गाळ उपसा अधिक खर्चिक | पुढारी

गाळ उपसा अधिक खर्चिक

आता नद्यांमधला गाळ काढण्याविषयी धोरण आणि आर्थिक तरतुदी ठरवण्याची घोषणा गेल्या आठवड्यात (22 ऑगस्ट 2022) मुख्यमंत्र्यांनी केली. ही खूप आतताई, धक्‍कादायक आणि अधिक धोक्याकडे नेणारी कृती ठरेल.

ओढे -नाले आणि नद्यांत वाढणारा गाळ हा जमिनीवरचे हिरवे आच्छादन विशेषतः डोंगरावरची प्रचंड वृक्षतोड यामुळेच घडते आहे, हे सांगण्यास पुन्हा संशोधकाची गरज नाही. त्याचबरोबर पावसाची वाढलेली तीव्रता हेही एक कारण आहे पुरासाठी आणि अर्थातच त्याचाही संबंध ग्लोबल वॉर्मिंग. हवामान बदल आणि परत वृक्षतोडीशीच येऊन थांबतो. एका नदीमधला काळ काढणे हे अब्जावधी रुपयांचा खेळ आहे. कदाचित यामुळेच हा पर्याय सुचत असावा. परंतु, नद्यांच्या निळ्या आणि लाल पूररेषेच्या आत येणारी बांधकामे व इतर अतिक्रमणे यांचे काय? तसेच अब्जावधी रुपये खर्च करून काढलेला गाळ कुठे टाकायचा आणि पुढच्या वर्षीपासूनच्या पावसाळ्यात तो मोकळ्या मातीच्या स्वरूपात असल्याने परत कोणत्या ना कोणत्या प्रवाहात वाहून येणार याचे काय नियोजन? कारण, हा गाळ खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे.

तसेच वा त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे नदी ही एक मोठी परिसंस्था (एलेीूीींशा) असते. तिच्या प्रवाहात अनेक छोटे-मोठे अधिवास (करलळींरीीं) असतात. ते नदीच्या मध्य धारेपासून ते नदीकाठ आणि त्या पलीकडे ही नदी हद्दीत, बाजूच्या जंगलांपर्यंत विखुरलेले असतात. त्या अधिवासात सूक्ष्मजीवापासून सस्तन प्राण्यांपर्यंत हजारो जीव एकत्र नांदत असतात. नद्यांच्या प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे आधीच अनेक अधिवास नष्ट झाले आहेत. उरलेसुरले गाळ काढण्याने ही नष्ट होतील. यातून नदी आणि पुढे समुद्रातील अनेक अन्‍नसाखळ्या बरबाद होतील. या अन्‍नसाखळ्यांच्या सर्वोच्च स्थानी माणूस ही ‘प्रजाती’ आहे. अन्‍नसाखळीच्या पिरॅमिडचा खालचा एक एक थर कोसळला तर पिरॅमिडच्या टोकावर बसलेली मनुष्य जात वरच्यावर ‘वर ’ केव्हा जाईल हे समजणारही नाही. त्यावेळी हे सर्व समजून काय उपयोग? खूप उशीर झालेला असेल.

संबंधित बातम्या

गाळ तयार होण्याची मुख्य कारणे विविध विकासकामांसाठी होणारे खोदकाम, त्यातून मोकळी होणारी माती आणि सुरुंगांमुळे खिळखिळे झालेली, डोंगरातून निसटणारी माती व दगड, ही सर्व मोकळी झालेली माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येते. डोंगर खिळखिळा झाल्याने दरडी कोसळतात. त्याही साध्यासुध्या नाहीत तर काही ठिकाणी पूर्ण डोंगरच भुईसपाट करून टाकतात.

ओढे, नाले रुंदीकरण, खोलीकरण ही पर्यावरणीय द‍ृष्ट्या अयोग्य असले तरी ते पाणी साठवण्यासाठी व मुरण्यासाठी आवश्यक आहे आणि हे काम सर्व द‍ृष्टीने आवाक्यातलेही आहे. यंदा जसा चिपळूणला अद्याप पूर आला नाही त्याप्रमाणेच महाडलाही आला नाही. पूर येण्याची कारणे गाळ साचण्याबरोबरच कमी वेळात अधिक तीव्र पाऊस होणे हेही असते. बहुदा हेही कारण यंदा पूर न येण्याचे असावे.
जंगल वाढवा हाच या सर्वांवर पर्याय व उपाय आहे.

आजवर कोट्यवधी झाडे लावूनही जंगले का वाढली नाहीत? कारण, आपण वृक्षारोपण हा एक उत्सव केला आहे. त्यातही विज्ञान व शास्त्र असते हे आपल्या आजही गावी नाही. झाडे लावून पाठ फिरवली की परत पुढचा जुलैलाच पाहायचे, हेच चक्र गेली 40-50 वर्षे सुरू आहे. त्याच्या जोडीलाच रस्त्यावर रोज शेकडो ट्रक कापलेली झाडे बाजारात घेऊन जातानाही दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन योग्य कार्यवाही आणि धोरण ठरवावे लागेल. यासाठी सर्वसामान्यांनी जागृत व्हावे व त्यातून शासन व प्रशासनाला योग्य पावले उचलण्यासाठी आग्रह धरण्यास भाग पाडावे हीच इच्छा!

 – सतीश खाडे, पुणे

Back to top button