शत्रूसोबत नांदायचे कसे? महाराष्ट्राचा समृद्ध मार्ग | पुढारी

शत्रूसोबत नांदायचे कसे? महाराष्ट्राचा समृद्ध मार्ग

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबई दौर्‍यावर येऊन गेले. दोन वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘स्लीपिंग विथ द एनिमी’ प्रयोग सुरू आहे. शत्रूसोबत अहोरात्र जगण्याचा हा प्रयोग कसा सुरू आहे, याचे कुतूहल केसीआर यांनाही असावे.

तिसर्‍या आघाडीची कोणतीही चर्चा सुरुवातीपासूनच बिघाडीच्या दिशेने का सुरू व्हावी, समजत नाही. एकापेक्षा अनेक महत्त्वाकांक्षी नेते तिसर्‍या आघाडीच्या दिशेने निघाले, की अनुयायी कोण, आतून-बाहेरून पाठिंबा देणारा कोण, या भूमिका काही केल्या निश्चित होत नाहीत. सारेच सेनापती व्हायला निघाले तर मग सैनिक व्हायचे कुणी आणि लढायचे कुणी, असा प्रश्न निर्माण होतो. तिसर्‍या आघाडीची सुरू झालेली जुळवाजुळव यापेक्षा वेगळी नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) मुंबई दौर्‍यावर येऊन गेले. ठरल्याप्रमाणे तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेसाठीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. केसीआर-ठाकरे भेट दोन तास चालली. पवारांसोबतही ते अर्धा-पाऊण तास होते. या दोन्ही भेटींमध्ये गोपनीय असे काही नव्हते, असे पत्रकार परिषदेत ठाकरे सांगत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत केसीआर यांच्या कानाला लागले आणि प्रश्नोत्तरे होणार नाहीत, क्वेश्चन्स आर नॉट टेकन, असे सांगितले. प्रश्नोत्तरे झाली असती तर प्रश्न काय येऊ शकतात, याचा अंदाज ठाकरे आणि केसीआर यांना असू शकतो. तिसर्‍या आघाडीच्या संदर्भात एकच कळीचा प्रश्न सध्या विचारला जातो. काँग्रेसचे काय? आणि तिसर्‍या आघाडीची रिकामी पालखी घेऊन फिरणार्‍या कोणत्याही नेत्याकडे याचे उत्तर एक तर नसते किंवा ते काँग्रेसविरोधी असते! या काँग्रेसविरोधाची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. आपल्या तृणमूल पक्षाला दोन-चार राज्यांची पाने आणखी फुटावीत आणि दिल्लीच्या राजकारणात उतरता यावे म्हणून ममतांनी थेट गोवा गाठले. अजून एक-दोन राज्यांत जोड-तोड करून त्या राजकीय विस्ताराची शक्यता आजमावतील. पश्चिम बंगाल वगळता अन्य कुठल्याही राज्यात पाय ठेवायला जागा नसली तरी राष्ट्रीय राजकारणात तिसरी आघाडी करताना काँग्रेससोबत नको, ही त्यांची भूमिका आहे. तिसरी आघाडी होणार असेल तर ती काँग्रेसवगळून व्हावी, असे त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केले. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षालाही दिल्लीबाहेर विस्तारता आलेले नाही. अरविंद केजरीवाल यांचा हा पक्षही गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. या आम आदमी पक्षालाही काँग्रेसचे नाव घेतले की, ढास लागते. अर्थात, अद्याप या पक्षाची तिसर्‍या आघाडीच्या बैठकांमध्ये ऊठबस सुरू झालेली नाही. सप, बसप हे तसे राष्ट्रीय असले तरी प्रादेशिकच. उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत ते व्यग्र असल्याने काँग्रेसबद्दलचा त्यांचा कल अद्याप स्पष्ट नाही. काँग्रेसचा मैत्रीचा आणि शत्रुत्वाचाही अनुभव ते घेऊन चुकले आहेत. त्यांना काँग्रेससोबत आलेले चालणार असले तरी अन्य छोट्या पक्षांना काँग्रेस वार्‍यालाही उभी नकोय. तिसरी आघाडी ही बव्हंशी राष्ट्रीय राजकारणाची स्वप्ने बाळगणार्‍या प्रादेशिक पक्षांची असेल. या पक्षांची जन्मतः दुश्मनी आहे ती काँग्रेसशीच. एक तर काँग्रेसमधून फुटून हे प्रादेशिक पक्ष जन्माला आले किंवा काँग्रेसविरोध या एकाच तत्त्वावर त्यांचा जन्म झाला. भाजपला रोखा, या एकमेव प्रेरणेतून तिसर्‍या आघाडीच्या हालचाली सुरू असल्या तरी छोट्या प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोध कसा हाताळला जातो यावर सारे काही अवलंबून आहे. आज केंद्रात भाजपकडे आसुरी म्हणता येईल असे बहुमत आहे. अशा बलाढ्य पक्षाशी एकेकटे लढाल तर 2024 सालीही विरोधकांचा पराभव अटळ आहे. एकेकटे लढण्यापेक्षा किमान मोक्याच्या जागी एकास एक लढत उभी करता येईल का? या प्रश्नाच्या उत्तरात अशा लढतीसाठी तयार कुणी व्हायचे आणि त्याग कुणी करायचा, हे प्रश्न दडलेले आहेत. केवळ भाजपला पराभूत करायचे म्हणून पश्चिम बंगालात काँग्रेससाठी ममता बॅनर्जी लोकसभेची एकही जागा सोडणार नाहीत. उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठे राजकीय राज्य असलेल्या महाराष्ट्रातून तिसर्‍या आघाडीचा मार्ग जातो. मंत्रालयातील अधिकारी आधीच शेतजमिनी विकत घेतात आणि मग त्याच जमिनी सरकारला विकून समृद्ध होतात. इतक्या सोप्या पद्धतीने उभारण्यासारखा हा तिसर्‍या आघाडीचा मार्ग नव्हे! तेलंगणात लोकसभेच्या 17 जागा आहेत. त्यापैकी तेलंगणा समितीने गेल्या निवडणुकीत 9 जिंकल्या. भाजपने 4 जिंकल्या. 3 जागा घेऊन काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर राहिली. काँग्रेसची एक जागा वाढली, तर भाजपच्या तीन जागा वाढल्या; पण टीआरएसच्या तीन कमी झाल्या. पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत घ्यायचे तर शत्रू पक्षाला तंबूत घेण्याची किंमत मोजावी लागेल. न घ्यावे तर भाजपची वाढ रोखणे कठीण. अशा परिस्थितीत गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘स्लीपिंग विथ द एनिमी’ प्रयोग सुरू आहे. अर्थात, शत्रूसोबत अहोरात्र नांदण्याचा हा प्रयोग कसा सुरू आहे, याचे कुतूहल केसीआर यांनाही असावे.

