ज्ञानदेवे रचिला पाया! | पुढारी

ज्ञानदेवे रचिला पाया!

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त….

गेल्या सातशेपेक्षाही अधिक वर्षांपासून मराठी मनावर गारुड केलेलं एक नितांत पवित्र नाव म्हणजे ‘संत ज्ञानेश्वर माऊली’! एखाद्या पुरुष संताला आईच्या स्थानी मानावे इतका जिव्हाळा जनमानसात असण्याची उदाहरणे फारच दुर्मीळ आहेत. अवघ्या 21 व्या वर्षीच समाधी घेणार्‍या ज्ञानोबारायांना महाराष्ट्र अनेक शतकांपासून ‘माऊली’च मानत आलेला आहे. माऊलींचा आज 726 वा संजीवन समाधी सोहळा.

‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हे अनेक बाबतीत घडल्याचे दिसून येते. शिवाय या ‘माऊली’ची अनेक रूपेही थक्क करणारीच आहेत. नाथ संप्रदायातील सिद्ध योगी, ज्ञानी, निष्काम कर्मयोगी आणि भक्त अशा परमार्थ मार्गातील सर्वच रूपांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे दिव्य दर्शन घडते. याशिवाय परतत्त्वाचा स्पर्श लाभलेले काव्य लिहिणारा महान कवी, समाजसुधारक, चिद्विलासवाद दर्शविणारा तत्त्वज्ञ, ऐन तारुण्यातच समाधी घेणारा विरक्त महापुरुष अशीही रूपे दिसतात.

ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायावरील त्यांची टीका वाचत असताना थोर योग्याचे दर्शन होते. ‘अमृतानुभव’सारखा ग्रंथ वाचताना अद्वैत ज्ञानाचा अपरोक्षानुभव घेतलेल्या महान ज्ञानी पुरुषाचे दर्शन होते. अनेक अभंग व विराण्या वाचत असताना कोमल हृदयाच्या भक्ताचे दर्शन होते. समाजाला निष्काम कर्मयोगासाठी प्रवृत्त करणारे त्यांचे विविध ग्रंथांमधील उपदेश वाचत असताना कर्मयोग्याचेही दर्शन होते. इतके सर्व अवघ्या 21 वर्षांच्या अल्पायुष्यातच करून आपल्या जीवनाची ‘इतिश्री’ करणारी ही माऊली मानवी मनाला थक्क करणारीच विभूती आहे.

कोवळ्या वयातच समाजाच्या अमानुष हेटाळणीचा, छळाचा सामना करणार्‍या माऊलीने स्वतः शिवशंकरासारखे हलाहल विष पचवून जगाला अमृताचा लाभ मिळवून दिला. संस्कृत भाषेत जी ब्रह्मविद्या लपून बसली होती, तिला मराठी भाषेचे लेणे लेववून सर्वसामान्यांसमोर आणले. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता या प्रस्थानत्रयींपैकी गीतेवर मराठीत ‘भावार्थदीपिका’ नावाने टीका लिहिली. उपनिषदांमध्ये दिव्य ऐक्याचे तत्त्वज्ञान आहे.

ब्रह्मसूत्रांमध्ये उपनिषदांमधील वाक्यांमध्ये विरोधाभास नसून त्यामध्ये समन्वय कसा आहे हे सांगितलेले आहे, तर गीता ही उपनिषदांचे सारच आहे. अशा या गीतेमधील दिव्य ऐक्याचे तत्त्वज्ञान माऊलींनी मराठी भाषेत आणून सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळवून दिला. अतिशय लहान वयापासून घेतलेला जगाचा अनुभव, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली साधना, आध्यात्मिक वाटचालीत मिळवलेले ज्ञान, विद्वत्ता, समाजाबाबतची कळवळ, रसिकत्व या सर्वांचा परिपोष ‘ज्ञानेश्वरी’त पाहायला मिळतो. ‘जैसे शारदीचिये चंद्रकळे। माजि अमृतकण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोरतलगे? तियापरी श्रोता। अनुभवावी हे कथा। अतिहळुवारपण चित्ता। आणूनियां?’ असे माऊलींनी सांगितल्याप्रमाणेच अनेक शतकांपासून भाविकजनांनी ‘ज्ञानेश्वरी’ वाचली आणि या ‘भावार्थदीपिके’च्या प्रकाशाने आपली जीवने उजळवून घेतली.

ज्ञानेश्वरांच्या समकालीन संतांमध्ये अठरापगड, विविध जातींमधील सत्पुरुषांचा समावेश होता. हे सर्व संत एकमेकांच्या सहवासात होते आणि त्यांचे कार्य तत्कालीन समाजाला नवी दिशा दाखविणारेच होते. गीतेच्या नवव्या अध्यायातील ‘मां ही पार्थ व्यपाश्रित्य…’ या श्लोकाचे निमित्त करून माऊलींनी समाजाला ‘म्हणौनी कुळ जाति वर्ण। हे आघवेचि गा अकारण। एथ अर्जुना माझेपण। सार्थक एक’ असा उपदेश केला. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठी टीका असली तरी ‘अमृतानुभव’ हा त्यांचा

स्वतःच्या अद्वैत अनुभवावर आधारित स्वतंत्र ग्रंथ आहे. चांगदेवांसारख्या महान योग्याला उपदेश करण्याच्या निमित्ताने त्यांनी ‘चांगदेव पासष्टी’ हा ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांचा हरिपाठही आज सर्व वारकर्‍यांच्या कंठात आणि हृदयातही असतो. आपल्या अल्पायुष्यात युगप्रवर्तक अलौकिक कार्य करून माऊलींनी आळंदीत समाधी घेतली. माऊलींचे समकालीन संत नामदेवांनी त्यांचे चरित्र आदी, तीर्थावळी आणि समाधी अशा भागांमध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या समाधी सोहळ्याचेही त्यांनी मोठे हृदयद्रावक वर्णन केलेले आहे. ‘देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर। जातो ज्ञानेश्वर समाधीसी’ असे नामदेवांनी म्हटले आहे. ‘जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढे ज्ञानेश्वरी ठेवियली? ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा। पादपद्मी ठेवा निरंतर?…नामा म्हणे आता लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ?’

– सचिन बनछोडे

Back to top button