Who is Matthew VanDyke: गद्दाफीसोबत युद्ध, ISIS सोबत संघर्ष आणि आता भारतात अटक; अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅनडाइक कोण आहे?

Matthew VanDyke India Arrest: NIA ने भारतात अमेरिकन नागरिक मैथ्यू वॅनडाइकसह सात विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्यावर म्यानमारमधील बंडखोरांना ड्रोन आणि शस्त्र प्रशिक्षण दिल्याचा गंभीर आरोप आहे.
Who is Matthew VanDyke
Who is Matthew VanDykePudhari
Published on
Updated on

Matthew Vandyke India Arrest NIA Explained: भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 13 मार्च रोजी केलेल्या कारवाईमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कारवाईत सात विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यात सहा युक्रेनचे नागरिक आणि एक अमेरिकन नागरिक मैथ्यू आरोन वॅनडाइक याचा समावेश आहे. कोलकाता विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. स्वतःला डॉक्युमेंट्री फिल्ममेकर, पत्रकार आणि ‘फ्रीडम फायटर’ म्हणवणारा वॅनडाइक प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये महत्त्वाचं काम करतो त्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप आहेत.

या सात जणांवर म्यानमारमधील बंडखोर गटांना शस्त्रास्त्र आणि ड्रोन ऑपरेशनचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. NIA च्या प्राथमिक तपासानुसार, हे सर्व आरोपी पर्यटक व्हिसावर भारतात आले आणि त्यानंतर कोणतीही आवश्यक परवानगी (RAP किंवा इनर लाइन परमिट) न घेता मिझोरामच्या संवेदनशील सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे म्यानमारमध्ये घुसले. तिथे त्यांनी जातीय सशस्त्र संघटनांशी संपर्क साधला. या संघटनांचे संबंध भारताच्या ईशान्येकडील बंडखोर गटांशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भारतासाठी चिंतेचा विषय

तपासात हेही समोर आलं आहे की, युरोपमधून मोठ्या प्रमाणात ड्रोन भारताच्या मार्गाने म्यानमारमध्ये नेण्यात आले. या ड्रोनचा वापर युद्धासाठी कसा करायचा, त्यांची असेंब्ली, जॅमिंग तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण या गटांना दिले जात होते. या सर्व आरोपींना बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्या (UAPA) अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना 11 दिवसांच्या NIA कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मैथ्यू वॅनडाइकची पार्श्वभूमीही तितकीच धक्कादायक आणि वादग्रस्त आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे जन्मलेल्या वॅनडाइकने जॉर्जटाउन विद्यापीठातून सिक्युरिटी स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्याने काही वर्ष विविध युद्धग्रस्त भागांमध्ये काम केले आहे.

2011 मध्ये तो लिबियामध्ये मुअम्मर गद्दाफी यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांसोबत सहभागी झाला होता. या युद्धादरम्यान त्याला पकडण्यात आलं आणि कुप्रसिद्ध अबू सलीम तुरुंगात पाच महिन्यांहून अधिक काळ कैदेत ठेवण्यात आलं. नंतर बंडखोरांनी त्रिपोलीवर ताबा मिळवल्यानंतर तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

Who is Matthew VanDyke
Kim Jong Un News: हुकूमशहा किम जाँग उनसाठी पैसे कमावणारी 'फेक वर्कर आर्मी'; आयटीत नोकरी...AI चा असा केला जातोय वापर

‘सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल’ (SOLI) संस्थेची स्थापन

यानंतर त्याने सीरिया आणि इराकमध्ये ISIS विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला. 2014 मध्ये त्याने ‘सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल’ (SOLI) ही संस्था स्थापन केली. ही संस्था कथितपणे हुकूमशाहीविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या गटांना प्रशिक्षण आणि संसाधने पुरवते.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर 2022 पासून तो युक्रेनमध्येही सक्रिय होता. त्याने युक्रेनच्या नागरिकांना आणि सैन्याला काउंटर-ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे. याशिवाय, 2019 पासून व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांच्या सरकारविरोधात गुप्त कारवायांमध्येही तो सहभागी असल्याचं त्याने स्वतः मान्य केलं आहे.

CIA या गुप्तचर संस्थेशी संबंध

वॅनडाइकची ओळख मात्र कायमच वादग्रस्त राहिली आहे. काही विश्लेषक त्याला ‘भाडोत्री सैनिक’ मानतात, तर काहीजण त्याच्यावर अमेरिकेच्या CIA या गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आरोप करतात. वॅनडाइकने मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून तो केवळ स्वतंत्रपणे काम करतो, असं त्याने सांगितलं आहे. तरीही त्याच्या हालचाली बहुतेक वेळा अमेरिकेच्या धोरणात्मक हितांशी जुळतात, हे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

त्याच्या आयुष्यावर ‘पॉइंट अँड शूट’ ही डॉक्युमेंट्रीही बनली असून तिला 2014 मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला होता.

Who is Matthew VanDyke
Ali Larijani killed: मुलीच्या घरी पाहुणे म्हणून गेले होते अली लारीजानी; इस्रायलने इराणच्या 'चाणक्याला' कसं उडवलं?

या संपूर्ण कारवाईतून भारताने एक मेसेज दिला आहे. म्यानमारमध्ये 2021 पासून सुरू असलेल्या अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत भारत आपल्या सीमांचा वापर कोणत्याही परदेशी नेटवर्ककडून बंडखोरी वाढवण्यासाठी किंवा ‘प्रॉक्सी वॉर’ छेडण्यासाठी होऊ देणार नाही, हे या अटकेमधून स्पष्ट झालं आहे.

मैथ्यू वॅनडाइक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अटकेने केवळ एक गुन्हा उघडकीस आला नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या गुप्त कारवायांचा एक धागा भारतापर्यंत पोहोचल्याचं चित्र समोर आलं आहे. पुढील तपासातून या नेटवर्कचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news