्यामागील हालचालींचा मन:स्ताप होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक गावची वाट धरली. अहोरात्र काम करणारे शिंदे रजेवर गेले हे ऐकण्याचीही सवय महाराष्ट्राला नाही. सर्व बैठका आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन दिवसांची अशासकीय रजा टाकली आणि ते हेलिकॉप्टरने सातारच्या गावी पोहोचले. रजेवर जाणे वेगळे आणि रजेवर पाठवले जाणे वेगळे. शिंदे स्वतःहून रजेवर गेले असले, तरी भाजपच्या हालचालींचा उबग येऊन ते रजेवर गेले असे आता सांगितले जात आहे. गेला संपूर्ण आठवडा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होत राहिली. जे पद रिकामेच नाही त्या पदावर अजित पवारांचा शपथविधी कधी होणार याचे अंदाज सांगितले जाऊ लागले. या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केला असला तरी त्यावर विश्वास ठेवावा, अशी स्थिती नाही. शेवटी पडद्यामागचा खेळ करूनच शिंदे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले.

आता पडद्यामागे सुरू झालेला दुसरा खेळ त्यांना कळणारच नाही, असे कसे शक्य आहे? पण आपल्याला वगळून हा खेळ सुरू आहे, हे पाहून शिंदे अस्वस्थ झाले असू शकतात.

या खेळाचे सूतोवाच सर्वप्रथम केले ते खुद्द शरद पवारांनी. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही. काही आमदार मात्र व्यक्तिगत निर्णय घेऊ शकतात. ते गेले तरी पक्ष म्हणून राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते. त्याचवेळी उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दल सत्तेशी सुसंगत भूमिका घेत शरद पवारांनी मात्र त्यांच्याच महाविकास आघाडीला अस्वस्थ करून सोडले. ही काय लबाडी आहे की राजकारण? याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांना वाटले आणि ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन त्यांनी शरद पवारांना गाठले. महाविकास आघाडीचे महाभारत घडवणारा संजय सोबत असला, तरी त्याची दूरद़ृष्टी शरद पवारांच्या पलीकडचे काहीही पाहू शकत नाही, हे उद्धव यांच्या अजूनही लक्षात येत नसावे. ‘सिल्व्हर ओक’मधून बाहेर पडल्यानंतरच संजय राऊत यांनी दोन गोष्टी केल्या.

राष्ट्रवादीच्या आमदारांवर भाजपचा दबाव असल्याचे खुद्द पवार म्हणाल्याचे त्यांनी उघड केले. पाठोपाठ प्रसवलेल्या रोखठोकमध्ये फोडाफोडीचा ‘सिझन 2’ येत असल्याचे सांगत भाजप आणि अजित पवार यांच्या पडद्यामागील हालचालींकडेही महाराष्ट्राचे लक्ष वेधले. संजय राऊत यांना हाताशी धरून अजित पवारांच्या हालचाली पवारांनीच उघड केल्या. कारण, ज्या हालचालींमध्ये आपल्याला किंचितही रोल नाही अशा हालचाली शरद पवारांना मान्यच नसतात. शिवाय, अजित पवार कधी मुख्यमंत्री होतात ही शरद पवारांची चिंता नाही. त्यांना चिंता आहे ती सुप्रिया सुळेंची. राष्ट्रीय पातळीवर नितीश कुमार, के. सी. राव, अखिलेश यादव प्रभृतींनी कितीही राजकीय देशाटन केले तरी 2024 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता अटळ आहे. त्या सत्तेवर डोळा ठेवून सुप्रियांसाठी काही हालचाली कराव्यात, तर पायात महाविकास आघाडीचे लोढणे! त्यातून अलगद पाय काढून घ्यायचा विचार शरद पवार करत असतानाच अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा विचार बळावला. भाजपच्या मदतीने सत्तेत येण्याची स्पर्धाच त्यातून काका-पुतण्यात सुरू झाली. यात पहाटेच्या शपथेशी इमान राखणारे अजित पवार भाजपला जवळचे वाटले आणि त्यातून शरद पवार आणखी अस्वस्थ झाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे सोळा आमदार अपात्र ठरले तरी राज्य सरकार कोसळणार नाही. हे खरे आहे आणि नाही पण! घटनापीठाच्या निकालाच्या आधीच मुख्यमंत्री बदलला तर सरकार कोसळणार नाही. निकालानंतर मात्र हे सरकार कोसळेल आणि हेच सरकार नव्या मुख्यमंत्र्यांसह सत्तेवर येईल. हा नवा मुख्यमंत्री कोण असावा, या प्रश्नाच्या उत्तरात भाजपने शिंदेशाहीचा फसलेला डाव नव्याने टाकला, जो अजून तडीस जायचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एक हाती जिंकायच्या म्हणून शिवसेनेत फूट पाडली गेली. त्यातून शिंदे मुख्यमंत्री झाले; पण उद्धव ठाकरे चिरंजीव आदित्यसह अधिक सशक्त होऊन पुढे आले. इतके की ठाकरेंच्या भरवशावरच महाविकास आघाडी भाजपला ललकारू लागली. ही आघाडी अशीच अभेद्य राहिली, तर शिंदे गटाच्या भरवशावर भाजपला लोकसभेच्या निम्म्या जागाही महाराष्ट्रात जिंकता येणार नाहीत, हे भाजपने ओळखले. महाविकास आघाडी फोडली तरच महाराष्ट्रात भाजपला हवे असलेले निकाल लागू शकतात. अशा स्थितीत घटनापीठाच्या निकालाने रिकामे होऊ घातलेले मुख्यमंत्रिपद पणाला लावून आघाडी फोडता येईल, अशी रणनीती भाजपने आखली आणि अजित पवारांशी वाटाघाटी सुरू केल्या.

या देहात अखेरचा श्वास असेपर्यंत मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असे अजित पवारांनी जाहीर करताच ही पक्ष निष्ठा पाहून भले भले गदगद झाले, एकेकाळी काँग्रेसचे प्रवक्तेपण मिरवलेले भावेप्रयोगही गहिवरले. अजित पवारांच्या घराबाहेर कॅमेरे लावा, त्यांच्या दारात मांडी ठोकून बसा. त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय बातम्या तुम्ही देताच कसे, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला. हे केले असते तरी अजित पवार कुठल्याच कॅमेर्‍यात पकडले गेले नसते. मुख्यमंत्रिपदापासून राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रकरणांपर्यंत सार्‍याच वाटाघाटी खासदार सुनील तटकरे करत आहेत. ते अजित पवारांना भेटतात ही बातमी होत नाही. ते अजित पवारांचा काय निरोप घेऊन बाहेर पडतात हे इतरजनांना कळण्याचे कारण नाही. ते दिल्लीत कुणाला भेटतात हे कुणाच्या रडारवर येण्याचेही कारण नाही. अजित पवार भाजपमध्ये जात आहेत, ही या दरम्यान उठलेली बातमी धादांत खोटी गोष्ट. मी भाजपशी युती करणार नाही, असे मात्र अजित पवारांनी जाहीर केलेले नाही, ही खरी गोष्ट!

किमान चाळीस बेचाळीस आमदार अजित पवारांसोबत असतील आणि आहेत. त्यातील बहुतेकांना वाटते, भाजपसोबत जायला नको. पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ते अडचणीचे ठरेल आणि तरीही शरद पवारांच्या आशीर्वादाने अजित पवार घेतील तो निर्णय या आमदारांना मान्य असेल. हा निर्णय घेतील त्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीची वज्रमूठ झाकलेली समजावी.

– विवेक गिरधारी

Back to top button