

Hormuz Crisis
नवी दिल्ली : युद्धग्रस्त होर्मुजच्या आखातातून सुरक्षित बाहेर पडलेले भारतीय ध्वज असलेले दुसरे LPG टँकर आज (दि. १७ मार्च) भारतात दाखल झाले आहेत. संघर्ष क्षेत्रात अजूनही अडकलेल्या उर्वरित २२ भारतीय जहाजांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी माहिती दिली की, 'नंदा देवी' हे LPG टँकर मंगळवारी पहाटे २:३० च्या सुमारास गुजरातच्या कांडला बंदरात पोहोचले. यापूर्वी सोमवारी पहिले जहाज 'शिवालिक' गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचले होते.
दोन्ही जहाजांमध्ये मिळून एकूण ९२,७१२ टन LPG आहे, जो देशाच्या एका दिवसाच्या वापराइतका आहे.दोन्ही जहाजांमधून गॅस उतरवण्याचे काम सुरू झाले आहे. 'नंदा देवी' सध्या 'शिप-टू-शिप' ट्रान्सफरद्वारे माल उतरवत आहे.पर्शियन आखाती प्रदेशात सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून गेल्या २४ तासांत कोणत्याही भारतीय जहाजासोबत अनुचित प्रकार घडलेला नाही.१३ मार्च रोजी प्रवास सुरू केलेली दोन LPG जहाजे १४ मार्चच्या सकाळी होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून बाहेर पडली होती. आतापर्यंत युद्धक्षेत्रातून सुरक्षित बाहेर पडलेल्या भारतीय जहाजांची संख्या ४ झाली आहे.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या पश्चिम आखातात भारतीय ध्वज असलेली २२ जहाजे अडकलेली असून, त्यावर एकूण ६११ भारतीय खलाशी आहेत. 'डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग' या जहाजांवर सतत लक्ष ठेवून असून जहाज मालक, विविध एजन्सी आणि भारतीय दूतावासांशी समन्वय साधत आहे.अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेले हल्ले आणि इराणने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर होर्मुजची सामुद्रधुनी व्यावहारिकदृष्ट्या बंद झाली आहे. युद्ध सुरू झाले तेव्हा या भागात एकूण २८ भारतीय जहाजे होती. त्यापैकी २४ पश्चिम भागात तर ४ पूर्व भागात होती. आता पश्चिम बाजूला २२ आणि पूर्व बाजूला २ जहाजे शिल्लक आहेत.
पूर्व बाजूने एक कच्चे तेल वाहून नेणारे टँकर यूएईच्या फुजैरा बंदरातून हल्ल्याचा धोका असूनही सुरक्षितपणे बाहेर पडले असून ते मंगळवारी भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये ८०,८०० टन कच्चे तेल आहे. यावरील सर्व २२ भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. दुसरे टँकर 'जग प्रकाश' ओमानमधून गॅसोलीन घेऊन आफ्रिकेला जात होते, त्यांनी सामुद्रधुनी ओलांडली असून ते आता टांझानियाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. भारतीय अधिकारी इतर अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संबंधितांच्या संपर्कात आहेत.