एका गाण्याचे यश | पुढारी

एका गाण्याचे यश

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू, नाटू-नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून भारतीय गीत-संगीताचा डंका जागतिक पातळीवर वाजवला आहे. हेच गाणे ऑस्करच्याही शर्यतीत असून तमाम भारतीय चित्रपट रसिकांचे डोळे त्याकडेही लागून राहिले आहेत. अवतीभवतीच्या वातावरणात नकारात्मकतेचे मळभ दाटले असताना आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेचे वारे जोरदार वाहत असताना ‘नाटू, नाटू-नाटू’ गाण्याला मिळालेल्या ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने चैतन्यदायी वातावरण निर्माण केले आहे. कोणत्याही चित्रपटाची जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यातील एखादे गाणे प्रसिद्ध झाले की, त्यावरून ट्रोलिंग करणे आणि बहिष्काराची आवाहने करणे यामुळे चित्रपटसृष्टीतील वातावरण गढूळ झाले. कोट्यवधी रुपये गुंतवून, अनेक महिने शेकडो लोकांनी परिश्रम करून चित्रपटाची निर्मिती करायची आणि कुणीतरी भलतेसलते निमित्त शोधून विरोधात मोहीम चालवायची, याचे फॅडच अलीकडच्या काळात आले. अनेकदा निव्वळ प्रसिद्धी स्टंटसाठीही हा मार्ग अवलंबला जातो, हे नवे राहिले नाही. काही निर्मातेच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या चित्रपटाचा विरोध पुरस्कृत करीत होते; परंतु ते अगदी मोजके. त्याहीपुढे समाजमाध्यमांवर काही रिकामटेकड्यांनी वातावरण आणखी बिघवून टाकले. त्यामुळे चित्रपटसृष्टीत अस्वस्थतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचे विशेष महत्त्व. तेलगूमधील ख्यातनाम संगीतकार आणि गीतकार चंद्रबोस यांनी हे गाणे लिहिले. एमएम किरावानी यांनी संगीतबद्ध केले. राहुल सिपलीगंज आणि कालभैरवा यांनी ते गायिले. गाण्यावर ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांनी धमाल नृत्य केले. नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांना त्यासाठी विशेष दाद द्यायला हवी. एखादी कलाकृती अजरामर होण्यासाठी तेवढा वेळही द्यावा लागतो. गीतकार चंद्रबोस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हे गाणे लिहायला सतरा महिने लागले. वैशिष्ट्य म्हणजे, आज युद्धाच्या खाईत होरपळत असलेल्या युक्रेनमध्ये मरिन्स्की पॅलेस म्हणजे अध्यक्षीय प्रासादात ऑगस्ट 2021 मध्ये गाण्याचे चित्रीकरण झाले. गाण्याची नृत्यरचना इतकी लोकप्रिय झाली की, त्यावर समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ बनवण्यात आले. तेलगूमधील मूळ गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर चोवीस तासांतच सतरा दशलक्ष लोकांनी हे गाणे पाहिल्याचा विक्रम नोंद आहे. तेलगू गाणे लोकप्रिय झालेच शिवाय हिंदीतील ‘नाचो नाचो’, तमिळमधील ‘नाटू कोथू’, कन्नडमध्ये ‘हल्ली नाटू’, मल्याळममध्ये ‘करिनथोल’ अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हे गाणे प्रसिद्ध झाले आणि प्रत्येक भाषेत त्याला रसिकांनी तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावरून चित्रपटाची भाषा ही प्रांतांच्या सीमा ओलांडून जात असते, हेच दिसून येते. ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब करताना त्याला जागतिक पातळीवर स्वीकृतीही दिली.

भारतातील ग्रामीण जीवन, इथली खाद्य संस्कृती आणि कृषी जीवनाशी संबंधित विषयांना स्पर्श करणारे हे गाणे आहे. अशा गाण्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, हे मुद्दामहून लक्षात घ्यावे लागते. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते. अशा चित्रपटांना काही प्रमाणात यश मिळत असते. परंतु, सगळ्या जगाचे डोळे दीपवण्याजोगे यश मिळायचे असेल, तर त्यासाठी इथल्या मातीतली गोष्ट घेऊनच पुढे जावे लागते. ‘मदर इंडिया’पासून ‘लगान’पर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेल्या चित्रपटांची नामावली पाहिली, तर भारतीय संस्कृतीच जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देऊ शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणारे चित्रपट कलात्मक म्हणजे वेगळ्या वर्गवारीतले असतात, असा एक समज आपल्याकडे आहे. याचा अर्थ व्यावसायिक चित्रपट कलात्मक पातळीवर स्पर्धेत टिकू शकत नाहीत, असे मानले जाते. परंतु, ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरात बाराशे कोटींचा आणि भारतात नऊशे कोटींचा व्यवसाय केला, यावरून व्यावसायिक पातळीवर त्याने किती भव्य यश मिळवले, याची कल्पना येऊ शकेल. व्यावसायिक म्हणजे सवंग किंवा बीभत्स नव्हे. आणखी एक नोंदवण्याजोगी गोष्ट म्हणजे तब्बल दोन दशकांनी एखाद्या भारतीय चित्रपटाने ‘गोल्डन ग्लोब’ स्पर्धेसाठी नामांकन मिळवले. यापूर्वी ‘सलाम बॉम्बे’ (1988) आणि ‘मॉन्सून वेडिंग’ (2001) या चित्रपटांना नामांकन मिळाले होते. हे दोन्ही चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेले होते. त्या अर्थाने समांतर चित्रपटांच्या प्रवाहातील होते. ‘आरआरआर’ चित्रपटाला उत्कृष्ट बिगर इंग्रजी चित्रपट आणि उत्कृष्ट गीत अशा दोन प्रकारांमध्ये नामांकन मिळाले. पैकी एका प्रकारातील पुरस्कार मिळवण्यात यश आले. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. जागतिक पातळीवर बॉलीवूडचा दबदबा असला आणि इथल्या बड्या कलावंतांचा बोलबाला असला, तरी अलीकडच्या काळात बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचाच डंका वाजत आहे आणि त्यांनी बॉलीवूड सुपरस्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. भाषेची आणि प्रांतांची बंधने ओलांडून चित्रपट देशपातळीवर जाऊ लागले असल्याचा बदलही ठळकपणे जाणवते. त्याचमुळे दाक्षिणात्यच नव्हे, तर अन्य प्रादेशिक चित्रपटही एकाचवेळी अनेक भाषांमधून प्रदर्शित होतात. हे चित्रपट मूळ कोणत्या भाषेतील आहेत, हे न समजण्याइतपत ते त्या त्या भाषेतील चित्रपट वाटतात. नागराज मंजुळेंसारख्या दिग्दर्शकामुळे मराठी चित्रपटांचाही डंका देशभर वाजत असतो. त्याचमुळे बघता बघता मराठी नागराज मंजुळे थेट अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘झुंड’सारखा चित्रपट दिग्दर्शित करतो. प्रादेशिक भेद मिटवून देशाच्या पातळीवर एकात्म होत असलेली चित्रपटसृष्टी जागतिक पातळीवरही भारतीय चित्रपटसृष्टी म्हणून ओळख निर्माण करीत आहे, ही आनंदाची गोष्ट. चित्रपटांच्या माध्यमातून साधली जाणारी ही एकात्मता सामाजिक एकात्मतेसाठी उपयुक्त ठरली, तरच खर्‍या अर्थाने ‘नाटू, नाटू-नाटू…’ची रंगत वाढेल.

संबंधित बातम्या
Back to top button