शिवसेनेचा उभा जन्म आधी एका काँग्रेसशी आणि नंतर दोन काँग्रेसशी लढण्यात गेला. ज्या भाजपसोबत 25 वर्षे मैत्रीचा संसार केला, तो भाजप मुळावर उठताच शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी आघाडी करून सत्ता मिळवली आणि अडीच वर्षे टिकवलीसुद्धा. पुढच्या निवडणुकीपर्यंत कोणतेही राजकारण ही आघाडी बिघडवू शकत नाही, याची खात्री ठाकरे यांनी निर्माण केली. महाराष्ट्राची सत्तेची गणिते फक्त आणि फक्त ‘ईडी’च बिघडवू शकते. त्या गणितातही संजय राऊत यांनी अलीकडे आपला एक हातचा ठेवून दिला. त्यामुळे तिसरी आघाडी झालीच तर शत्रूंची एकजूट होऊ शकते हे दाखवून देणार्‍या महाराष्ट्राच्याच नेतृत्वाखालीच होईल. राजकीय समृद्धीचा हा मार्ग अभ्यासण्यासाठीच केसीआर यांनी मुंबईत पायधूळ झाडली असावी. कुणी म्हणेल की, तेलंगणा तसे छोटे, जेमतेम 17 खासदारांचे राज्य. या राज्याचे मुख्यमंत्री तिसर्‍या आघाडीत असा काय चमत्कार घडवू शकतात? जेमतेम दोन खासदार असलेल्या या पक्षाचा पंतप्रधान देशाने पाहिला आहे. एक खासदारही सरकार पाडू शकतो, हा इतिहास जुना नव्हे. ही गणिते समोर ठेवूनच शरद पवार यांनी केसीआर यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले. राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. उद्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील भाजपविरोधात जातील आणि तिसर्‍या आघाडीच्या हालचालींना हातभार लावतील. 2024 च्या दिशेने जाताना भाजपचे मित्र कमी आणि शत्रू अधिक असतील, असे आजचे तरी चित्र आहे!

विवेक गिरधारी

Back to top button