Stock Market Update : सप्ताहभरात ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ, जाणून घ्या शेअर मार्केट | पुढारी

Stock Market Update : सप्ताहभरात 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ, जाणून घ्या शेअर मार्केट

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

  • गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात शुक्रवारच्या सत्रात अनुक्रमे 150.40 अंक व 609.28 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 22419.95 अंक तसेच 73730.16 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये शुक्रवारी 0.67 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.82 टक्क्यांची घट नोंदवली गेली; परंतु एकूण संपूर्ण सप्ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये 272.95 अंक (1.23 टक्के), सेन्सेक्समध्ये 641.83 अंक (0.88 टक्के) वाढ झाली. सप्ताहभरात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक (9.8 टक्के), डिव्हीजन लॅब (9.4 टक्के), टेक महिंद्रा (7.1 टक्के), एसबीआय (6.8 टक्के), हिरो मोटोकॉर्म (6.6 टक्के) यांचा समावेश होतो. तसेच सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक (-10.3 टक्के), बजाज फायनान्स (-5.5 टक्के), टाटा कन्झ्युमर (-3.1 टक्के), इंडसिंड बँक (-2.4 टक्के), एचडीएफसी लाईफ (-2.3 टक्के) या समभागांचा समावेश झाला. (Stock Market Update)

संबंधित बातम्या : 

