Stock Market Closing Bell | तुफान खरेदी; सेन्सेक्स ९४१ अंकांनी वाढून बंद, Nifty Bank चा नवा उच्चांक, तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक | पुढारी

Stock Market Closing Bell | तुफान खरेदी; सेन्सेक्स ९४१ अंकांनी वाढून बंद, Nifty Bank चा नवा उच्चांक, तेजीमागे होते 'हे' ५ घटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मजबूत जागितक संकेत आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीच्या जोरावर सोमवारी (दि. २९ एप्रिल) शेअर बाजारात जोरदार तेजी राहिली. सेन्सेक्स ९४१ अंकांनी वाढून ७४,६७१ वर बंद झाला. तर निफ्टी २२३ अंकांनी वाढून २२,६४३ वर बंद झाला. रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हेल्थकेअर, मेटल, पॉवर, बँक आणि ऑइल अँड गॅस ०.४-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

गुंतवणूकदारांना २.४० लाख कोटींचा फायदा

बाजारातील आजच्या (दि. २९ एप्रिल) तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.४० लाख कोटी रुपयांनी वाढून ४०६.४४ लाख कोटींवर पोहोचले. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी बाजार भांडवल ४०४.०४ लाख कोटी होते.

‘हे’ शेअर्स टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank Share Price), एसबीआय, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले. दरम्यान, एचसीएल टेकचा शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरून टॉप लूजर ठरला. विप्रो, आयटीसी या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

sensex closing
sensex closing

ICICI Bank बाजार भांडवल ८ लाख कोटी पार

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ८ लाख कोटी रुपये पार झाले. अशी कामगिरी करणारी ICICI Bank ही पाचवी भारती कंपनी आणि दुसरी भारती बँक बनली आहे. अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाही उलाढालीमुळे आज आयसीआयसीआयचे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांना ८ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा पार करता आला आहे.

अपोलो हॉस्पिटलचा शेअर्स घसरला

निफ्टीवर आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढून १,१६१ रुपयांवर पोहोचला. त्याचसोबत एसबीआय, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही तेजीत राहिले. दरम्यान, एनएसईवर अपोलो हॉस्पिटलचा शेअर्स आज ५,७३३ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स ४ टक्के घसरणीसह ५,९७८ रुपयांवर होता. (Apollo Hospitals Enterprise Share Price) एचसीएल टेकचा शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरला. एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, LTIMindtree हे शेअर्सही घसरले.

Nifty 50
Nifty 50

बँकिग शेअर्स तेजीत

निफ्टी बँकने आज तब्बल १,२२३ अंकांनी वाढून ४९,४२४ चा नवा उच्चांक नोंदवला. आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक वगळता निफ्टी बँकेतील उर्वरित १० शेअर्सनी हिरव्या रंगात व्यवहार केला. निफ्टी बँकवर आयसीआयसीआय बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक आणि इंडसइंड बँक हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. PSU बँक निर्देशांकदेखील २ टक्क्यांनी वाढला. PSU Bank Index वर इंडियन बँक, पीएसबी, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

जागतिक बाजारात उत्साह

अमेरिकेतील बाजारातील प्रमुख निर्देशांक शुक्रवारी वाढून बंद झाले होते. नॅस्डॅक कंपोझिट, एस अँड पी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज हे निर्देशांक वाढून बंद झाले होते. आशियाई बाजारातही तेजीत वातावरण राहिले. जपानचा निक्केई २२५, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक वाढल्याचे आज दिसून आले.

कच्चा तेलाच्या किमतीत घट

कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळेही शेअर बाजारातील तेजीला सपोर्ट मिळाला. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या. US WTI क्रूड ऑइल कॉन्ट्रॅक्ट्स ०.९ टक्क्यांनी खाली येऊन प्रति बॅरल ८३.०३० डॉलरवर आले आहे.

इस्रायल-हमास तणाव कमी होण्याचे संकेत

इजिप्तच्या कैरोमधील इस्रायल-हमास शांतता चर्चेमुळे मध्य पूर्वेतील व्यापक संघर्षाची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी इक्विटीसारख्या जोखीम मालमत्तेची मागणी वाढली आहे.

हे ही वाचा :

Back to top button