कोरोना लसीचा बूस्टर डोस नऊ महिन्यांनी घेता येणार | पुढारी

कोरोना लसीचा बूस्टर डोस नऊ महिन्यांनी घेता येणार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी याच लसीचा बूस्टर डोस देता येईल, अशी शिफारस ‘आयसीएमआर’नेे संसदीय समितीला केली आहे. ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. दरम्यान, शनिवारी सरकारच्या वतीने ओमायक्रॉन स्ट्रेन, लसीकरण आणि सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

अलीकडे आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या चमूने केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड लस डेल्टा डेरिव्हेटिव्हजच्या विरुद्ध परिणामकारक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ते लक्षात घेऊन कोव्हिशिल्ड लसीचा बूस्टर डोस म्हणून वापरण्याची सूचनाही आयसीएमआरने केली आहे.

भारतातील ओमायक्रॉन प्रसाराबाबत डॉ. भार्गव यांनी या ओमायक्रॉन व्हेरियंटसंदर्भात घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कसलाही ताण पडलेला नाही, असे स्पष्ट केले. नव्या व्हेरियंटसंदर्भात सध्याची उपचारपद्धती योग्य आहे. मात्र, या व्हेरियंटसंदर्भात वैज्ञानिकद‍ृष्ट्या अभ्यास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, बूस्टर डोसबाबत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, देशात तज्ज्ञांचे दोन गट आहेत. त्यांच्याकडून लसीकरण आणि त्यासंबंधीत प्रश्‍नावरील त्यांचा सल्ला विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

भारताच्या लसीकरण मोहिमेबद्दल ते म्हणाले, 86 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. सुमारे 7 कोटी डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

Back to top button