  • लघुवित्तपुरवठा बँकांना (स्मॉल फायनान्स बँक) सर्वसामान्य बँकेमध्ये रूपांतरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला जाणार. यासाठी लघुवित्तपुरवठा बँकेकडे किमान 1000 कोटींची निव्वळ संपत्ती (नेट वर्थ) असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे मागील दोन वर्षात या बँकेने निव्वळ नफा जाहीर केलेला असायला हवा. या स्मॉल फायनान्स बँकेचे एकूण अनुत्पादित कर्ज (ग्रॉसएनपीए) 3 टक्के तसेच निव्वळ अनुत्पादित कर्ज प्रमाण (नेट एनपीए), टक्क्यांपेक्षा कमी असायला हवे. या प्रमुख अटींसह इतर बाबींची पूर्तता करणार्‍या लघु-वित्तपुरवठा बँकांना (स्मॉल फायनान्स बँकांना) सर्वसामान्य (युनिव्हर्सल) बँकेत उज्जीवन, उत्कर्ष, जनस्मॉल फायनान्स बँक यांच्यासह देशातील सुमारे डझनभर बँकांना आता सर्वसामान्य बँकेमध्ये रूपांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • देशात घरपोच किराणा माल आणि अन्न पुरवणारी ऑनलाईन स्टार्टअप कंपनी ‘स्विगी’ भागधारकांनी भांडवल बाजारात आयपीओ आणण्याची परवानगी दिली. एकूण 1.2 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 10,414 कोटी) हा आयपीओ असणार आहे. यापैकी 450 दशलक्ष डॉलर्स (3750 कोटी रुपये) फ्रेश, इश्यू असणार आहे. तसेच 800 दशलक्ष डॉलर्स (6664 कोटी) ऑफर फॉर सेल असणार आहे. स्विगी 350 रुपये प्रतिसमभाग दरावर आणि 9.6 अब्ज डॉलर्सच्या कंपनीच्या किमतीवर (सुमारे 80 हजार कोटी) समभाग ऑफर करेल.
  • देशातील महत्त्वाची गैरबँकिंग वित्तपुरवठा करणारी संस्था (एनबीएफसी बजाज फायनान्सचा गतसालच्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 21 टक्के वधारून 3825 कोटी झाला. ठेवींमध्ये (Deposits) 35 टक्क्यांची वाढ होऊन ठेवी 60151 कोटी झाल्या. 31 मार्चच्या आकडेवारीनुसार व्यवस्थापनअंतर्गत भांडवलमूल्यात (AUM) 34 टक्के वाढ होऊन हे मूल्य 3.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 28 टक्के वधारून 8013 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 0.98 टक्क्यांवरून 0.85 टक्के झाले. तसेच कंपनीने इकॉम लोन व इन्स्टा ईएमआयकार्डसंबंधी रिझर्व्ह बँकेने लावलेले कडक नियम शिथिल करण्याची विनंतीदेखील रिझर्व्ह बँकेला केली. कडक नियम शिथिल करण्याची विनंतीदेखील रिझर्व्ह बँकेला केली.
  • रिझर्व्ह बँकेचा कोटक महिंद्रा बँकेला दणका. ऑनलाईनच्या मध्यमातून अथवा मोबाईल बँकिंग अ‍ॅपच्या स्वरूपातून नवीन ग्राहक जोडल्यास कोटक बँकेला रिझर्व्ह बँकेकडून मज्जाव करण्यात आला. तसेच नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यासदेखील मनाई करण्यात आली. सध्या अस्तित्वात असणार्‍या ग्राहकांवर या कारवाईचा काहीही परिणाम होणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले. अधिनियम 1949 च्या धारा 35 अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मजबूत आयटी टेक्नॉलॉजी आणि सुविधा यामध्ये सातत्याने येणार्‍या अडचणींमुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागत असल्याचे रिझर्व्ह बँकेने नमूद केले. त्यामुळे लवकरच यावर उपाय काढण्याचे आश्वासन कोटक बँकेकडून देण्यात आले.
  • देशातील सर्वात मोठी एफएमसीची क्षेत्रातील कंपनी एचयूएलचा गतअर्थिक वर्षाचा चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा 6 टक्के घटून 2406 कोटी झाला. कंपनीचा महसूलदेखील 0.2 टक्के घसरून 14893 कोटींवरून 14857 कोटी झाला. कंपनीचे इक्विटी मार्जिनदेखील 23.3 टक्क्यांवरून 23.1 टक्का झाले.
  • देशातील महत्त्वाची खासगी क्षेत्रातील ‘अ‍ॅक्सिस बँकेचा’ गतसालाच्या चौथ्या तिमाहीत बँकेला 5540 कोटींचा तोटा झाला होता. निव्वळ व्याज उत्पन्नात (नेट इंटरेस्ट, इन्कम) 11.5 टक्क्यांची वाढ होऊन उत्पन्न 13089 कोटी झाले. बँकेला वाटलेल्या कर्जातून जमा झालेले व्याज, बँकेने ग्राहकांना वाटलेले ठेवींवरील व्याज यांच्यातील फरकाला निव्वळ व्याज उत्पन्न म्हणतात. बँकेने वाटलेल्या कर्जांमध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली, तर बँकेकडे आलेल्या ठेवींमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 2.02 टक्क्यावरून 1.43 टक्के झाले.
  • देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘टेक महिंद्रा’चा आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत 30 टक्के वधारून 661 कोटी झाला. कंपनीचा महसूल मात्र 13101 कोटींवरून 12871 कोटींवर खाली आला.
  • भारतीय विमा नियामक ‘आयआरडीएआय’ने सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘ऑल इन वन’ बिमा विस्तार पॉलिसी जाहीर केली. केवळ 1500 रुपयात प्रतिव्यक्ती 2 लाखांचे लाईफ, हेल्थ, अ‍ॅक्सिडेंट, प्रॉपर्टी कव्हर एकाच पॉलिसीमध्ये मिळू शकणार आहे. यामध्ये 820 रुपयांमध्ये 80 रुपयांत मालमत्ता विमा दिला जाणार आहे. संपूर्ण कुटुंबाला विमाअंतर्गत (फॅमिली फ्लोटर) संरक्षित करायचे असल्यास या विम्याची किंमत 2420 रुपये असणार आहे. भारतात विमासेवा अधिकाधिक किफायतशीर आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • मारुती सुझुकी कंपनीचा अर्थिक वर्ष 2023-24 चा चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 48 टक्के वधारून 3878 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 19 टक्के वधारून 36698 कोटी झाला. कंपनीचे इबिटा मार्जिनदेखील 10.44 टक्क्यांवरून 12.25 टक्के झाले. कंपनीने आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे प्रतिसमभाग 125 रुपयांचा लाभांश जाहीर केला.
  • देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘एचसीएल टेक’चा मार्च 2024 चा तिमाहीचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 8.4 टक्के घटून 3986 कोटी झाला. कंपनीचा महसूल सुमारे मागील तिमाही इतकाच 28499 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचे 3 ते 5 टक्क्यांदरम्यान स्थिर चलन महसूलवाढीचे (Costant Currency Revenue Growth) उद्दिष्ट आहे.
  • अमेरिकेच्या विधी मंडळाने युक्रेन, इस्रायल, तैवान या देशांच्या लष्करी मदतीसाठी तब्बल 95 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 8 लाख कोटी रुपयांचा) मदतनिधी जाहीर केला. यामध्ये 60.84 अब्ज डॉलर्स युक्रेनसाठी, 26 अब्ज डॉलर्स इस्रायलसाठी आणि उरलेले 8.12 अब्ज डॉलर्स तैवानसाठी मदतनिधी दिला जाणार.
  • देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्च 2024 तिमाहीचा निव्वळ नफा 1.8 टक्के घटून 18951 कोटी झाला. कंपनीचा महसूल 11.3 टक्के वधारून 2 लाख 40 हजार कोटींवर पोहोचला. याच समूहाची उपकंपनी जिओचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के वधारून 5583 कोटी, तर रिलायन्स रिटेलचा नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 11.7 टक्के वधारून 2698 कोटी झाला. (Stock Market Update)
  • 19 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.83 अब्ज डॉलर्सनी घटून 640.33 अब्ज डॉलर्स झाली. यामध्ये सोन्याचा साठा 1.01 अब्ज डॉलर्सनी वाढून 56.81 अब्ज डॉलर्स झाला, तर विदेश चलन मालमत्ता (एफसीए) 3.79 अब्ज डॉलर्स घटून 580.86 अब्ज डॉलर्स झाली.

हेही वाचा : 

Back to top button