बदलते तंत्रज्ञान आणि संधी | पुढारी

बदलते तंत्रज्ञान आणि संधी

नवतंत्रज्ञानाला सामोरे जाताना सतत होणार्‍या बदलांचे आणि नवनिर्मितीचे आव्हान कंपन्यांना पेलावे लागणार आहे. ‘बदलांचा स्वीकार’ हाच या स्थित्यंतराच्या काळात नवा मंत्र ठरणार आहे.

अमेरिकेचे तत्कालीन संरक्षणमंत्री डोनाल्ड राम्सफिल्ड यांची इराक मुद्द्यावर 2002 ला एक पत्रकार परिषद झाली होती. ते म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेल्या काही गोष्टी असतात. त्या आपल्याला माहीत आहेत याची संपूर्ण जाणीव असते (known knowns). काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. ते आपल्याला माहीत नाही हेही आपल्याला माहीत असते (known unknowns). तर काही गोष्टी माहीत नाहीत आणि ते आपल्याला माहीत नाही, याची जाणीवही आपल्याला नसते (unknown unknowns). आपला आणि इतर स्वतंत्र राष्ट्रांचा अभ्यास केला तर तिसर्‍या प्रकारच्या घटना घडामोडींना तोंड देणे फार कठीण असते, असे ते म्हणाले होते.

‘नोन नोन्स, नोन अनोन्स आणि अनोन अनोन्स’ ही तेव्हापासून राजकारणात कमी व्यवस्थापनात जास्त प्रचलित झालेली संज्ञा. जग हे वेगाने अशा अनोन अनोन्सच्या दिशेने जात आहे. हे समजून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया.

कंपन्यांचे आयुष्य किती असते?

ज्या कंपन्या एस. अँड पी. 500 मध्ये 1935 ला होत्या, त्यांचे आयुर्मान 98 वर्षे इतके मानले गेले होते. हे आयुष्य आता 18 वर्षांवर आलेले आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होतात आणि त्या बदलांना स्वीकारणे, नवे बिझनेस मॉडेल विकसित करणे यात अपयश आले की, कंपन्या अपयशी ठरतात. तर दुसरीकडे हीच स्थिती नव्या कंपन्यांना जन्माला घालते. याला आपण विध्वंसक नवनिर्मिती (Disruptive Innovation) म्हणू शकतो. अशा विध्वंसक नवनिर्मितीची संख्या जसजशी वाढत जाईल, तसे कंपन्यांचे आयुर्मानही कमी होत जाईल. अशा बदलांना तोंड कसे द्यायचे, हा जगभरातील कंपन्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. आपापल्या पातळीवर विविध कंपन्या त्यावर कामही करत आहेत. असे मानले जाते की, पुढच्या 10 वर्षांत जगातील नंबर एकची कंपनी बहुधा अजून जन्मालाही आलेली नसेल. इतका या बदलांचा वेग मोठा असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डीएनए सिक्वेन्सिंग आणि ब्लॉकचेन या चार तंत्रज्ञानांभोवती पुढील नवनिर्मिती फिरत राहील. जो वाटा औद्योगिक क्रांतीत विजेचा होता, तोच वाटा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चौथ्या औद्योगिक क्रांतीत असणार आहे. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, फेसबुक, गुगल आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्यांनीही विविध स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करत आपले एक पाऊल नावीन्याच्या दिशेने राहिल, असे प्रयत्न केले आहेत. अशा बदलांना सामोरे जाताना नेतृत्वाकडे कोणती कौशल्ये हवीत, विविध विभागांचे काम कसे हवे, नवी संस्कृती कशी असावी, यावर बरेच संशोधन व्यवस्थापन क्षेत्रात होते आहे. ह्युमन रिसोर्स विभागाने कशा प्रकारे स्वतःला बदलले पाहिजे, यावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्टही प्रसिद्ध आहे. या बदलांना सामोरे जाताना मनुष्यबळ कसे विकसित करायचे आणि आवश्यक नवी कार्यसंस्कृती कशी हवी यावर बरेच मंथन सुरू आहे, याचाच एक भाग म्हणजे हा रिपोर्ट होय. जग असे वेगाने बदलत असताना नव्या पिढीला त्यासाठी सक्षम करावे लागणार आहे. स्मार्ट मशिन कौशल्यांची खोली घेऊन येत असताना माणसाला कौशल्यांची रुंदी वाढवावी लागणार आहे. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आपल्याला या Unknown Unkown च्या दिशेने घेऊन जात आहे. यातून निर्माण होणार्‍या संधींसाठी आपले मनुष्यबळ विकसित करणे ही फार मोठी जबाबदारी सरकारी आणि खासगी क्षेत्रावर असेल.

सामाजिक सुरक्षेचा विस्तार

या नव्या जगात सर्वांना उन्नतीची संधी मिळाली पाहिजे, यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि कौशल्य सर्वांनाच मिळाले पाहिजे, याची जबाबदारी प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रावर असेल. तर दुसरीकडे असाही मोठा समाजघटक असणार आहे की, जो या बदलांत स्वतःसाठी जागा मिळवू शकणार नाही. अशा घटकांना कशा प्रकारे सुरक्षा द्यायची याचाही विचार करावा लागेल. अशा समाजघटकांना जर सुरक्षा देता आली नाही तर सामाजिक स्वास्थ्य बिघडलेले दिसेल. या उलट शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करू शकणार्‍या घटकांना नव्या जगात मोठी संधीही असणार आहे.

– मोहसीन मुल्ला

Back to top button