दुसऱ्या महिलेसोबत राहत होता विवाहित पुरुष, तरीही ‘द्विभार्या’ गुन्हा नाही, कोर्ट काय म्हणाले? | पुढारी

दुसऱ्या महिलेसोबत राहत होता विवाहित पुरुष, तरीही 'द्विभार्या' गुन्हा नाही, कोर्ट काय म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) नुकत्याच एक खटल्यात निरीक्षण नोंदवले की दुसरे लग्न केल्याचा गुन्हा तोपर्यंत नोंदवला जाऊ शकत नाही जोपर्यंत विवाहित पुरुष दुसरे लग्न करत नाही. विवाहित पुरुष दुसरे लग्न न करता दुसऱ्या जोडीदारासोबत राहिल्यास त्याच्यावर द्विपत्नीत्वाचा गुन्हा नोंद होऊ शकत नाही.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, एका विवाहित पुरुषावर त्याच्या पत्नीने तो दुसऱ्या महिलेसोबत राहात असल्याने दुसरे लग्न केल्याचा आरोप ठेवला होता. हे प्रकरण निकाली काढताना न्यायमूर्ती कुलदीप माथूर यांनी, जर का विवाहित पुरुष दुसऱ्या एका महिलेसोबत लग्न न करता राहात असेल तर त्याच्यावर द्विपत्नीत्वाचा गुन्हा नोंद केला जाऊ शकत नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

कायदा काय सांगतो?

दरम्यान, न्यायमूर्तींनी असे निदर्शनास आणून दिले की पहिले लग्न असताना जोपर्यंत दुसरे लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४९४ (पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे) नुसार गुन्हा नोंद होत नाही. केवळ विवाहित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न न करता एकत्र राहत असेल त्याच्यावर दुसरे लग्न केल्याच्या गुन्ह्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

“कोणत्याही व्यक्तीने पती किंवा पत्नीच्या हयातीत दुसरे लग्न केले तर कलम आयपीसीच्या कलम ४९४ अंतर्गत शिक्षेचा गुन्हा आहे. पण पती-पत्नी म्हणून एकत्र राहणाऱ्या महिलेने विद्यमान कायद्यानुसार वैध विवाह केला नसेल तर कलम ४९४ आयपीसी अंतर्गत शिक्षेचा गुन्हा मानला जाणार नाही,” असे ७ मे च्या आदेशात नमूद केले आहे.

द्विपत्नीत्वाचा आरोप

या प्रकरणात याचिकाकर्ता एका पुरुषावर त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून IPC अंतर्गत दुसरे लग्न, क्रूरता आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर सदर पुरुषाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्धच्या ट्रायल कोर्टात प्रलंबित असलेल्या फौजदारी कारवाईला आव्हान दिले.

युक्तिवाद काय केला?

या प्रकरणी याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की त्याने (याचिकाकर्ता) धार्मिक विधी करुन दुसऱ्या महिलेसोबत दुसरे लग्न केल्याचा असा कोणताही आरोप नाही. तक्रारदार पत्नीनेही पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले नसल्याचे नमूद केले होते.

वकिलानी पुढे असाही युक्तिवाद केला की पत्नीने कथित आरोपाच्या वीस वर्षांनंतर पतीविरुद्ध केवळ छळ करण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी दुसरे लग्न केल्याची तक्रार दाखल केली.

‘नाता विवाह’चा मुद्दा उपस्थित

दरम्यान, पत्नीच्या वकिलांनी पतीच्या दाव्यांवर आक्षेप नोंदवला. त्यांनी म्हटले की जरी असे गृहीत धरले गेले की तिच्या पतीने नाता विवाहाच्या रितीरिवाजांनुसार दुसरी स्त्री ठेवली आहे. (ही एक प्रथा आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती कोणत्याही कायदेशीर आणि धार्मिक/ सामाजिक बंधनाशिवाय सध्याच्या विवाहातून घटस्फोट घेऊन विवाहासारख्या नात्यात राहू शकतात). यामुळे आजही तो दुसरे लग्न केल्याने दोषी ठरेल.

न्यायालयाने काय म्हटले?

दरम्यान, याचिकाकर्त्याने दुसऱ्या महिलेशी दुसरे लग्न केले होते हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे द्विपत्नीत्वाचा गुन्हा ठरू शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यामुळे न्यायालयाने संशयित पुरुष व्यक्तीविरुद्ध ट्रायल कोर्टासमोर प्रलंबित असलेली फौजदारी कारवाई रद्द केली.

 हे ही वाचा : 

 

Back to top button