फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करा : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करा : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईमधील घाटकोपर येथे सोमवारी जाहिरात फलक कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळांकडून जाहिरात फलकांबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मागविला आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी देण्यात आले. जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तपासणीअंती अवैध फलक काढण्याची कारवाई करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी हा अहवाल मागविला आहे. परवानगी देण्यात आलेल्या सर्व जाहिरात फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण नव्याने करून घेण्यास संबंधित जाहिरात फलकधारकाला कळवावे, त्याप्रमाणे लेखापरीक्षण केल्याचा दाखला 15 दिवसांत सादर करण्यास सांगावे.

आपल्या हद्दीतील स्थापत्यविषयक लेखापरीक्षण न केलेले सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत तसेच अनधिकृत जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करावी. त्यामध्ये प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करावी. या कामकाजावर दैनंदिन नियंत्रण ठेवून संबंधित अधिकार्‍यांमार्फत नव्याने स्थापत्यविषयक लेखापरीक्षण केल्याचा प्रमाणित दाखला सादर करावा. हा दाखला सादर न केल्यास किंवा स्थापत्यविषयक लेखापरीक्षण न केलेल्या जाहिरात फलकधारकांना देण्यात आलेली नोटीस, संबंधितांवर करण्यात आलेली कारवाई, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी आणि देहू कटक मंडळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी मंगळवारी दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news